अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डी. सी.
इराणने दिलेल्या आक्रमक प्रतिसादाचा अंदाज चुकल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन कोंडीत सापडले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी इराणच्या युद्धातील प्रतिसादाचा चुकीचा अंदाज लावल्याने ही महासत्ता एका अभूतपूर्व चक्रव्यूहात सापडली आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यापूर्वीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा बाजारातील जोखीम ही तात्पुरती चिंता असल्याचे सांगून तिला कमी लेखले होते. यावेळी इराण आर्थिक युद्ध छेडू शकतो आणि जगातील जवळपास 20 टक्के तेल वाहून नेणार्या समुद्री मार्गांना बंद करू शकतो, हे धोक्याचे इशारे त्यांनी फेटाळून लावले.
मात्र, या चुकीच्या अंदाजाची तीव्रता आणि त्यामुळे होत असलेले नुकसान अलीकडच्या काही दिवसांत स्पष्ट झाले. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्या व्यापारी तेलवाहू जहाजांवर गोळीबार करण्याची धमकी दिली. त्यामुळे आखातातील व्यापारी जहाजांची वाहतूक थांबली. तेलाच्या किमती वाढल्या आणि अमेरिकन नागरिकांसाठी पेट्रोल महाग होण्यास कारणीभूत ठरलेल्या आर्थिक संकटाला आळा घालण्यासाठी ट्रम्प प्रशासन आता धडपड करू लागले. ही घटना ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी इराणच्या संभाव्य प्रतिक्रियेचा किती चुकीचा अंदाज लावला होता, याचे प्रतीक मानली जात आहे. मागील वर्षी जूनमध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धाच्या तुलनेत यावेळी इराणने खूपच आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी अमेरिकन लष्करी तळांवर, अरब देशांतील शहरांवर आणि इस्रायलमधील नागरी भागांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या मालिकाच डागल्या. त्यामुळे अमेरिकेला धोरणांमध्ये बदल करावे लागले.
काही दूतावासांमधून कर्मचार्यांना त्वरेने बाहेर काढण्याचे आदेश देणे, पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी नवी धोरणे तयार करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. ट्रम्प प्रशासनाने काँग्रेस सदस्यांना बंद दाराआड माहिती दिल्यानंतर डेमोक्रॅटिक सिनेटर ख्रिस्तोफर एस. मर्फी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, होर्मुझ सामुद्रधुनीबाबत प्रशासनाकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि ती सुरक्षितपणे पुन्हा खुली कशी करावी, हेही त्यांना माहीत नाही. प्रशासनातही काही अधिकारी युद्ध संपवण्यासाठी स्पष्ट रणनीती नसल्यामुळे निराश होत आहेत; मात्र ट्रम्प यांनी वारंवार या लष्करी मोहिमेला ‘पूर्ण यश’ घोषित केले असल्याने ते थेट नाराजी व्यक्त करण्यास टाळत आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, ‘युद्ध सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडे ‘मजबूत योजना’ होती. इराणी शासनाने तेलबाजारात केलेला हा हेतुपुरस्सर व्यत्यय अल्पकालीन आहे.
या दहशतवादी शक्तींना आणि अमेरिकेसह जगाला असलेल्या त्यांच्या धोक्याला कायमचे संपवण्यासाठी ही किंमत मोजावी लागेल.’ संरक्षणमंत्री पीट हेगसेठ यांनी मान्य केले की, शेजारी देशांविरुद्ध इराणने दिलेला तीव्र प्रतिसाद पेंटागॉनला काहीसा अनपेक्षित होता. ते नेमकी अशीच प्रतिक्रिया देतील, असा अंदाज नव्हता; पण ती शक्यता आहे, हे ठाऊक होते.’ तेलपुरवठ्यावर होणार्या परिणामामुळे ट्रम्प नाराज होत आहेत. त्यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, तेलवाहू जहाजांच्या चालकांनी ‘थोडे धाडस दाखवून’ होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास सुरू ठेवावा. तेलाच्या किमती वाढू शकतात, याबद्दल माहिती देण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी ही शक्यता मान्य केली; पण ती तात्पुरती समस्या असल्याचे सांगितले. त्यांनी ऊर्जामंत्री राईट आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांना तेलाच्या किमती वाढल्यास पर्यायी उपाययोजना तयार करण्याचे निर्देश दिले; मात्र या पर्यायांबद्दल उदाहरणार्थ अमेरिकन सरकारच्या पाठबळावर राजकीय जोखीम विमा योजना किंवा अमेरिकन नौदलाकडून जहाजांना सुरक्षा देणे ट्रम्प यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर 48 तासांहून अधिक काळ सार्वजनिकपणे काहीही सांगितले नाही आणि अजूनही नौदलाच्या संरक्षणाखाली जहाजांची ने-आण सुरू झालेली नाही. मंगळवारी संध्याकाळी अमेरिकन लष्कराने सांगितले की, त्यांनी सामुद्रधुनीजवळ इराणच्या स्फोटके पेरणार्या 16 जहाजांवर हल्ला केला.
वॉशिंग्टनमधील रिपब्लिकन नेत्यांना तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता वाटू लागली आहे. मध्यावधी निवडणुकांपूर्वी मतदारांसमोर आर्थिक धोरणे मांडताना याचा फटका बसू शकतो. ट्रम्प यांनी सार्वजनिक आणि खासगी चर्चेत वारंवार सांगितले आहे की, व्हेनेझुएलाचे तेल इराण युद्धामुळे निर्माण होणार्या तुटवड्याला काही प्रमाणात भरून काढू शकते. प्रशासनाने मंगळवारी टेक्सासमध्ये नवी रिफायनरी उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलपुरवठा वाढेल आणि इराणमुळे तेलबाजारावर दीर्घकालीन परिणाम होणार नाही, असा अधिकार्यांचा दावा आहे.
युद्धातून बाहेर पडण्याचा संभाव्य मार्ग
इराण युद्ध सुरू झाल्यापासून ट्रम्प यांचा संदेश सातत्यपूर्ण राहिलेला नाही. खासगीत त्यांच्या सहकार्यांनी सांगितले की, लष्करी मोहिमेची उद्दिष्टे जनतेसमोर स्पष्टपणे मांडण्यात ट्रम्प शिस्त राखत नाहीत. ट्रम्प यांनी कधी युद्ध एका महिन्यापेक्षा जास्त काळ चालू शकते, असे म्हटले, तर कधी ते ‘पूर्ण झाले आहे’ असेही सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका ‘पूर्वीपेक्षा अधिक निर्धाराने पुढे जाईल.’ दुसरीकडे रुबिओ आणि हेगसेथ यांनी तीन स्पष्ट उद्दिष्टांवर आपले संदेश केंद्रित केले आहेत. रुबिओ यांनी सांगितले, ‘या मोहिमेची उद्दिष्टे स्पष्ट आहेत. इराणची क्षेपणास्त्रे आणि त्यांची प्रक्षेपण व्यवस्था नष्ट करणे, ती बनवणार्या कारखान्यांचा नाश करणे आणि त्यांच्या नौदलाची क्षमता संपवणे.’ अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ही तीन उद्दिष्टे अधिकृत सोशल मीडिया खात्यावर बुलेट पॉईंटस्मध्येही प्रसिद्ध केली. रुबिओ यांचे हे सादरीकरण राष्ट्राध्यक्षांना लवकरच युद्ध समाप्त करण्यासाठी मार्ग तयार करत असल्याचे मानले जाते. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराने इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता आणि नौदल आधीच उद्ध्वस्त केले असल्याचा दावा केला. इराणी नेतृत्वाने जगाचा ऊर्जापुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर आणखी कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. गेल्या आठवड्याच्या शेवटापासून युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. तेल किमती वाढत आहेत. पेंटागॉनच्या गोपनीय माहितीनुसार युद्धाच्या केवळ पहिल्या दोन दिवसांतच 5.6 अब्ज डॉलर किमतीची दारुगोळा सामग्री वापरली गेली. इराणी अधिकारी अजूनही जगाच्या तेलपुरवठ्यावर असलेल्या आपल्या प्रभावाचा वापर करून अमेरिका आणि इस्रायलला माघार घ्यायला भाग पाडू, असे म्हणत आहेत. इराणचे वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘होर्मुझ सामुद्रधुनी सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीचा मार्ग बनेल किंवा युद्धखोर शक्तींसाठी पराभव आणि दुःखाचा मार्ग ठरेल.