संपादकीय

लवंगी मिरची : पहाट फेरीचे प्रकार

backup backup

सकाळी सकाळी फिरायला जाणार्‍या लोकांचे साधारणत: तीन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे ज्येष्ठ नागरिक. हे जेमतेम चार तासांची रात्रीची झोप करून पहाटेच जागे झालेले असतात. काहीच काम नाही म्हणून आणि स्वतःचा फिटनेस उत्तम राहावा यासाठी फिरायला निघालेले असतात. यांची चाल अत्यंत संथ असते. बर्‍याचदा यांच्या टोळ्या असतात आणि विविध भागातून आलेले हे सीनिअर सिटीझन्स एखाद्या छोट्याशा हॉटेलवर वडा सांबार, मिसळ किंवा पोहे दाबून खात असतात.

दुसरा प्रकार म्हणजे फिटनेसबाबत जागरूक असलेले तरुण आणि मध्यमवयीन लोक. हे झपाझप चालतात. यांच्या फिरायला जाण्यामध्ये आत्यंतिक उत्साह असतो. स्पोर्ट शूज, टी-शर्ट, बर्म्युडा इत्यादी घालून ही मंडळी भल्या पहाटे फिरायला निघालेली असते. या प्रकारातील पन्नाशी गाठलेले लोक नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करत असतात. यांनी सहसा डाय लावून केस रंगवलेले असतात आणि उगाच हात गोलाकार फिरवत चालत असतात. केस विरळ असतील तर हे लोक हिवाळा, उन्हाळ्यात डोक्यावर टोपी घालणारे असतात.

तिसरा प्रकार हा डॉक्टर किंवा अन्य कुणीतरी सातत्याने दट्ट्या लावल्यामुळे फिरायला निघालेले लोक असतात. या प्रकारातील लोक सकाळी फिरायला जाणे कसे टाळता येईल, याची उत्कटतेने वाट पाहत कसेबसे सात वाजता बाहेर पडलेले असतात. सहसा यांच्या पायात चपला असतात. ज्याला कोणतीही धाड भरलेली नाही असा माणूस सहज, चुकून डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्याला सांगतात की, रोज सकाळी 45 मिनिटे चालत राहा. हे संभाषण होत असताना त्याची बुद्धिमान पत्नी सोबत असेल तर मग खैर नसते. ती सकाळी सहापासून 'उठा, फिरायला जा' असे म्हणून त्याला कोपराने ढोसत असते आणि मग तो कसाबसा अत्यंत जटिल चेहरा करून आणि ब—श वगैरे करून आहे त्या कपड्यांवर पायात चपला घालतो आणि चालायला लागतो. गाढ झोपेतून जागे होऊन फिरायला निघालेले असे लोक तारवटल्या डोळ्यांनीच घराबाहेर पडतात.

थोडा थोडा वेळ झाला की, घड्याळ पाहत झाले का पंचेचाळीस मिनिटं? असे स्वतःला विचारत कण्हत कुथत चालतात. 'पाऊले चालती' या न्यायाने वाट फुटेल तिकडे हे चालायला लागतात. कोपर्‍यावरील हॉटेलमधून खमंग मिसळीचा वास येत असेल तर यांची पावले आपोआप तिकडे वळालेली दिसतात. गरमागरम वडे, सोबत झणझणीत सांबार, तीनदा मागून घेतलेली चटणी किंवा मिसळ चापूनच हे घरी जातात. कितीही दिवस फिरले तरी यांचे वजन वाढते असते. कारण, हे रोज फक्त अर्धा किलोमीटर चालत असतात. तुम्ही कोणत्या प्रकारात बसता हे तुमचे तुम्हीच ठरवा!

कोणताही व्यायाम करताना कुठल्याही वयोगटातील व्यक्तीने खरेतर आळस बाळगूच नये! कारण, आरोग्य ही जीवनाची गुरुकिल्ली असते. मी वजन कमी करणार, फिटनेस टिकवणार, अशा बाता मारणे हे आपल्यासाठीच घातक ठरू शकते. वृद्धांना वेळच वेळ असतो, असा कांगावा करून आपल्यातील आळसाला आश्रय देणे आपल्यावर उलटू शकते. विशेषतः मध्यमवयीन लोकांमध्ये व्यायामाचा दृष्टिकोन वाढत असला तरी काल ऑफिसमध्ये खूपच वेळ झाला त्यामुळे उशिरा उठलो, अशी कारणे सांगून आपल्या शरीराचे नुकसान करत असतो, हे समजायला हवे.

तरुण आणि विद्यार्थीदशेतील मुले बॉडी बनवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, त्यातील मोजकीचे मुले त्याची कड लावत असतात; बाकी सगळे फॅशन म्हणून वेळ काढत असतात किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने बाळा, व्यायाम शरीरासाठी चांगला असतो, असे म्हटल्याने ते उगीचच लवकर उठून दिखावा करत असतात. खरेतर वृद्ध उतरत्या काळात मन रिझवण्यासाठी आणि आजारी पडलो, मुलांना त्रास होऊ नये म्हणून अथवा ज्यांना आपले शरीर थकवायचे नसते म्हणून सकाळी उठून बागेत मित्रांसमवेत गप्पा मारत असतात, याचा विसर नको!

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT