Iran America's conflict | उजाडले, सूर्य कुठे? (Pudhari File Photo)
संपादकीय

Iran America's conflict | उजाडले, सूर्य कुठे?

पुढारी वृत्तसेवा

इराणबरोबरच्या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेमुदत युद्धविरामाची घोषणा केली. चर्चा आणि वाटाघाटीतून या संघर्षात मार्ग निघेपर्यंत, अंतिम तोडगा होईपर्यंत हा युद्धविराम असेल. अमेरिकेने हल्ले थांबवले आणि शस्त्रे म्यान केली, हा एक भाग झाला. तथापि, ट्रम्प यांनी यात एक मेख मारली आहे. ती म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनीतील नौदल नाकेबंदी चालूच ठेवण्याची. म्हणजे युद्धविरामाची घोषणा करताना ट्रम्प यांनी दुटप्पी भूमिका कायम ठेवली. ती त्यांच्या आजवरच्या स्वभावाला धरूनच आहे. नाकेबंदीमुळे इराणवर टांगती तलवार कायम आहे. नेमका त्यालाच इराणणे आक्षेप घेत वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायला असमर्थता दर्शवली. म्हणजे पुन्हा आहे तिथेच आहे. त्यामुळे उजाडले, तथापि, सूर्य कुठे आहे, प्रत्यक्षात युद्धबंदी कुठे झाली आहे, युद्ध थांबले कुठे आहे, अशीच विद्यमान परिस्थिती आहे. ट्रम्प यांची आडमुठी भूमिकाच त्याला कारणीभूत आहे.

इराणने युरेनियम संवर्धन बंद करावे, युरेनियमचा साठा हस्तांतरित करावा, अण्वस्त्र सुविधा संपुष्टात आणाव्यात, ही इराणवरील हल्ल्यामागची अमेरिकेची भूमिका आणि त्यासाठी इस्रायलने त्यांना चिथावणी दिली. व्हेनेझुएलाप्रमाणे इराण सहज कब्जात घेऊ अशा घमेंडीत ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचे अतिरेकी आणि आततायी पाऊल उचलले; पण दोन महिने होत आले, तरी इराण नमलेला नाही. इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांची अमेरिकेने हत्या घडवून आणली. त्यानंतरही अनेक प्रमुख नेते, अधिकार्‍यांच्या हत्या करण्यात आल्या. त्यातून इराणमध्ये अशांतता घडेल आणि आपला हेतू साध्य होईल, ही ट्रम्प यांची अपेक्षा होती. इराणमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले युवराज पहलवी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होते. तथापि, त्यांचा होरा चुकला आणि इराणमध्ये सत्तांतर झाले नाही. उलट राष्ट्रप्रमुखांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या हत्येने इराणमध्ये अमेरिकेविरोधात संतापाची लाट उसळली. प्रत्युत्तर द्यायचा इराणने निर्धार केला आणि संघर्षाला तोंड फुटल्यापासून त्यात कसूर ठेवलेली नाही.

जगातील सर्वात मोठे लष्कर, नौदल, हवाई दल आणि प्रचंड शस्त्रसामग्री असणार्‍या अमेरिकेला इराणचे हे प्रत्युत्तर चांगलेच महागात पडलेले आहे. ट्रम्प यांनी अनेक गर्जना केल्या; पण दरवेळी एकदा आक्रमक घोषणा करायची आणि लगेचच नरमाईचे धोरण जाहीर करायचे, अशा धरसोड वृत्तीशिवाय त्यांच्याकडून काहीही साध्य झालेले नाही. अमेरिकेच्या जाळ्यात इराण न सापडता अमेरिकाच या चक्रव्यूहात गुंतल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आणि त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर आणि अपरिहार्यपणे जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. इराणी राज्यकर्त्यांनी या सामुद्रधुनीचा शस्त्र म्हणून अचूक वापर केला. अमेरिकेने इराणला शह द्यायचा म्हणून सामुद्रधुनीत नौदल नाकेबंदी केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली, तरी त्यातून अमेरिकेला अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही.

उलट पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेला वाटाघाटीचा घाट घालावा लागला आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव अहंकारी. निर्णयात धरसोड वृत्ती. इराण प्रकरणात युरोपियन राष्ट्रांनीही त्यांना साथ दिली नाही. ट्रम्प यांची भाषा उद्दाम. ती कोणी सहन करणार नाही. आपण हुकूम केला की, युरोपियन देश आपल्या मागे येतात, हा ट्रम्प यांचा विश्वास. तथापि, ट्रम्प यांनी आततायीपणा करावा आणि त्याला आपण ‘मम’ म्हणावे, अशी युरोपियन राष्ट्रांची मानसिकता आता राहिलेली नाही. हे शेखचिल्लीप्रमाणे स्वप्ने पाहणार्‍या ट्रम्प यांच्या ध्यानी आले नाही. त्यामुळे त्यांना मनगट चावीत बसण्यापलीकडे काही करता आले. त्यांनी डोळे वटारूनही काही फायदा झाला नाही. युरोपियन देशांनी ट्रम्प यांना वार्‍यावर सोडले. स्पेनसारख्या छोट्या राष्ट्रानेही ट्रम्प यांना मूँहतोड जवाब दिला. यातून ट्रम्प यांच्याविषयी जगामध्ये काय भावना आहेत, हेच स्पष्ट झाले.

या सार्‍या धामधुमीत रशिया आणि चीन या बलाढ्य देशांची इराणला सहानुभूती असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी अमेरिकेच्या कारवायांना उत्तर द्यावे, अशी त्यांची तयारी दिसत नाही. या प्रयत्नात अमेरिकेचे हसे होत आहे आणि त्यांचा युद्ध खर्च वाढत आहे. त्यामुळे चीन, रशिया यांना आनंदाच्या उकाळ्या फुटत असतील, तर त्यात आश्चर्य नाही. इराणमध्ये चीनचे हितसंबंध आहेत आणि परिस्थितीने गंभीर वळण घेतले, तर चीन शांत बसेल असे नाही. चीनने हस्तक्षेप केला, तर या संघर्षाला नवा आयाम प्राप्त होईल. तसेच मध्यपूर्वेवर सध्या जे अमेरिकेचे अनिर्बंध वर्चस्व आहे, त्यालाही धक्का बसेल. रशियाचे अरब राष्ट्रात हितसंबंध आहेत. नव्या गंभीर घटना घडल्या, तर रशियाही स्वार्थ साधण्यासाठी हालचाली करू शकतो. तसे झाले, तर या भागातील प्रादेशिक तोल बिघडून जाईल आणि त्याचा दीर्घकाळ परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेने या भावी घटनांची किती दखल घेतली आहे, याची कल्पना नाही; पण ट्रम्प यांच्या नेतृत्वाने एकूणच अमेरिकेला अडचणीत आणले आहे. त्यांचा हा चौखूर वारू कोणी रोखेल असे दिसत नाही. त्याची फळे अमेरिकेला भोगावी लागतीलच; पण सुदैवाने सार्‍या जगालाच त्याचे कमी-अधिक परिणाम भोगावे लागतील. या संघर्षाने जगभर महागाईचा वणवा उद्भवला आहे. शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम झाला आहे. या संघर्षाची झळ सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. छोट्या व्यावसायिकांना चटके सोसावे लागत आहेत. या सार्‍याला ट्रम्प यांचे आक्रस्ताळे, आगाऊ नेतृत्वच जबाबदार आहे. इतिहासात अनेक लहरी, क्रूरकर्मा राज्यकर्ते होऊन गेले; पण ट्रम्प यांनी आपल्या बेमुर्वत, हट्टाग्रहापोटी सार्‍या जगालाच वेठीस धरले. आताही बेमुदत युद्धविरामाची घोषणा करताना सामुद्रधुनीतील नौदल नाकेबंदी चालूच ठेवण्याचा ट्रम्प यांच्या दुटप्पी भूमिकेने तोडगा द़ृष्टिपथात येणारच नाही. ट्रम्प आणि अमेरिकेला ते कळत नसेल, असे नाही; पण आपले ते खरे करण्याच्या नादात ट्रम्प यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे, हेच भावी इतिहासात नोंदले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT