पहिला चहा | टायगर इन बेंगॉल  
संपादकीय

पहिला चहा | टायगर इन बेंगॉल

पुढारी वृत्तसेवा

बंगालच्या भगिनींनी बंगालच्या मातीकडे लक्ष न दिल्याने भलेमोठे गवत बंगालच्या धर्तीवर उगवले. या गवतात एक वाघसद़ृश प्राणी घुसला. तो कार्यकर्त्यांनी पाहिला. वाघाला बाहेर काढायचे कसे, हाच प्रश्न होता. बरे तो वाघच होता की आणखी काय, तेही समजेना. वाघ म्हटले तरी खाणार. वाघोबा म्हटले तरी खाणार. त्याला तिथे कोणी सोडले की त्याने घुसखोरी केली, हेही समजेना. बंगालात घुसखोरीला खतपाणी या वाढलेल्या गवतामुळे मिळते. कोणीही येतो गवतात लपतो. हे सरकारी गवत आहे. याला चहात उकळी येईपर्यंत उकळले पाहिजे. गवती चहाचा स्वाद कुठून येणार म्हणा! कुत्रे पोटात दुखायला लागल्यावर गवत ओरबाडून खातात ते हे तृण. आता तर वाघ शिरला तृणमुळात.

पोटात वगैरे दुखत असावे बहुतेक; पण वाघाला कशी चालेल ही मात्रा औषध म्हणून. काहीही! छ्या! याची शेपटी पण गवतातच गुरफटलेली. बाहेर ओढायला वावच नाही. जरी शेपटीला धरून बाहेर काढावे म्हटले, तर ते मांजर नाही बोचकारून बाजूला व्हायला. हा अख्खा सावज हेरून कोरून कोरून खाईल. करावे काय? घुसखोर यादीत नाव टाकावे का याचे की, सुवेंदूबाबूंकडे याची वर्दी द्यावी का? नेमकी बंगालात बकरी जमा झाली सणसमारंभासाठी. त्या आवाजाच्या दिशेने हा इथे पोहोचला असणार, असा अंदाज बंगालवासीयांनी लावला. सुवेंदूबाबूंनी या अशा घुसखोर प्राण्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवावा, असे फर्मान काढले.

दगड मारून पाहावा का? पण, पहिले भक्ष्य कोण असणार? पडत्या फळाची आज्ञा! ममता बॅन ना बोलावून आणू. नाहीतर त्या अशा वाघांना चारा घालण्यात पटाईत. बाहेरचे वाघ सोडले आणून बंगालात. आपल्या देशातले वाघ डिटेंशन सेंटरच्या तयारीत असताना हे असे घडावे हे नवलच आहे. कोणीतरी ओरडले ममता बॅन ना बोलवा. त्याच करुदेत काय ते. नाही तरी त्यांची सत्ता नाही. वाघ त्यांना बघून घेईल नाही, तर त्या वाघाला. ममता बॅनचे नाव घेताच गवत डोलू लागले. ते लक्षात येताच एकाने पुनः त्यांचे नाव पुकारले ‘ममता बॅन टायगर इन बेंगॉल. प्लीज कम!’

गावतातून वाघ हंबरला, ‘हंबा हंबा रुम्बा रंभा, बुम्बा बुम्बा’ ‘अरररर....या ममता बॅन आहेत. वाघ नाही. या तर तृणमूळ सोडणार नाहीत. वाघाच्या वेशात गवतात? काढा त्यांना बाहेर. मतदार यादीतून घुसखोरांसोबत. क्लीन ऑल तृणमूल.’ सुवेंदूबाबू गरजले आणि एक सीमासुरक्षा समितीच स्थापन करून टाकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT