मे महिन्यातील उन्हाळा दाहक तापमानाने होरपळून काढत असतानाच अचानकच पावसाच्या सरी यायला सुरुवात झाली. यावर्षीचा सध्या महाराष्ट्रात सर्वत्र असलेला पाऊस सांगतो की, पावसाळा चक्क एक महिना अलीकडे ओढलेला आहे, असे दिसते. वरुणदेवता ही पावसाची देवता आहे, असे आपण म्हणतो. या देवतेने टाईमटेबल बदलून मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाळा सुरू केला आहे, असे वाटते. सात जून रोजी सहसा महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याची सुरुवात होते. यावर्षी मात्र अचानक आलेल्या पावसाने राज्यातील जनतेची दाणादाण उडवली आहे.
शहरी भागातील लोकांना रस्त्यांवर थोडेसे पाणी तुंबते आणि वाहने चालवताना अवघड होते एवढाच काय तो अडथळा असतो. ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग मात्र भांबावून जातो. पावसाळ्याच्या काळात पेरणी करण्यासाठी मशागतीची कामे उन्हाळ्यात केली जातात. जमीन नांगरून घेणे, मोठी मोठी ढेकळे फोडून घेणे आणि एकंदरीतच जमिनीची मशागत करून रान तयार करून घेणे हे काम शेतकरीवर्ग मे महिन्यामध्ये करत असतो. यादरम्यान अवकाळी पावसाची आपल्या सर्वांना सवय आहे. अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट घेऊन येतो आणि विजा पडून असंख्य शेतकरी बांधवांचे मृत्यू राज्यामध्ये होत असतात.
यावर्षी अवकाळी पावसाची सुरुवात झाली तेव्हा शेतकरीवर्ग सुरक्षित राहून जमेल तशी जमिनीची मशागत करत होता. अचानक आलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्य ओलेचिंब झाले आहे. कडक उन्हाची जागा पावसाच्या ढगांनी घेतली आहे. अशा स्थितीत जमिनीची मशागत शेतकर्यांनी कधी करायची, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यामध्ये फळबागा बहरात असतात. या बागांचे प्रचंड मोठे नुकसान या पावसाने केले आहे. ‘आला पाऊस’ म्हणताना ‘आला मुसळधार पाऊस’ असे म्हणण्याची वेळ संपूर्ण राज्यामध्ये आली आहे.
या वेळची विशेष बाब म्हणजे, हवामान खात्यालाही किंवा स्वयंघोषित तज्ज्ञांनाही असा काही प्रचंड मोठा पाऊस येईल याची अपेक्षा नव्हती. यावेळी सर्वांचेच अंदाज चुकले आहेत. अंदाज शेवटी अंदाज असतो; परंतु तो जास्तीत जास्त अचूक कसा असेल, यासाठी शासन यंत्रणांनी प्रयत्न केले पाहिजेत.
एखादी आपत्ती येते तेव्हा त्यामधून काही चांगलेही निष्पन्न होत असते. याचे उदाहरण म्हणजे सध्या आलेला अवकाळी पाऊस. संपूर्ण राज्याला सलग तीन दिवस झोडपणार्या या पावसाने काही प्रमाणात का होईना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला आहे, असे आपल्या लक्षात येईल. इकडून तिकडे फिरणारे टँकर्स कमी झाले. कारण थेट आभाळातूनच पाण्याचा वर्षाव झाला. शेतीचे, पिकाचे, पेरणीचे नियोजन बदलावे लागेल की काय, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.