अपर्णा देवकर
आज फाल्गुन वद्य द्वितीया ‘तुकाराम बीज’. हा दिवस संतश्रेष्ठ तुकाराम यांच्या सदेह वैकुंठगमनाची स्मृती जागवणारा आहे. तुकोबारायांच्या मानवतावादी, समाजप्रबोधनात्मक, भक्तिमय जीवनकार्याविषयी...
पुणे जिल्ह्यातील देहू या पवित्र ग्रामी शके 1530 मध्ये माघ शुद्ध पंचमीला तुकोबांचा जन्म झाला. बोल्होबा आणि कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकोबांनी सबंध विश्वाच्या मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला. संत ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या या वारकरी परंपरेचे तुकोबा हे कळस ठरले. त्यांच्या हातून वारकरी संप्रदाय पूर्णतेला पोहोचला. तुकाराम महाराज मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक आणि आत्मिक शुद्धीकरणाचे महान शिक्षक होते. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या तुकोबांनी भूतदया, परोपकार, दीन-दलितांची सेवा यांचा आदर्श हजारो पिढ्यांसाठी घालून दिला. ऐहिक सुखे क्षणभंगुर आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला पांडुरंगाच्या चरणी अर्पण केले.
तुकोबारायांचे प्रारंभिक जीवन हे सामान्य गृहस्थासारखेच होते. वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी, सावकारी आणि व्यापार अत्यंत समर्थपणे सांभाळला. त्यानंतर त्यांच्या जीवनात एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू झाली. पितृछत्र हरपले, थोरल्या बंधूंच्या पत्नीचे निधन झाले आणि वैराग्य धारण करून बंधू वनात निघून गेले. सर्वात मोठा आघात झाला तो शके 1550-51 च्या भीषण दुष्काळाचा. या काळात अन्नावाचून तडफडून मरणारी माणसे आणि जनावरे पाहून तुकोबारायांचे मन विदीर्ण झाले. याच दुष्काळात त्यांची थोरली पत्नी रखुमाई आणि पुत्र संताजी यांचा अंत झाला. लोकांचे हाल पाहून तुकोबारायांंनी समाजाच्या दुःखावर फुंकर घालण्याचे ठरविले. मानवी इतिहासातील पहिला कर्जमुक्तीचा निर्णय घेणारे तुकोबाराय हेच होते. आपल्या वाटणीची कर्जखते त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली आणि सामान्य जनतेला सावकारी पाशातून मुक्त केले. पुढे संसारातून विरक्त झाल्यावर त्यांनी भामचंद्र डोंगराच्या दर्याखोर्यात ईश्वराचा शोध सुरू केला. पंधरा दिवस अन्नपाण्यावाचून चाललेल्या अखंड चिंतनानंतर त्यांना सृष्टीच्या कणाकणांत विठ्ठलाचे दर्शन झाले.
तुकोबारायांंनी अभंग रचना करण्यास सुरुवात केली. त्यांची वाणी ही साधी, सरळ पण तितकीच धारदार होती. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणार्या दांभिकतेवर प्रहार केले. ज्या ज्ञानावर काही ठरावीक लोकांची मक्तेदारी होती, ते ज्ञान त्यांनी जनसामान्यांच्या भाषेत, म्हणजेच मराठीत उपलब्ध करून दिले. देव-धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्याचा प्रयत्न केला. तुकोबा हे महान सुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी कर्मकांडापेक्षा शुद्ध आचरणाला महत्त्व दिले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...’ हा मंत्र देऊन त्यांनी मानवतेची व्याख्या स्पष्ट केली.
त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांत प्रवाशांची राहण्याची सोय केली. भुकेलेल्यांना अन्न दिले आणि जर त्यांच्याकडे स्वतःचे काही नसेल, तर ते शोधून आणत असत. तहानलेल्यांना पाणी दिले. थकलेल्या प्रवाशांचे पाय चेपून दिले. ज्यांच्याकडे जड ओझे असेल, त्यांना विश्रांती मिळावी म्हणून त्यांचे ओझे स्वतः वाहून नेले. आजारी लोकांना त्यांनी औषधे दिली आणि पचायला हलके अन्न दिले. वृद्ध, अशक्त आणि सोडून दिलेल्या गायी-बैलांना चारा-पाणी दिले.
संत नामदेव तुकोबारायांच्या स्वप्नात आलेे. ‘मी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती. ती आता तू पूर्ण कर’ असे सोबत आलेल्या पांडुरंगाच्या साक्षीने नामदेवांंनी तुकोबारायांना सांगितले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून भंडारा डोंगरावर तुकोबाराय अभंग रचना करीत बसले. एक-एक अभंग सुवर्णाच्या मोलाचा. त्यातील शब्दांनी भंडार्यावरच्या मातीचा कण न् कण पुलकित झाला. इ.स. 1650 मध्ये फाल्गुन कृष्ण द्वितीयेला ते पंढरीरायाच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले, असे म्हटले जाते. आजही या दिवशी मध्यान्ही देहूतील नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो, अशी लोकधारणा आहे आणि यावेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते. जणूकाही इतर पशु-पक्षी, झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात.