गोवा : दाग अच्छे है? File Photo
संपादकीय

Goa tourism issues | गोवा : दाग अच्छे है?

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्या व्यक्तीची, संस्थेची, ठिकाणाची प्रतिमा बनवणे किंवा बिघडवणे सोपे झालेले आहे. चांगला अनुभव माणसे क्वचितच शेअर करतात. वाईट अनुभव मात्र लगेच व्हायरल होतात. गोव्याच्या पर्यटनाबाबत जे काही चाललेय, ते गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.

दाग अच्छे है, ही जाहिरातीतील ओळ असली, तरी गोव्यासारख्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्यासाठी हे ‘दाग’ आता धोक्याची घंटा ठरत आहेत. गोव्याची ओळख केवळ समुद्रकिनारे, निसर्ग आणि संस्कृतीपुरती मर्यादित नाही. ती ‘अतिथी देवो भव’ या मूल्याशी जोडलेली आहे; मात्र गेल्या काही महिन्यांत पर्यटकांकडून येणार्‍या तक्रारींचा वाढता पाढा पाहता, ही ओळख मलिन होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते. सोशल मीडियावरून समोर येणारे व्हिडीओ, पोस्टस् आणि अनुभव गोव्याच्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करणे आता परवडणारे नाही.

पर्यटकांनी मांडलेल्या तक्रारींमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे टॅक्सी भाड्यांचा. अव्वाच्या सव्वा दर, मीटरचा वापर न करणे आणि पर्यटकांना पर्याय नसल्याने त्यांच्याकडून जादा पैसे उकळणे. या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. यासोबतच काही टॅक्सीचालकांकडून मिळणारी वाईट वागणूक, उद्धटपणा आणि धमकीचे सूर पर्यटकांचा अनुभव अधिकच कटू बनवतात. पर्यटक हा पाहुणा असतो, ही जाणीव हरवून बसल्याचे हे संकेत आहेत. महिला पर्यटकांना फोटो काढण्याच्या निमित्ताने त्रास देणे, त्यांच्याशी अयोग्य वर्तन करणे, हा प्रकार तर अत्यंत गंभीर आहे. अशा घटना केवळ व्यक्तिगत पातळीवर त्रासदायक नसून, त्या संपूर्ण राज्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतात. महिलांना स्थानिक नव्हे, तर काही देशी पर्यटक त्रास देत असल्याचे व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाले होते. काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते; मात्र या कारवाईत सातत्य हवे. असे अनुभव सोशल मीडियावर मांडले की, त्यातून निर्माण होणारी नकारात्मक प्रतिमा पुसणे अत्यंत कठीण होते. अलीकडे समोर आलेल्या काही घटनांनी या चिंतेत आणखी भर घातली आहे. मसाजच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पर्यटकाकडून 29 हजार रुपये उकळले, त्याला टोकन दिले; पण प्रत्यक्षात सेवा दिलीच नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, कळंगुटसारख्या गजबजलेल्या पर्यटन पट्ट्यात ड्रग्ज विक्री होत असल्याचा दावा एका पर्यटकाने व्हिडीओसह केला. त्याचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या नाकासमोरच हे प्रकार सुरू होते. हे खरे असेल, तर ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून, गोव्याच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक आहे.

सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक पर्यटक हा एक ‘कंटेंट क्रिएटर’ बनला आहे. त्याचा अनुभव चांगला असो किंवा वाईट, तो लगेच जगासमोर येतो. गोव्यात पर्यटन वाढावे, दर्जेदार पर्यटक यावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते; परंतु जमिनीवर घडणार्‍या घटना वेगळीच कथा सांगत आहेत. पर्यटन पट्ट्यातील बेकायदेशीर व्यवहार, स्थानिक स्तरावरील नियंत्रणाचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. केवळ जाहिराती आणि धोरणे पुरेशी नसतात. त्यांची प्रभावी अंमलबजावणी तितकीच आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. टॅक्सी व्यवस्थेचे नियमन, भाडे संरचना पारदर्शक करणे, पर्यटकांसाठी हेल्पलाईन प्रभावी करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी. या गोष्टी त्वरित केल्या पाहिजेत. सोशल मीडियावर समोर येणार्‍या तक्रारीही गांभीर्याने घेऊन, प्रशासनाने अशा प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली, तरच जनतेचा आणि पर्यटकांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल. गोवा पर्यटनाचा अनुभव सुरक्षित आणि आनंददायी असावा, हीच प्रत्येक पर्यटकाची अपेक्षा असते. ‘अतिथी देवो भव’ हे केवळ घोषवाक्य न राहता ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी आता आपली आहे. योग्य वेळी योग्य पावले उचलली, तर गोव्याची प्रतिमा पुन्हा उजळू शकते. अन्यथा, सोशल मीडियावर पसरत असलेल्या नकारात्मक अनुभवांची सावली गोव्याच्या पर्यटनावर दीर्घकाळ राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT