Maharani Tararani | जागर ताराराणींच्या स्मृतींचा 
संपादकीय

Maharani Tararani | जागर ताराराणींच्या स्मृतींचा

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत वाघाये

मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीमध्ये मराठी महिला अधिकार्‍यांचे पहिले साहित्य संमेलन सुरू होत आहे. या संमेलनातून विविध सेवांतील महिला अधिकारी आपल्या साहित्यकृती सादर करून सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळवत आहेत.

मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणी यांचं हे 351 वे जयंती वर्ष आहे. यानिमित्त आजपासून (शनिवार) राजधानी दिल्लीत मराठी महिला अधिकार्‍यांचे पहिले साहित्य संमेलन सुरू होत आहे. या दोनदिवसीय संमेलनात विविध सेवांमध्ये असलेल्या अधिकारी महिला त्यांच्या साहित्यकृती सादर करतील. यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य भवनापर्यंतच्या महिला अधिकारी आहेत. देशभरातील साहित्यिक अधिकारी महिलांचा एक मोठा मेळावाच यानिमित्त होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते संमेलन स्मरणिका ‘सौदामिनी’ प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेवर नजर फिरवली, तरी मराठी महिला अधिकार्‍यांचं साहित्यविश्व किती समृद्ध आणि समाजमनातील अनेक गोष्टींचा वेध घेणारं आहे, हे कळेल.

समाजाच्या रथाची महिला आणि पुरुष अशी दोन चाकं असतात, असं आपण म्हणतो; मात्र यात महिला या चाकावर काहीसं नव्हे, तर कायमच जास्तीचं वजन असतं, हे आपण मान्यच केलं पाहिजे. महिला भगिनी नोकर्‍या करतात, विविध जबाबदार्‍या निभावतात त्यावेळी त्या घरच्या जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करत नाहीत. म्हणजेच तांत्रिकद़ृष्ट्या ती एका नोकरीत अनेक नोकर्‍या करत असते आणि हे सगळं करत असताना त्यांना लिहायला आवडतं, बोलायला आवडतं, व्यक्त व्हायला आवडतं; मात्र कामाच्या गर्तेत अडकल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या विसरून जातात. कारण, ‘आवडनिवड’ आणि ‘केलंच पाहिजे’ असं काम यात फरक असतो. यामध्ये स्वाभाविक ‘केलंच पाहिजे’ या गटात येणारे काम म्हणजे नोकरी, घरदार हे निवडले जातात आणि ‘आवडनिवड’ ज्याच्यात साहित्य येतं ते दुर्लक्षित राहतं. दीर्घकाळ हे सगळं झाल्यानंतर आवडीनिवडींशी संपर्कच तुटतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपण एका नोकरी करणार्‍या महिलेतील चांगल्या साहित्यिकाला आणि त्यांच्या सर्जनशील साहित्याला मुकतो.

छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीचे औचित्य साधून पुण्याच्या सरहद संस्थेने मराठी महिला अधिकार्‍यांच्या साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली तसेच मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांनीही त्यांच्या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्यासाठी बळ दिलं. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर समारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्यासह मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदी मान्यवरदेखील या दोन दिवसांत संमेलनाला उपस्थिती दर्शवून महिला अधिकार्‍यांच्या साहित्याला दाद देणार आहेत.

दरम्यान, यंदा महिला अधिकार्‍यांसाठी होणारं हे संमेलन पहिलंच आहे. कदाचित हे संमेलन छोटं होईल, मोठं होईल; मात्र यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिला अधिकार्‍यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि या संमेलनाच्या निमित्ताने एका इतिहासाची पायाभरणी व्हायला सुरुवात होईल. संमेलन संयोजिका सुषमा नहार म्हणतात तसं, या वर्षापासून पुढचे अनेक वर्षे संमेलनाचा आकार आणि परिणामकारकता ही वाढतच असेल. या माध्यमातून महिला अधिकार्‍यांची सर्जनशीलता वर्षागणिक आपल्याला अधिकाधिक दिसत राहील. संमेलनात केवळ साहित्यिक सादरीकरणच नव्हे, तर अनुभवांची देवाणघेवाण, विचारमंथन आणि संवाद यांनाही विशेष महत्त्व असेल. विविध प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत असलेल्या महिला अधिकारी दैनंदिन अनुभवांना शब्दरूप देताना दिसणार आहेत. त्यांचा प्रवास या साहित्यकृतींमधून प्रतिबिंबित होणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरण आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम घडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT