भारत-पाकिस्तान या शेजारी देशांमधील वैराचे केंद्रबिंदू गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीर आणि नियंत्रण रेषा (एलओसी) हेच राहिले आहेत. पाकिस्तानच्या आश्रयाने चालणार्या दहशतवादी कारवाया, काश्मीर खोर्यातील हिंसाचार आणि सीमाभागातील घुसखोरी या सार्यांनी या संघर्षाला एक पारंपरिक स्वरूप दिले. मात्र, या वैराच्या भूगोलात आता महत्त्वाचा बदल दिसू लागला आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचा संयुक्त युद्धसराव ‘त्रिशूल’ यावर्षी 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम सीमाभागात सुरू झाला असून, त्याचे केंद्रबिंदू बनले आहे गुजरातमधील सर क्रिक हे ठिकाण. प्रत्यक्षात ही दलदलीने व्यापलेली खाडी आता नव्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे संवेदनशील मैदान ठरते आहे.
या सरावासाठी राजस्थान-गुजरात सीमाभागात प्रचंड हवाई क्षेत्र बंद ठेवले आहे. पाकिस्ताननेही दक्षिण-मध्य भागातील हवाई क्षेत्रावर उड्डाणबंदी लागू केली आहे. हे निर्णय दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींमध्ये वाढ झाल्याचे संकेत देतात. पाकिस्तानकडून मिसाईल चाचणी किंवा सराव सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवाई बंदीने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या तणावाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा सराव वार्षिक स्वरूपाचा असला, तरी यामागे काही सामरिक संदेश देण्याचा इरादा दिसत आहे. सरावासाठी सर क्रिकची निवड केल्याने पाकिस्तानी घुसखोरी अथवा समुद्रमार्गे होणार्या धोक्यांना आळा घालण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानकडून सर क्रिक परिसरात लष्करी पायाभूत सुविधा वाढविल्याची माहिती आहे. पाक नौदलप्रमुखांनी अलीकडेच या भागाचा दौरा करून सैन्याची तयारी तपासली होती. या प्रदेशात पाकिस्तानी लष्कर आणि नौदल यांचा वावर वाढलेला असून, भविष्यात लष्करीद़ृष्ट्या या प्रदेशातून हल्ले करणे सोपे जावे, यासाठीची तयारी असू शकते. याच पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिलेला कठोर इशारा लक्षवेधी ठरला. सर क्रिक परिसरात पाकिस्तानकडून कुठलीही आक्रमक कारवाई झाली, तर भारताचा प्रतिसाद असा असेल की, इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील, असे त्यांनी म्हटले होते.
सर क्रिक ही गुजरातच्या कच्छच्या रण आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतादरम्यान असलेली सुमारे 96 किलोमीटर लांबीची अरुंद खाडी आहे. बि-टिश काळात हिला ‘बाणगंगा’ असे स्थानिक नाव होते; परंतु नंतर बि-टिश अधिकार्याच्या नावावरून तिला सर क्रिक असे नाव देण्यात आले. वरकरणी निर्जन, साप-विंचू व स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान वाटणारा हा प्रदेश, प्रत्यक्षात भारत-पाकिस्तान सीमासंबंधातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. या भागातील वाद केवळ दलदलीच्या पट्ट्याबाबत नाही, तर जमिनीच्या सीमारेषेचा समुद्राशी मिळणारा बिंदू नेमका कुठे आहे, यावर आहे. कारण, या रेषेवरूनच दोन्ही देशांच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्रांची सीमा ठरते. ही मर्यादा सुमारे 370 कि.मी.पर्यंत समुद्रात विस्तारते. त्यामुळे यावर मच्छीमार अधिकार, समुद्रतळातील तेल-गॅस संसाधने आणि आर्थिक सार्वभौमत्व यांचा प्रश्न उभा राहतो.
अभ्यासांनुसार, जर भारताचा ‘मध्य प्रवाह’ सिद्धांत मान्य झाला, तर पाकिस्तानला सुमारे 2,246 चौ.कि.मी. आर्थिक क्षेत्र गमवावे लागू शकते. भारताचा दावा आहे की, 1914 च्या एका ठरावाच्या दहाव्या परिच्छेदानुसार सर क्रिक ही नौसंचारक्षम खाडी असल्याने, मधल्या प्रवाहावरून सीमारेषा आखली पाहिजे; पण पाकिस्तानचा आग्रह आहे की, सीमारेषा खाडीच्या पूर्व किनार्यावर असल्याने पूर्ण खाडी त्यांच्या हद्दीत येते. याबाबत 1969 पासून आजपर्यंत डझनभर चर्चा झाल्या; पण ठोस तोडगा निघाला नाही. 1999 मध्ये तर भारतीय मिग-21 विमानाने सर क्रिकवर पाकिस्तानी गुप्तचर विमान पाडले होते. 2012 मधील अखेरच्या औपचारिक चर्चेनंतर, 2015 मध्ये नव्याने संवाद सुरू करण्याचे ठरले होते. परंतु, 2016 मधील पठाणकोट हल्ल्यानंतर तो संवाद पुन्हा थंडावला. स्वातंत्र्यानंतर सर क्रिकचा मुद्दा फारसा लक्षात घेतला गेला नाही.
काश्मीर आणि उत्तरेकडील सीमाभागातील संघर्षामुळे या समुद्री भागाचे सामरिक महत्त्व दुर्लक्षित राहिले. मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. भारतीय दक्षिण कमांडने सर क्रिक क्षेत्राला नवे रणनीतिक महत्त्व दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर या भागातील गस्त वाढवली. समुद्रकिनार्याजवळ सापडणार्या पाकिस्तानी बोटींच्या घटनांत वाढ झाली आहे. यामुळे या भागातून दहशतवादी घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचा संशय आहे. कराचीला जाणारा एक मार्ग सर क्रिकमधून जातो, हा राजनाथ सिंह यांचा इशारा भारताची आक्रमक रणनीती आणि प्रतिसादक्षमता दाखवणारा आहे. या वक्तव्यानंतर अवघ्या एका महिन्यात सर क्रिकवर ‘त्रिशूल’ सराव सुरू होणे हा योगायोग नसून, स्पष्ट नियोजित धोरणाचे उदाहरण आहे. पाकिस्तानने सर क्रिक परिसरात नवीन टेहळणी चौक्या, साठवण सुविधा आणि दळणवळण केंद्रे उभारल्याचे उपग्रह चित्रांमधून दिसून आले. ही बाब भारताने गांभीर्याने घेतली असल्याचे ‘त्रिशूल’ सरावाद्वारे स्पष्ट होत आहे.
भारताचे या भागातील प्रयत्न तीन पातळ्यांवर दिसतात. एक म्हणजे लष्करी तयारी आणि प्रतिकार क्षमता वाढविणे, दुसरे म्हणजे राजकीय संदेशाद्वारे प्रतिबंध निर्माण करणे आणि तिसरे म्हणजे सागरी सुरक्षेची कडी मजबूत करणे. हा भाग कच्छ किनारपट्टीवरील महत्त्वाच्या नौदल तळांजवळ, तसेच देशातील प्रमुख तेल शुद्धीकरण केंद्रांच्या जवळ आहे. पाकिस्तानने या केंद्रांवर हल्ल्यांची धमकीही दिली होती. त्यामुळे सर क्रिकचे संरक्षण म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षेचे संरक्षण आहे. गेल्या काही दशकांत भारताने उत्तरेकडील सीमारेषांवर घुसखोरी रोखण्यात यश मिळवले. त्यामुळेच पाकिस्तान आता पश्चिम समुद्री मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. या शक्यतेला प्रतिबंध घालण्यासाठी ‘त्रिशूल’सारखा मोठा सराव भारताने आयोजित केलेला दिसतो. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय संकटांनी आणि आर्थिक तणावांनी त्याच्या परराष्ट्र धोरणावर दबाव वाढवला आहे. अशा स्थितीत भारताविरुद्ध लहान-मोठी कारवाई करून लोकमत विचलित करण्याचा मोह त्याला होऊ शकतो. तथापि, ‘त्रिशूल’ सरावाद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे.