कोणता ना कोणता खेळ खेळण्याचा नाद मानवाला पुरातन काळापासून आहे. राजे महाराजे हे बुद्धिबळ किंवा दशावतार अशा प्रकारचे खेळ खेळत असत. सारीपाट नावाचा खेळ अगदी शंकर-पार्वती खेळत असत, असेही पुराणामध्ये दाखले आहेत. हे सगळे खेळ जोपर्यंत पैसे लावून खेळले जात नाहीत तोपर्यंत यामध्ये मनोरंजन हा भाग होता. काळ बदलला तशी खेळाची साधनेही बदलली. आता रमी खेळण्यावरून महाराष्ट्राचे एक मंत्री महोदय अडचणीत आले आहेत. त्यामुळे चांगलेच रणकंदन माजले आहे. विरोधकांनी हा विषय चांगलाच उचलून धरला आहे.
मोबाईलवर खेळला जाणारा लुडो नावाचा खेळ ग्रामीण भागात खूपच लोकप्रिय आहे. या लुडोच्या नादात असंख्य तरुण दिवसभर काहीही न करता हा खेळ खेळत बसतात. पूर्वी हा खेळ चौकोनी घरांच्या पटावर खेळला जायचा. आता तो मोबाईलवर खेळला जातो. माणसाला आपल्या नशिबाची परीक्षा घेण्याची फार हौस असते. आजही प्रतिष्ठित लोक रमी किंवा तत्सम खेळ खेळत असतात. हा एक प्रकारचा जुगार असतो. या जुगाराच्या खेळामुळे महाभारत घडल्याचे आपणास आठवत असेलच. कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे तसे वाईटच आहे. खेळ हे पण एक प्रकारचे व्यसनच असते. रमी हा 52 पत्त्यांचा खेळ सर्वत्र खेळला जातो. परंतु आजकाल त्याचीच ऑनलाईन व्हर्जन आलेली आहे आणि ती म्हणजे जंगली रम्मी होय. मोठमोठे क्रिकेटपटूही याची जाहिरात करत असतात. यात लोकांनी करोडो रुपये गमावलेले आहेत.
तुमचे नशीब चांगले असेल तर सुरुवातीला तुम्ही थोडेबहुत कमवता, परंतु पैसे गमवण्याची संधी पुरेपूर आहे. कोणताही जुगार संयोजन करणारा स्वतः पैसे घालून काही करत नसतो. जुगार वाढत गेला तसा जंगली रमीचा व्यवसाय पण करोडो रुपयांमध्ये होत आहे. हा एक प्रकारचा खुळा नाद आहे असे म्हणता येईल. एकदा का ऑनलाईन जुगार खेळण्याची तुम्हाला सवय लागली की, प्रसंग काही असो, ती व्यक्ती तो जुगार खेळत असते. सर्व प्रकारचे खेळ सुरू करताना मनोरंजनासाठीच सुरू करण्यात आले होते. परंतु पुढे पुढे त्याचा जुगार व्हायला लागला. ब्रिज नावाचा पत्त्यांचा एक खेळ उच्चभ्रू लोकांमध्ये खेळला जातो. यात एकाच वेळी चार लोक खेळत असतात. दोन पार्टनरच्या दोन जोड्या असतात. त्या दोन पार्टनर्समधील समजूत, इतरांना आलेल्या पत्त्यांचा अंदाज यावर हा अतिशय रंजक असा खेळ आहे व हा पण पत्त्यांचा खेळ आहे... लॉटरी तिकीट काढणे हासुद्धा एक प्रकारचा जुगारच आहे.
तुम्ही लॉटरी तिकीट काढले आणि नेमके त्या तिकिटाला बक्षीस मिळाले तर तुम्ही काही क्षणात लखपती होऊ शकता. अचानक धनलाभ व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यात काही वावगे नाही. नशीब चांगले असेल तर व्यक्ती जिंकते आणि नेमके त्याच वेळेला ते खराब असेल तर ती व्यक्ती हरत असते.