जागतिक भूराजकीय अस्थिरतेचे धक्के अर्थकारणाला बसणे साहजिक असते आणि ते गृहितही असते. मात्र अमेरिकेच्या, विशेषतः तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी धोरणामुळे ते तीव्रतेने जाणवू लागले असून शेअर बाजार किंवा सोने-चांदी बाजारातील चढउताराचे ते एक मुख्य कारण ठरले आहे. ज्यावेळी जगात युद्धाचे व अस्थिरतेचे ढग पसरू लागतात, तेव्हा शेअर बाजारात घसरगुंडी होत असते. उलट अशा उतरत्या काळात लोक किंवा गुंतवणूकदार सुरक्षितता म्हणून सोने आणि चांदी खरेदी करू लागतात. कारण संकटाच्या वेळी सोन्या-चांदीचा आपल्याला अधिक उपयोग आहे, अशी जनभावना असते. त्यामुळे अमेरिका आणि ग्रीनलँडमधील विषय तापला असताना निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सोने-चांदी तेजीत होती. ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी अमेरिका बळाचा वापर करणार नाही, असे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत दिले. त्यामुळे गुरुवारी लगेचच शेअर बाजारात उत्साह संचारल्याचे दिसून आले. मात्र ग्रीनलँडचे संरक्षण केवळ अमेरिकाच करू शकते, असेही त्यांनी सूचित केले. त्यांचा पवित्रा आक्रमक आहे. म्हणूनच सोने-चांदी बाजारावर या वक्तव्याचा कोणताही परिणाम न होता उलट बाजार वधारला.
अमेरिकेचे नवीन विस्तारवादी धोरण आणि त्यामुळे वाढत्या भूराजकीय तणावामुळे मंगळवारी सेन्सेक्स 1066 अंशांनी कोसळून तो 82 हजारांखाली गडगडला होता. तो आता सावरताना दिसतो. ही अस्थिरता तूर्त तरी काहीशी निवळत चालली असल्याचा अर्थ त्यातून काढता येतो. त्यापूर्वी अमेरिकेने इराणला धडा शिकवण्याची भाषा केली, तेव्हादेखील सराफ बाजारात तेजीचेच वातावरण होते. गेल्या गुरुवारी सोने दीड लाखापार गेले आणि एकाच दिवसात 22,660 रुपयांची वाढ झाल्याने चांदी 3 लाख 30 हजारांच्या पार गेली. सोन्याने जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम 1,55,000 रुपयांची सीमा पार केली. नवीन वर्षात आतापर्यंत चांदीच्या भावात 87 हजार रुपयांची वाढ झाली. चांदीची चमक दिवसेंदिवस वाढत चालली असून, सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंडानेही उच्चांकी पातळी गाठली. मार्च महिन्यातील चांदीच्या फ्युचर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली असून, त्याने प्रति किलोग्रॅम 3,18,729 रुपयांचा ऐतिहासिक विक्रम गाठला.
अमेरिका आणि युरोपीय युनियनमधील तणाव वाढल्यामुळे चांदीची भरधाव तेजी सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणारा मौल्यवान धातू म्हणून चांदीने स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीने तर 95 डॉलरची विक्रमी पातळी गाठली. सिल्व्हर ईटीएफ 7 टक्क्यांहून अधिक वाढून प्रति युनिट 308.37 वर पोहोचला. अन्य कंपन्यांचे काही ईटीएफ प्रत्येकी 5 टक्क्यांनी वधारले. जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँका आपापल्या गंगाजळीतील सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्यामुळे मागच्या तीन आठवड्यांत सोन्याच्या किमतीत 24,200 रुपयांची वाढ झाली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 मध्ये केवळ 4.02 टन सोने खरेदी केले. गेल्या आठ वर्षांचा विचार करता, ते फारच कमी आहे. 2024 मध्ये रिझर्व्ह बँकेने 72 टन सोने खरेदी केले होते. या गोष्टीचादेखील बाजारपेठेवर परिणाम होत असतो. रिझर्व्ह बँकेकडे एकूण 880 टन सोने आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलनसाठ्यातील सोन्याचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. भारताच्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी 52 टन सोने देशात सुरक्षित आहे. तर 348 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. सोन्याच्या किमतीचा विचार करता 2022 पासून दरात 175 टक्क्यांची वृद्धी झाली. 2025 मध्ये सोन्याच्या किमती 65 टक्क्यांनी वधारल्या. सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले. जागतिकीकरणामुळे विविध घटनांचा वेगवेगळ्या बाजारपेठांवर लगेचच परिणाम होत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरीकडे, भावातील तेजीमुळे सोने तारण ठेवून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलले जात आहे.
सोने तारण कर्जावरील एनपीएमध्ये 28 टक्क्यांची वाढ झाली असून, येणे कर्जांत 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. या थकबाकीमध्ये व्यापारी बँकांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांची ही थकित रक्कम 2040 कोटी रुपये असून, वित्तीय कंपन्यांची थकबाकी 4784 कोटी रुपये आहे. भविष्यात असेच घडत राहिल्यास या बँका व कंपन्या संकटात येऊ शकतात. बँकांनी आणि एनबीएफसीजनी 11 लाख कोटी रुपयांवर सोने तारण कर्जे दिली आहेत. रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँका व एनबीएफसीजनी गोल्ड लोन्सबद्दलची आपली धोरणे व ती देण्याची प्रक्रिया यांचा फेरआढावा घेण्याची सार्थ सूचना केली आहे. याबाबत बाहेरील व्यक्तींची वा कंपन्यांची सल्ला-सेवा घेण्यात येणार असेल, तर त्यावर सोने तारण कर्ज देणार्या बँकेने अथवा एनबीएफसीने नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे.
संबंधितांनी या सूचनेचे पालन केले पाहिजे. यापूर्वी अनेक ऋणको 9 ते 12 टक्के व्याज बँकांना देऊन, गहाण ठेवलेले दागदागिने पुन्हा गहाण ठेवत असत. मूळ मुद्दलाची रक्कम न देता येणे कर्जाच्या रकमेत त्यामुळे वाढ होत असे. गेल्या सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँका व एनबीएफसीजना आदेश दिले. परिणामी आता जर सोने फेरगहाण ठेवायचे असेल, तर ऋणकोंना मुद्दलाची पूर्ण रक्कम आणि व्याज द्यावे लागते. त्यानंतरच कर्जाची मुदत वाढवण्याची विनंती करता येते. तसेच सोने-चांदी किंवा एक्स्चेंज क्रेडिट फंड वा म्युच्युअल फंडांच्या युनिटस्च्या आधारे कोणताही अॅडव्हान्स देण्यास रिझर्व्ह बँकेने मज्जाव केला आहे. तसेच सोन्याच्या किमतीच्या 75 टक्केपेक्षा जास्त कर्ज देऊ नका, असेही बजावण्यात आले आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. याचे कारण म्हणजे ती सहजपणे मिळतात. सोन्या-चांदीच्या भाववाढीमुळे हुरळून जाण्याचे कारण नाही. जगभरात व्यापारयुद्धे व थेट युद्धे सुरू असल्याचाच तो परिपाक आहे.