Dasara Melava 2025 | मेळाव्यांमधील प्रबोधन! Pudhari File Photo
संपादकीय

Dasara Melava 2025 | मेळाव्यांमधील प्रबोधन!

पुढारी वृत्तसेवा

मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भाग अतिवृष्टीने ग्रस्त आहेत. सामान्य माणसाचे, शेतकर्‍याचे स्वप्नच त्यात वाहून गेले असताना आणि पूरग्रस्त, शेतकर्‍यांना मदत पुरवण्यासाठी सरकारची धडपड सुरू असताना दसर्‍याच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी मेळाव्यांचे मोहोळ उठवत आपल्या विरोधकांवर टीकेची राळ उठवली. जखमवेरची खपली काढली आणि जोरदार शेरेबाजी करत एकमेकांवर तोंडसुखही घेतले. त्याने कार्यकर्त्यांना काय बळ मिळाले, हा संशोधनाचा विषय असला, तरी सर्वसामान्य जनतेची करमणूक मात्र झाली असावी. मुळात दसरा मेळाव्यात ग्रामीण भागाच्या व शहरांच्या विकासाच्या काय कल्पना आहेत, आपण कोणत्या नव्या कल्पना राबवू इच्छितो, जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांचे कामकाज कशाप्रकारे सुधारू इच्छितो, याचे एक व्हिजन नेत्यांनी मांडणे अपेक्षित असते. त्याऐवजी व्यक्तिगत स्वरूपाची टीका आणि चिखलफेक करण्यातच मेळाव्यांचा वेळ वाया जात असेल, तर सामान्य माणसाने बघायचे कोणाकडे?

शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील दसर्‍या मेळाव्यांनी यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली आणि 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. त्यावेळी मेळाव्यासाठी दुपारपासून मुंबईतील विविध भागांतील कार्यकर्ते मिरवणुकीने शिवाजी पार्कच्या दिशेने येऊ लागले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘शिवसेनेचा जयजयकार असो’ या घोषणांनी तेव्हा आसमंत दुमदुमला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या मेळाव्याच्या अग्रभागी होते आणि या संघटनेस आशीर्वाद देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे स्वतः हजर होते. त्याशिवाय व्यासपीठावर काँग्रेसचे नेते रामराव आदिकही होते. आता यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस असला, तरी शिवतीर्थावरच मेळावा घेण्यावर उद्धव ठाकरे ठाम होते आणि त्याप्रमाणे त्यांनी पावसात भिजतच सभा घेतली. एवढे असूनही मोठ्या संख्येत शिवसैनिक सभेस उपस्थित राहिले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीचे संकेत ठाकरे यांनी दिले. ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी 50 हजारांची मदत करा, या मागणीवर भाषणाचा भर ठेवला. ही मागणी मान्य न झाल्यास मराठवाड्यासह राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात संघ-भाजपला लक्ष्य केले. मुंबईतील उबाठाची लढाई भाजपशी आहे, शिंदे शिवसेनेशी नाही, असेच संकेत त्यांनी भाषणातून दिले. ठाकरे यांच्या सभेतून विकासाच्या मुद्द्यांची चर्चाच झाली नाही, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके बोट ठेवले. ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे.

कोणाचे कोणासोबत मनोमिलन होते, याची चिंता तुम्ही बाळगू नका’, असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावरील सभेत काढले आणि आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मुंबईची सत्ता अन्य कोणाच्या ताब्यात गेल्यास शहर 25 वर्षे मागे जाईल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी दोन्ही शिवसेनेनी मोर्चेबांधणीसाठी या मेळाव्यांचे निमित्त नेमके साधले; मात्र त्यात मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा किती झाली? निवडणुकांना सामोरे जाताना मुंबईकरांच्या आशा-अपेक्षांची पूर्तता आपण कशी करणार, यावर कोणी आणि कोणते भाष्य केले, याचा शोध घेतलेला बरा! उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यातील नुकसान, मदत आणि पाहणी दौर्‍यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदारांनी पूरग्रस्तांसाठी महिन्याचे वेतन दिले आणि आर्थिक मदत सुपूर्द केली, याची नोंद घ्यावी लागेल.

महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. काँग्रेसची स्थापना मुंबईत ग्रँट रोड येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925 मध्ये कानपूर येथे झाली असली, तरी त्याच्या संस्थापकांपैकी कॉ. डांगे हे महाराष्ट्रीय नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात केली. 1956 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राने भारताला व जगाला दिलेली देणगीच होय. थोडक्यात, राजकारण आणि समाजकारण महाराष्ट्राच्या नसानसांत मुरलेले आहे. महाराष्ट्रात दसर्‍यानिमित्त विविध मेळावे होतात. संघ तर शताब्दी साजरी करत आहे. त्यांचा विजयादशमीचा सोहळा नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शेजारच्या राष्ट्रांत मोठ्या प्रमाणात अशांतता आहे; पण हिंसक उद्रेकांत इच्छित बदल घडून आणण्याची शक्ती नसते.

केवळ लोकशाही मार्गानेच समाजात आमूलाग्र बदल साध्य होऊ शकतो, हे भागवत यांचे आवाहन स्वागतार्ह आहे. पाटोदा तालुक्यातील सावरघाट येथे दसर्‍या मेळाव्यास संबोधित करताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी जातीयवादाचा राक्षस नेस्तनाबूत करा, असे आवाहन केले. मराठा आरक्षणाला आपण कधीच विरोध केला नाही, उलट समर्थनच दिले. त्यामुळे आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन त्यांनी केले; मात्र काहीजणांना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचा उदो उदो करणारे पोस्टर या मेळाव्यात झळकले, ही गोष्ट खटकण्यासारखीच, तर ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. पंकजा व धनंजय मुंडे आणि म्हणून जरांगे यांच्यात या निमित्ताने वाग्युद्धही रंगले. त्यामुळे मराठवाड्यातील वातावरण अधिकच दूषित झाले, हे नाकारता येणार नाही. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच आपली भाषणबाजी खर्ची घातली, असे म्हणावे लागेल. केवळ विरोधाचे आणि विद्वेषाचे राजकारण करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला असता, तर बरेच झाले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT