उमेश काळे
पैनगंगा अभयारण्यातील वाघिणीचा किनवट तालुक्यात रेल्वेखाली सापडून झालेला मृत्यू आणि तीन वर्षांपासून येथील वाघाची लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील भ्रमंती या घटना वन खात्याला आव्हान देणार्या ठरल्या आहेत.
पैनगंगा अभयारण्यातील वाघिणीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू आणि टिपेश्वरच्या वाघाची नैसर्गिक अधिवास सोडून मराठवाड्यात सुरू असलेली भ्रमंती हे दोन्ही विषय वन विभागाच्या कार्यपद्धतीसमोर अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहेत. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात ही दाेन्ही अभयारण्ये आहेत. पैनगंगा अभयारण्यात वावरणारी वाघीण ताडोबाच्या जंगलातून आणली होती. किनवट तालुक्यातील मदनापूरजवळ रेल्वेमार्गावर मागील आठवड्यात ती मृतावस्थेत आढळली. ही वाघीण गर्भवती असल्याची माहिती आहे. किनवटकडे तिचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या वाघिणीचा मृत्यू रेल्वेच्या धडकेनेच झाला की अन्य काही कारण होते, याबाबत उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी वन विभागाने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी शेताच्या बांधाला तार लावून वीज प्रवाह सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या वाघिणीचा मृत्यू त्यामुळे झाला असावा किंवा शिकार करून तिला रूळावर टाकले असावे, अशी शंका आहे. कॉलर आयडीद्वारे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य असताना तिच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचाही आढावा घेतला पाहिजे.
दुसरीकडे, टिपेश्वर अभयारण्यातून २०२३ मध्ये बाहेर पडलेला सुमारे चार वर्षांच्या पट्टेदार वाघाची भ्रंमती थांबलेली नाही. यवतमाळमधून अंदाजे पाचशे किलोमीटरचा प्रवास करत नांदेड, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत भ्रमंती केली. मध्यंतरी या वाघाचा बराचकाळ धाराशिव जिल्ह्यातल रामलिंग अभयारण्यात मुक्काम होता. ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात तो कॅमेऱ्यात दिसला होता. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी बार्शी तालुक्यातील कारी शिवारात त्याचा वावर आढळल्याची माहिती समोर आली. या वाघाला पकडण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झाले; मात्र त्यांना यश आले नाही. ताडोबामधील वाघ पकडणारे पथक सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून होते. वाघ एका जागी थांबत नसल्याने पथकाला परत जावे लागले. या वाघाच्या हालचालींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा तसेच व्याघ्र संरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे.
वाघ नैसर्गिक अधिवासाबाहेर पडण्यामागे अधिवासाचा संकोच, अन्न-पाण्याची उपलब्धता, प्रादेशिक वर्चस्व आणि नवीन क्षेत्राच्या शोधासारखी कारणे असू शकतात. त्यामुळे अशा भ्रमंतीमागील कारणांचाही अभ्यास होणे आवश्यक आहे. यंदा महाराष्ट्रात किनवट, नागपूर आणि गोंदिया परिसरात रेल्वेखाली वाघांचा मृत्यू झाल्याच्या घटनांनी रेल्वेमार्गांवरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर केला. या विषयावर विधानसभेत चर्चेवेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडलेल्या उपाययोजनांमध्ये वन्यप्राण्यांसाठी रेल्वेमार्गांवर अंडरपास आणि ओव्हरपास उभारणे, संवेदनशील वनक्षेत्रांतून जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी ४० किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवणे आणि रेल्वेतील अन्नकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे यांचा समावेश केला जाईल, असे म्हटले होते. त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाने समन्वयाने काम करून वन्यजीवांच्या हालचालींच्या मार्गांचे नकाशे तयार करावेत, कॉलर आयडी आणि कॅमेऱ्यांद्वारे नियमित निरीक्षण करावे आणि संवेदनशील ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी अपेक्षा आहे.
वाघ मानवी वस्तीजवळ पोहोचल्यानंतर हालचाली सुरू करण्यापेक्षा त्याच्या मार्गातील धोके आधीच ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. वन्यजीवांचे संरक्षण केवळ घोषणांनी नव्हे, तर वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी आणि प्रभावी अंमलबजावणीने होते. वाघांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर जंगल, रेल्वेमार्ग आणि मानवी वस्ती यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. वाघांची मुक्त भ्रमंती आणि त्यांचे अपघाती मृत्यू या घटनांकडे इशारा म्हणून पाहून ठोस पावले उचलली, तरच वन्यजीवांचे अस्तित्व आणि मानवी सुरक्षितता दोन्ही जपता येतील. जंगलांचे क्षेत्र, नैसर्गिक भ्रमणमार्ग आणि अन्न-पाण्याची उपलब्धता यांचा शास्त्रीय अभ्यास करून वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, हेच या घटनांवरून दिसते.