Education in foreign universities: परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्याचा कल वाढतोय File Photo
संपादकीय

Education System Reform | परीक्षा सुधारणांच्या दिशेने...

पुढारी वृत्तसेवा

राज्यात अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि विविध सरकारी भरती प्रक्रियांमध्ये गैरप्रकारांच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या. पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवस्था, भरती प्रक्रियेतील विलंब यांवरून आंदोलनही झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. समितीने राज्यभर दौरा करून विद्यार्थी, शिक्षक, पालकांची मते जाणून घेतली आणि ४ नोव्हेंबर रोजी पहिला अहवाल सादर केला. त्यात एमपीएससीच्या गट-क संयुक्त पूर्वपरीक्षेसंबंधी सुधारणा सुचवल्या. त्यानंतर दुसरा अहवाल राज्य सरकारला सादर केला. यामध्ये विविध बाबींचा विचार करतानाच काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. समितीचे काम चार टप्प्यांत होणार असून आणखी दोन अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे सध्याच्या शिफारशी या व्यापक सुधारणांच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. समितीची सर्वाधिक चर्चेत असलेली शिफारस म्हणजे पेपरफुटी, संघटित परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांना ७ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड.

आर्थिक नुकसानीची वसुली आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारसही केली आहे. राज्यात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) अधिनियम, २०२४ अस्तित्वात आहे. यात संघटित गैरप्रकारांसाठी ५ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि किमान एक कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षेत गैरमार्गांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना सध्या ३ ते ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. समितीने ही शिक्षादेखील वाढवून ५ ते १० वर्षे आणि दंड ५० लाख रुपयांपर्यंत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी सेवा पुरवठादार संस्थांनाही पाच कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस आहे. संबंधित संस्थांचे संचालक, व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्तींनाही ५ ते १० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद सुचवली आहे. समितीने पेपरफुटीला एखाद्या विद्यार्थ्याने केलेली फसवणूक मानलेले नाही. त्यामागे प्रश्नपत्रिका तयार करणारे, छपाई करणारे, वाहतूक करणारे, परीक्षा केंद्रांशी संबंधित व्यक्ती आणि आर्थिक लाभासाठी काम करणाऱ्या संघटित टोळ्या असू शकतात. यातील प्रत्येक जबाबदार घटकापर्यंत तपासयंत्रणा पोहोचल्या पाहिजेत आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. परीक्षा केंद्रांची नियमित तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार परीक्षेसाठी शाळा-महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची शिफारस केली आहे. तीन स्तरांवर परीक्षा नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव आहे.

राज्यस्तरावर एमपीएससीच्या मुख्यालयात, जिल्हास्तरावर स्वतंत्र आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर त्या दिवशी नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. यामुळे परीक्षा केंद्रावर नेमके काय घडत आहे, यावर लक्ष ठेवता येईल. या शिफारशी राज्याच्या परीक्षा पद्धतीला नवी दिशा देणाऱ्या ठरू शकतात. व्यवस्थेतील उणिवांच्या मुळावर थेट घाव घालण्याचा प्रयत्न यामध्ये दिसतो. पैशाच्या जोरावर कायद्याच्या पळवाटा शोधणाऱ्यांना आणि दलालांना जरब बसवण्यासाठी या शिफारसी निश्चितपणे उपयुक्त ठरतील. पेपरफुटीच्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने आणि व्यावसायिक पद्धतीने व्हावा यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची आणि या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारसही विद्यार्थ्यांचा यंत्रणेवरील विश्वास ढासळू नये यादृष्टीने महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, सर्व प्रलंबित प्रकरणे विशेष न्यायालयांकडे वर्ग करून ती ३ महिन्यांत निकाली काढावीत, अशी कालमर्यादाही अधोरेखित केली आहे. सूक्ष्म संवाद उपकरणे, अंगावर लपवलेले कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य गैरवापरामुळे परीक्षा सुरक्षेसमोर नवी आव्हाने आहेत. यासाठी एमपीएससीमध्ये स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करावा, असे समितीने सुचवले आहे. व्ही. राधा समितीने केलेली सर्वात क्रांतिकारी शिफारस म्हणजे परीक्षा सुरक्षेची आणि पारदर्शक नियोजनाची थेट जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवणे ही होय. आजवर परीक्षा घेणाऱ्या खासगी एजन्सी आणि स्थानिक प्रशासनात समन्वयाचा अभाव होता. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांवर परीक्षा आयोजन, देखरेख आणि त्या सुरक्षित पार पाडण्याची जबाबदारी राहील.

परीक्षा व्यवस्थेचे विकेंद्रीकरण आणि जिल्हास्तरीय उत्तरदायित्व हे गैरप्रकारांना आळा घालण्यात मोठी भूमिका बजावेल. याशिवाय, परीक्षा केंद्रांची निवड करताना होणारा भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या केंद्रांचा समावेश टाळण्यासाठी स्वतंत्र व्हेन्यू बँक तयार करण्याचा प्रस्ताव समितीने मांडला आहे. व्हेन्यू बँकेत केवळ तीच परीक्षा केंद्रे असतील जी पायाभूत सुविधा, आवश्यक सोयी आणि सुरक्षेचे सर्व निर्धारित निकष पूर्ण करतात. अहवालातील सर्वात संवेदनशील पैलू म्हणजे आर्थिक दिलासा. तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय गोंधळामुळे परीक्षा ऐनवेळी रद्द होतात, ज्याचा प्रचंड मानसिक आणि आर्थिक फटका गरीब विद्यार्थ्यांना बसतो. याची दखल घेत उमेदवारांमध्ये परीक्षेबाबत गांभीर्य राहावे यासाठी सुरुवातीला परीक्षा शुल्क आकारावे, मात्र जे उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसतील त्यांना आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांचे संपूर्ण शुल्क परत करण्याची शिफारस केली आहे.

जर काही कारणाने परीक्षा रद्द झाली तर आणि उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरली, तर त्याने भरलेले हरकत शुल्कही परत मिळावे, असे समितीने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांकडून आक्षेप शुल्क आकारणे हा अन्यायच होता. या शिफारशी अद्याप कायदा झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात कठोर कायदा आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची संख्या आणि त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवून परीक्षा व्यवस्था उभारावी लागेल. रिक्त पदांची माहिती वेळेत जाहीर करणे, परीक्षांचे वेळापत्रक पाळणे, निकाल आणि नियुक्त्यांमधील विलंब कमी करणे यांनाही तितकेच महत्त्व आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा आणि संधींचा प्रश्नही गंभीर असतो. त्यामुळे परीक्षा सुधारणा म्हणजे फक्त पेपरफुटी रोखणे नव्हे; संपूर्ण भरती प्रक्रियेला विश्वासार्ह बनवणे होय. व्ही. राधा समितीने समस्येची अनेक रूपे ओळखून उपाय सुचवले आहेत. आता सरकारने त्यातील व्यवहार्य शिफारशी वेळ न घालवता अमलात आणायला हव्यात. प्रामाणिक विद्यार्थ्याच्या मनात पेपरफुटीचे भय राहणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे हे सरकारसमोरचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT