डोक्यातील किडे वळवळणारा ट्रम्प तात्या भारताला हिनवण्याची एकही संधी सोडत नाहीये. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी त्याचा आटापटा सुरू आहे. नुकतेच ट्रम्प तात्याने भारतीय अर्थव्यवस्था डेड म्हणजे मृतप्राय झालेली आहे असे म्हटले आहे. फारसे काही चढ-उतार न होता अर्थव्यवस्था ठप्प होणे याला डेड होणे असे म्हणतात.
घटस्थापना होण्याआधी असे बोलणार्या ट्रम्प तात्याला भारतीय जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. जीएसटी रेट कमी झाल्यामुळे म्हणा किंवा लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे म्हणा, फक्त कार किंवा ऑटोमोबाईल मार्केटवर लक्ष टाकले तर स्थिती लक्षात येईल. सुमारे 7.8 असा भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा वेग आहे. दुष्काळ, पूर, युद्ध अशा संकटांना न जुमानता देश आगेकूच करत आहे. 22 सप्टेंबरनंतर म्हणजेच नवीन जीएसटी पर्व सुरू झाल्यानंतर किती कारची खरेदी-विक्री झाली याचे आकडे जरी अमेरिकेने पाहिले तर त्यांचे डोळे पांढरे होतील. नवरात्रीच्या शुभारंभाच्या दिवशी एका कंपनीने 35 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात सुमाते 30 हजार गाड्यांची डिलिव्हरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एवढेच नव्हे तर 80 हजार नवीन गाड्यांची इन्कवायरी व गेल्या तीन दिवसांत दररोज सुमारे 15 हजार गाड्यांच्या बुकिंग्सची नोंद झाली आहे.
अन्य एका प्रसिद्ध कंपनीने 11 हजार डिलर बिलिंग्स करत गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च यश नोंदवले आहे. दुसर्या एका कंपनीने पहिल्या माळेला 10 हजार गाड्या विकल्या आहेत, तर अजून 22 हजार नवीन गाड्यांची इन्कवायरी झाली आहे. बहुतांश कंपन्यांचीही विक्रीची आकडेवारी जबरदस्त आहे.
हे आकडे केवळ गाड्यांच्या विक्रीपुरते नाहीत, तर भारताच्या वाढत्या खरेदी शक्तीचे, सक्षम मध्यमवर्गाचे आणि मजबूत अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवणारे आहेत. मेक इन इंडिया व स्वदेशी उद्योगांना मिळालेला पाठिंबा यामुळेच आज भारत आत्मनिर्भरतेकडे झेपावणारा, जगाच्या बाजारपेठेत नवे मानदंड प्रस्थापित करणारा देश ठरतो आहे.
भारताचा असा अकारण राग करणार्या ट्रम्प तात्यांना देशाने हे दिलेले उत्तर आहे. यावरही ते शांत बसले नाहीत तर त्यांना उत्तरे मिळत राहतील यात शंका नाही. ट्रम्प तात्या आपल्या वागण्यातून जगाला वेठीस धरत आहे. महासत्ता आहे म्हणून अमेरिकेने काही निर्णय घ्यावा आणि अन्य देशांनी तो का स्वीकारावा. चीनने मात्र अमेरिकेची चांगलीच जिरवली आहे. आता भारतानेही स्वदेशीचा नारा देत अमेरिकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारतवासीयांनीही नारा उचलून धरला तर अमेरिकेला भविष्यात गुडघे टेकायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की! यासाठी सर्वांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवायला हवी. वेळ काही कायम राहात नाही. ती बदलत असते, हे ट्रम्प तात्यांनी लक्षात घ्यायला हवे.