पूर्वीच्या काळी गुरुकुल ही शिक्षण व्यवस्था होती. आता काही विद्यापीठे, विद्यालये विस्तारून ती कुलगुरुविणा झाली आहेत म्हणता येईल. आता द्रोणाचार्यांच्या जागी द्रोण आचार्य काही ठिकाणी अवतरलेत. डिग्री धारण केलेले बुवा पुस्तके घेऊन शाळेत बिगिन घुसत आहेत आणि महाभारत कसे घडले, याविषयी व्हिडीओफिती लावून शिकवत आहेत. ‘यांचे एक वेगळे महाभारत आहे यांना माहितीच नाही. याने आमच्या बाबांकडून फीचे ज्यादा पैसे उकळले’ एक विद्यार्थी हळूच बोलला इतिहासाच्या तासाला. महाभारतावर पडदा पडणार इतक्यात द्रोण आचार्य किंचाळले, ‘काय कुजबुज चालू आहे? ही बच्चा पार्टीसाठी चित्रफीत आहे. काळजीपूर्वक बघा.’
कमेंटधारी बालक तोंडावर हात ठेवत हसत ‘ह्यात काय काळजीपूर्वक बघायचे? जे तिथे घडले ते इथे घडतच नाही.’ पुन्हा मास्तरांनी जोरात डस्टर टेबलावर आपटले आणि खडूच्या पावडरीने डस्टर मुक्त झाला. एवढेच घडले. बाकी पोरं मास्तरांच्या कुरघोड्या करण्यात पटाईत. ती कसली ऐकतात. ‘आता एकलव्य कसा शिकतो हे सांगतो बघ कसा. हा द्रोणाचार्य असल्यासारखा. हा तर द्रोण पुढे करणारा आचार्य. फी साठी!’ पुन्हा खुसपूस; पण यावेळी मास्तरला कळू न देता.
‘इमाने ऐतबारे शिकवणारे पोरं बरोबर हेरत राहतात आणि ऐतोबा आयत्या फिती दाखवून इतिहास शिकवून जातो. त्यात न राम न सीता न भीष्म न द्रोणाचार्य समजतात पोरांना. यांचे द्रोण रिकामे होऊ नये, यासाठी शाळेत, कॉलेजात आट्यापाट्या. पोरांच्या पाट्या रिकाम्या.’ एक समंजस मुलगा मध्ये बोलला आणि त्या वर्गाची खिडकी उघडझाप करून गेली, जणू कोणीतरी त्याची भावना समजून घेतली. शिकणार्या मुलाला द्रोणाचार्य कधीच भेटत नाहीत आणि द्रोणाचार्यांना एकलव्य कधीच समजला नाही, हाच इतिहास आहे. असो.
असोसिएशन जबाबदार काय झाले की! द्रोण आचार्य भरलेला द्रोण घेऊन महिन्याकाठी परागंदा. कुठे हरवले ते दिवस असे म्हणावे वाटते. ते काळजी पोटी ज्यादाचा तास घेणारे मास्तर सगळं हरवलं असं नाही का वाटत? पूर्वी अशी डस्टर आपटण्याची मुभा नव्हती. मास्तर कान पिळून रिकामा व्हायचा! आणि अभ्यास न करण्यावर हा राग असायचा. आता राग डस्टरमध्ये बंद असतो. अवकाळी पावसाप्रमाणे विनाकारण पोरांना धुण्यासाठी! आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य धुळीत मिळवण्यासाठी!