अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच समाजमाध्यमांवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर करत ‘आपण भारत आणि रशियाला चीनसमोर गमावले आहे. त्यांचे एकत्र भविष्य दीर्घ आणि समृद्ध असो’, अशी उपरोधिक टिप्पणी केली होती. पण ट्रम्प यांनी लगेच डॅमेज कंट्रोल करत झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. तो करताना ‘मोदी माझे मित्र आहेत आणि ते यापुढेही मित्र राहतील. भारत-अमेरिकेचे संबंध खास असून, दोन्ही देशांतील संबंधांत काळजी करण्यासारखे काहीही नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भारताची मोठी बाजारपेठ गमवावी लागल्यास अमेरिकेचेच वांदे होतील, याचे उशिरा का होईना, त्यांना आकलन झाले असावे. भारत आणि पाकिस्तान युद्ध आपण थांबवले, असा दावा त्यांनी वारंवार करूनही, पाकिस्तानने गुडघे टेकवल्यानंतरच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले, असे पंतप्रधान मोदी यांनी ठणकावून सांगितले होते.
आयात शुल्काच्या प्रश्नावरून भारत-अमेरिका संबंधांत अंतर निर्माण झाले. मात्र दोन्ही देशांदरम्यान विशेष संबंध असून, वादाचे क्षण उद्भवत असतात. त्यावरून चिंता करण्याचे कारण नाही. मोदी हे थोर पंतप्रधान असून, ते सदैव मित्र राहतील, अशाही भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर लगेचच मोदी यांनी, ट्रम्प यांनी केलेले मूल्यमापन सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त केली. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादले. अमेरिकन सरकारचे व्यापार सल्लागार पीटर नाव्हारो यांनी तर भारताविरोधात वक्तव्यांचा भडिमारच सुरू केला.
भारत रशियाकडून तेल खरेदी करून फायदा कमावतोय, रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी भारत रशियाकडून कोणतेही तेल खरेदी करत नव्हता, अशी टीका नाव्हारो यांनी केली आहे. भारत अमेरिकेकडून येणार्या मालावर चढे कर लावून, तेथील उद्योग संपवत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या रोजगारावर प्रतिकूल परिणाम होत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. भारतास रशियाकडून तेल खरेदी करून इंधनाची गरज भागवण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय कायद्यानेच दिला आहे, हे अमेरिका सोयीस्कररीत्या विसरते. खुद्द अमेरिका रशियाकडून अब्जावधी डॉलरचा माल व युरेनियम आयात करत असताना, भारतास उपदेश करण्याचा नैतिक अधिकार अमेरिकेस कोणी दिला, असा प्रश्न अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी नाव्हारो यांना विचारला. गेल्या आठवड्यात ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची चीनमधील तियानजिन येथे शिखर परिषद पार पडली. तेव्हापासून अमेरिकेविरोधात चीन, रशिया आणि भारत एकत्रितपणे आघाडी उभारत आहेत, असा समज ट्रम्प यांनी करून घेतला होता.
वास्तविक 2001 साली चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटनेत सामील झाले. युरेशियात राजकीय, आर्थिक व आंतरराष्ट्रीय सुरक्षितता निर्माण करणे, हा या संघटनेचा उद्देश. अमेरिकेच्या विरोधात आघाडी उभारणे, हा तिचा हेतूच नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या सारख्यांनी असा गैरसमज करून घेणे, हे मूर्खपणाचेच होते. 21 फेब—ुवारी 1972 रोजी अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केला. त्यापूर्वी 23 वर्षे अमेरिका व चीनमध्ये कोणतेही राजनैतिक संबंध नव्हते. त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीतयुद्ध शिगेस पोहोचले होते. चीन व रशियाचे संबंध बिघडले होते.
अशावेळी चीनशी मैत्री केल्यास सोव्हिएत रशियाला योग्य ते संकेत धाडले जातील, असा निक्सन यांचा आडाखा होता. त्यांच्या या चीन दौर्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी गुप्तपणे चीनला भेट देऊन, पंतप्रधान चौ एन लाय यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या. भारत-चीन युद्ध होऊन जेमतेम दहा वर्षेच झाली होती. अशावेळी निक्सन यांच्या या दौर्यामुळे एकप्रकारे अमेरिकेने आपल्याशी शत्रुत्व केले, असे भारतास तेव्हा वाटले नव्हते. अमेरिका व चीन भारताविरोधात मोहीम उभारत आहेत, असा कोणताही गैरसमज तेव्हा करून घेतला नव्हता.
ट्रम्प यांची धोरणे लहरी व हडेलहप्पी स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिका जगभरात जितकी निर्यात करते, त्यापेक्षा कितीतरी अधिक आयात जगातील विविध देशांतून अमेरिकेत होत असते. 2024 मध्ये यातील तफावत 1 लाख 20 हजार कोटी डॉलर इतकी होती. ही व्यापार तूट भरून काढण्यासाठी अमेरिकेत विकल्या जाणार्या भारतासारख्या देशांतून आयात वस्तूंवर अधिक कर लावायला पाहिजे हे ट्रम्प यांचे मत. त्यांची समजशक्ती कमी आहे की, ते जाणीवपूर्वक हा युक्तिवाद पुढे रेटत आहेत, ते कळायला मार्ग नाही. कारण या अमेरिकन व्यापार तुटीच्या रकमेच्या दुप्पट निर्यात अमेरिकेतील विविध सेवांच्या मार्गे इतर देशांत होत असते. त्यामुळे ट्रम्प यांचे तर्कटच चुकीचे आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांत अमेरिकेकडून भारताने एफ-35 विमाने, स्ट्रायकर युद्धवाहने, प्रिडेटर ड्रोन्स, खनिज तेल, नैसर्गिक वायू, द्रवभूत वायू, लहान अणुभट्ट्या, रोबोट तसेच क्वांटम, बायोटेक, सेमीकंडक्टर तंत्रज्ञानासाठी आवश्यक घटक आदी खरेदी करण्याचे मान्य केले.
अमेरिकन बर्बन व्हिस्की आणि वाइन्सवर भारताने कर कपात केली. दोन्ही देशांतील 10 हजार कोटी डॉलरची व्यापार तूट कमी व्हावी यासाठी ट्रम्प यांच्या या मागण्या मान्य केल्या. एवढे करूनही ट्रम्प यांचे समाधान झालेले नाही. भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, इराणशी व्यापार संबंध ठेवू नये वा चीनशी दोस्ती करू नये, अशीच ट्रम्प यांची इच्छा आहे. या दबावापुढे भारत झुकत नाही, हे पाहिल्यानंतर आता मात्र ट्रम्प यांना मोदी हे मित्र असल्याचा साक्षात्कार झाला असावा. पाकिस्तान आणि भारतास एकाच तागडीत तोलण्याचे कोते राजकारण करणार्या ट्रम्प यांनाच भारतापुढे नमते घ्यावे लागणार असे दिसते!