Tiger Shroff firing case Pudhari
संपादकीय

अंडरवर्ल्डचे आव्हान

नव्वदच्या दशकातील टोळीयुद्धांपासून इंटरनेट आणि राज्याबाहेरील संपर्कयंत्रणांपर्यंत गुन्हेगारीचे स्वरूप बदलले; पोलिसांसमोर नवे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

संघटित गुन्हेगारी लोकशाहीपुढे भीतिदायक आव्हान उभे करते. मुंबईमध्ये नव्वदच्या दशकात टोळीयुद्ध, खंडणी, सुपारी देऊन हत्या आणि बॉलीवूडवरील दहशतीमुळे कायद्यांना न जुमानणारी समांतर व्यवस्था तयार झाली होती.

अंडरवर्ल्डची पाळेमुळे उकरून काढून मुंबई भयमुक्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिमा राबविल्या, कठोर कायदे केले आणि अनेक गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले. ही मोहीम यशस्वी झाली तरी त्यानंतर संघटित गुन्हेगारीचे स्वरूप बदलले.

प्रत्यक्ष रस्त्यावर दिसणाऱ्या टोळ्यांची जागा विविध राज्यांत पसरलेल्या संपर्कयंत्रणा, इंटरनेटवरील संदेश आणि तुरुंगाबाहेरून काम करणाऱ्या साथीदारांनी घेतली. अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत झालेल्या गोळीबाराने या बदललेल्या गुन्हेगारी व्यवस्थेचा दडून राहिलेला धोका पुन्हा समोर आला.

सार्वजनिक ठिकाणी, नागरिकांची वर्दळ असताना एका अभिनेत्याच्या गाडीवर खुलेआम गोळ्या झाडल्या जातात ही बाब मुंबई पोलिसांच्या दराऱ्याला छेद देणारी आहे. टायगर बचावला असला तरी त्याचा वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली.

हा हल्ला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणारा संदेश आणि चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. मुंबई पोलिसांनी राजस्थानातील कोटामधून संशयितांना अटक केली. अभिनेता सलमान खानशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्याची धमकी व्हायरल चित्रफितीतून दिली होती.

मात्र अशा संदेशांमधून जबाबदारी स्वीकारणे आणि प्रत्यक्ष गुन्ह्यातील सहभाग तपासातून सिद्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. ऐंशी-नव्वदच्या दशकांत दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षातून शहरात अनेक हत्या झाल्या. १९९७ मध्ये संगीत क्षेत्रातील उद्योगपती गुलशन कुमार यांची हत्या झाली.

२००० मध्ये चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार झाला. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना धमकावून आर्थिक किंवा अन्य लाभ मिळविण्याचा एक घातक पॅटर्नच तयार झाला होता. तो मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोका १९९९ मध्ये अस्तित्वात आला.

तपास यंत्रणांना विशेष अधिकार मिळाले. मात्र या कायद्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचे संपूर्ण उच्चाटन झालेले नाही. लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित प्रकरणांनी हे वास्तव अधिक स्पष्ट केले आहे. दोन वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी गोळीबार केला.

याप्रकरणी आरोपपत्रात लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या सहकाऱ्यांचा उल्लेख आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात गोळ्या झाडून हत्या झाली. सलमान खानशी सिद्दीकी यांची जवळीक आणि अन्य कारणे हत्येमागे असल्याचा संशय आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्यामध्येही त्याच गँगचा हात असेल तर ही बाब अधिक गंभीर मानावी लागेल. कारण लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात आहे.

त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई याला नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकेतून भारतात पाठविल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली. संघटित गुन्हेगारीच्या आधुनिक व्यवस्थेत टोळीप्रमुख प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असण्याची गरज उरलेली नाही.

वेगवेगळ्या शहरांत कार्यरत साथीदार, स्थानिक पातळीवर भरती केलेले तरुण, आर्थिक व्यवहार करणारे मध्यस्थ आणि परदेशात वास्तव्यास असलेले सूत्रधार यांच्या माध्यमातून गुन्ह्यांचे नियोजन केले जाऊ शकते. अशा व्यवस्थेत एखाद्या व्यक्तीला अटक झाली, तरी संपूर्ण गुन्हेगारी जाळे विस्कळीत होईलच असे नाही.

एका स्तरावरील व्यक्ती पकडली गेल्यास दुसरी व्यक्ती तिची जागा घेते. परदेशात कार्यरत असलेल्या बिष्णोई गँगच्या सदस्यांनी भारतातील हल्लेखोरांना आश्रय, आर्थिक मदत आणि इतर साधनसामग्री उपलब्ध करून दिल्याचे मागील तपासात समोर आले होते.

तसेच अशा गुन्ह्यांची व्याप्ती एका शहरापुरती मर्यादित राहिली नसल्याने राज्य पोलिस दलांमधील समन्वयाबरोबरच केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपास संस्थांचे सहकार्य आवश्यक ठरते.

जुलै २०२६ मध्ये अमेरिकी न्याय विभागाने बिष्णोईशी संबंधित कथित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध आरोपपत्रांची माहिती जाहीर केली. त्यानुसार अमेरिकेत, कॅनडात आणि युरोपात मिळून २४ जणांना अटक केली. एकूण ३ आरोपपत्रांत ३७ आरोपींचा उल्लेख होता. तपास संस्थांच्या आरोपांनुसार तुरुंगात असतानाही प्रतिबंधित मोबाईल आणि इंटरनेटवरील संपर्क साधनांच्या मदतीने गुन्हेगारी कारवायांना निर्देश दिले जात होते.

खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि हिंसक गुन्ह्यांच्या माध्यमातून या जाळ्याची आर्थिक उलाढाल सुरू असल्याचा दावा अमेरिकी यंत्रणांनी केला आहे. तुरुंगातून गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याच्या आरोपांमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्याबरोबरच त्यांना पैसा कोणी पुरविला, आर्थिक व्यवहार कोणाच्या खात्यातून झाले आणि गुन्ह्यातून मिळणारा लाभ कोणापर्यंत पोहोचला, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

एखाद्या टोळीप्रमुखाला पकडल्यामुळे गुन्हेगारी व्यवस्था तात्पुरती विस्कळीत होऊ शकते. मात्र तिच्या आर्थिक व्यवहारांवर, संपर्कयंत्रणेवर आणि नव्या सदस्यांच्या भरतीवर नियंत्रण मिळविल्याशिवाय दीर्घकालीन परिणाम साधता येत नाही. त्यासाठी आर्थिक गुप्तवार्ता, डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण आणि विविध राज्यांतील गुन्हेगारी नोंदींची सांगड घालावी लागते. आधुनिक संघटित गुन्हेगारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्धीचा जाणीवपूर्वक वापर.

एखाद्या गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारणारा संदेश काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रसिद्धीमुळे टोळीच्या प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा तिच्या सामर्थ्याची प्रतिमा मोठी होण्याची शक्यता असते. लोकप्रिय व्यक्तीला टार्गेट केल्यास इतर वलयांकितांनाही असुरक्षित वाटू शकते. त्यातून धमकी देणाऱ्यांना अपेक्षित मानसिक दबाव निर्माण होतो. त्यामुळे अशा घटनांतील प्रचारयंत्रणाही तपासाच्या कक्षेत आली पाहिजे.

पोलिसांची कार्यक्षमता, गुप्तचर नेटवर्क आणि तपास यंत्रणांची कार्यपद्धती यांची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि गुजरातमधील पोलिस यंत्रणांमध्ये सातत्यपूर्ण माहितीची देवाणघेवाण यासाठी आवश्यक आहे.

गुन्हेगार राज्यांच्या सीमा ओलांडून कारवाया करीत असताना तपास संस्थांची माहिती स्वतंत्र विभागांत अडकून राहणे परवडणारे नाही. केंद्रीय तपास संस्थांच्या मदतीने गुन्हेगारी जाळ्यांचा एकत्रित अभ्यास करण्याची व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT