शशिकांत सावंत
विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बिनविरोध विजयाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. कोकणातील सर्व जागा बिनविरोध जिंकत महायुतीने आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली, तर महाविकास आघाडीतील विसंवाद आणि उमेदवारांच्या माघारीमुळे विरोधकांची कमकुवत होत चाललेली स्थिती पुन्हा अधोरेखित झाली. या घडामोडींमुळे राज्यातील विरोधी राजकारणासमोर अस्तित्वाचेच आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे.
महायुतीने ठाण्याच्या जागेवर बिनविरोध विजयी होण्याचा झेंडा लावून मतांची श्रीमंती आधीच दाखवून दिली आणि लक्ष्मीपुत्र रवींद्र फाटक विजयी झाले. खरं तर, भाजपची सर्वाधिक मते या विधान परिषद मतदारसंघात असताना शिवसेनेने २०१७ च्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचे गणित दाखवत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला तो बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे. महाविकास आघाडीचे कमजोर उमेदवार अभिजित पवार आणि बाळ माने यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडत भाजपचा बिनविरोधचा यापूर्वीच्या निवडणुकीतील पॅटर्न आता शिवसेनेने आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने कोकणात यशस्वी करून दाखवला.
अलीकडच्या बऱ्याच निवडणुका बिनविरोधच्या नव्या पॅटर्नने या ना त्या निवडणुकीत डोके वर काढत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यानंतर नगरपालिकांमध्येही हे प्रयोग यशस्वी झाले. विरोधकांना निवडणुकीपूर्वीच गारद करण्याची रणनीती सत्तारूढ महायुतीने अनेक निवडणुकांमध्ये अवलंबली. त्याची चर्चाही महाराष्ट्रात खूप झाली. लोकशाहीचा गळा घोटत असल्याची टीका विरोधकांनी सत्तारूढ पक्षावर केली. ही टीका करण्यात जितेंद्र आव्हाड अग्रस्थानी होते; मात्र त्यांच्याच नेतृत्वाखाली अर्ज दाखल केलेल्या अभिजित पवार यांनी महाविकास आघाडीला दगा देऊन अर्ज मागे घेतला. हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे.
राज्यात एकूण १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यातील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये ठाण्यात रवींद्र फाटक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे, अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे, वर्धा गडचिरोली, चंद्रपूर अरुण लखानी, पुणे विक्रम काकडे, यवतमाळ दुशांत चतुर्वेदी अशा सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे कोकणात सर्वांच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. एकाच जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेची माघार, तर दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची माघार अशी कोकणाची स्थिती आहे. कोकणच्या या बिनविरोध पॅटर्नमुळे मागच्या निवडणुकीतील विजेते आमदार आता पुन्हा विधान परिषदेत पोहोचले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये शिवसेनेच्या बाळ माने यांनी माघार घेतली. त्यामुळे अनिकेत तटकरे हे पुन्हा निवडून आले. आता विरोधक ११ जागांवर लढत असले, तरी त्यांचे मानसिक मनोधेर्य खचले आहे. त्यामुळे पुढील ११ जागांवरील निवडणूकही काही उपचारांपुरती होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची मोठी पीछेहाट झाली. त्याचे मुख्य कारण या विरोधी पक्षामधील विसंवाद हेच आहे. महाविकास आघाडीने सुरुवातीला सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता; पण मागावून सगेसोयरे निवडणुकीत असल्याने अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने माघार घेतली. महाराष्ट्रात लोकसभेला ज्या महाविकास आघाडीने महायुतीला जबरदस्त धक्का दिला होता, त्यांची त्यानंतर विधानसभा ते विधानपरिषद या सर्व निवडणुकांमध्ये झालेली पीछेहाट पाहून कार्यकर्तेही बिथरले आहेत. महापालिकांमध्ये तर जिथे शिवसेना सत्तेत आहे तिथे विरोधी पक्षाची भूमिका भाजप बजावत आहे. आणि जिथे भाजप सत्तेत आहे तिथे शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे.
कोकणात ठाणे, मिरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूरसह बहुतांश महापालिका आणि नगरपालिका हेच चित्र आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची पेसही आता सत्तारूढच घेऊ लागले आहेत. महाविकास आघाडीची दिवसेंदिवस होत असलेली पीछेहाट विरोधी पक्ष केवळ सत्तेबाहेरच नव्हे, तर सर्वच निवडणुकांमधून बाहेर जात असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. विरोधकांची गळती आता थांबणार कशी, हाच प्रश्न आहे.