सर्किट तात्या..! (Pudhari File Photo)
संपादकीय

Trump Funny Comparison | सर्किट तात्या..!

मित्रा, तू काहीही म्हण; पण हा ट्रम्प तात्या मला चक्क सर्किट माणूस वाटत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मित्रा, तू काहीही म्हण; पण हा ट्रम्प तात्या मला चक्क सर्किट माणूस वाटत आहे. जगातील सर्वात मोठ्या महासत्तेचा क्रमांक एकचा पावरफुल्ल माणूस म्हणजे ट्रम्प तात्या. एवढ्या मोठ्या पदावर बसलेला माणूस किती जबाबदार असला पाहिजे नाही? तात्याचं तसं काहीच नाही. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा सगळा प्रकार आहे. मागचा-पुढचा विचार न करता डोक्यात येईल तो निर्णय तो घेऊन टाकत असतो.

हे बघ भावा, ट्रम्प तात्याची ही काही पहिली कारकीर्द नाही. यापूर्वी चार वर्षे तो अमेरिकेचा अध्यक्ष होता, तेव्हा त्याने अशाच पद्धतीने कारभार चालवला होता. हे सर्व माहीत असूनही अमेरिकन लोकांनी त्याला निवडून दिले, याचे मला आश्चर्य वाटते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासात इतका बेभरवशाचा आणि तुघलकी कारभार असलेला राष्ट्राध्यक्ष कुणी झालेला नव्हता. तात्याने आपल्याला जबर कर लावला आहे.

ते तर सर्वांनाच माहीत आहे. भारताची प्रगती कुणालाच पाहवत नाही. कधीकाळी अविकसित असलेले हे राष्ट्र आज प्रगतिशील राष्ट्र होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, याचा तात्याला राग आहे.

ते कारण आहेच; पण ते काही मुख्य कारण नाही. ट्रम्प तात्याला नोबेल प्राईज पाहिजे आहे. शांततेचे नोबेल प्राईज मिळावे म्हणून त्याचा आटापिटा चालू आहे. बर्‍याच देशांमध्ये त्यांनीच भांडणे लावली आणि ती मिटावीत, यासाठी पुढाकारही त्यांनीच घेतला. पाकिस्तान घाबरल्यामुळे भारत-पाकिस्तान होणारे युद्ध टळले; पण ट्रम्प तात्यांनी तत्काळ स्वतःच पुढाकार घेत आपणच ते थांबवले अशी दवंडी पेटवली. युक्रेन रशिया युद्ध थांबवायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला; परंतु रशियाने ट्रम्प तात्याला जुमानले नाही. रशियाकडून इंधन आयात करू नये, यासाठी तात्या भारतावर दबाव आणत होता. भारताने तात्याला जुमानले नाही. कारण, शेवटी भारताला स्वतःचा फायदा पाहावा लागणार आहे. रशियाकडून इंधन घेणे स्वस्त पडते म्हणून आपण त्यांच्याकडून इंधन घेतो, याचा राग आल्यामुळे तात्याने आपल्याला आपल्यावर जबर कर लावला. शिवाय त्यांची अशी इच्छा होती की, नोबेल पुरस्कारासाठी भारताने ट्रम्प तात्याची शिफारस करावी. भारताने ही मागणी साफ फेटाळल्यामुळे तात्या चिडला आणि तात्याने भारतावर टॅक्स लावला.

हे बघ, तात्याने टॅक्स लावला, तरी भारत घाबरेल असे काही वाटत नाही. त्यामुळे आपला फायदा असा झाला की, भारत आणि चीन एकमेकांच्या जवळ आले आणि कदाचित उद्या एकमेकांचे चांगले व्यापारी मित्रही होतील. नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प तात्या हपापलेला असेल, तर त्याला तो न मिळालेलाच बरे. एकदाचे अमेरिकन लोकांना समजून येईल की, राष्ट्राध्यक्ष काय लायकीचा आहे ते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT