Thorium nuclear energy | थोरियमपासून अणुऊर्जेचा निर्णायक टप्पा 
संपादकीय

Thorium nuclear energy | थोरियमपासून अणुऊर्जेचा निर्णायक टप्पा

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

तामिळनाडूतील कल्पक्कम येथे फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टरने महत्त्वपूर्ण टप्पा गाठत भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला नवे बळ दिले आहे. या यशामुळे देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू झाल्याचे मानले जाते. होमी जहांगीर भाभा यांच्या दूरद़ृष्टीचे प्रत्यक्ष फलित म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. तसेच, कोल्हापूरच्या डॉ. शिवराम भोजे यासारख्या शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे ही यशोगाथा अधिक भक्कम झाली आहे.

जग तिसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटते की काय, अशी चिंता सर्वत्र निर्माण झाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 एप्रिल रोजी तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारताच्या प्रोटोटाईप फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टरने अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याची घोषणा केली. या मोठ्या यशामुळे अशा प्रकारची रिअ‍ॅक्टरची मालिका निर्माण झाल्यास भारताला 30 ते 40 वर्षे स्थिर वीजपुरवठा साध्य होऊ शकतो, असा विश्वास ऊर्जातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारताने गवसणी घातलेल्या या उत्तुंग यशाचे श्रेय डॉ. होमी भाभा यांच्या दूरद़ृष्टीला दिले जाते, तसे डॉ. भाभा यांचे स्वप्न साकारण्यामध्ये ज्यांनी पराकोटीचे परिश्रम घेतले, त्यामध्ये कोल्हापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांची भागीदारी सर्वाधिक आहे. त्यांच्या स्मरणाशिवाय या प्रकल्पाची यशोगाथा जशी लिहिली जाणार नाही. त्याहीपेक्षा या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या पिढीतील भारतीय अणुशास्त्रज्ञांना कसोटीला उतरावे लागणार आहे.

कोल्हापूर हा देशातील 750 जिल्ह्यांपैकी एक चिमुकला जिल्हा; पण या जिल्ह्याने देशाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चार शास्त्रज्ञ दिले. खगोलशास्त्रात होयल-नारळीकर सिद्धांताने जगाला गुरुत्वाकर्षणाचा पर्यायी सिद्धांत दिला आणि व्यापक द़ृष्टिकोनही दिला. हवामानाचे नवे मॉडेल तयार करणारे वसंतराव गोवारीकर कोल्हापूरचे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे प्राध्यापक आर. व्ही. भोसले आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि तामिळनाडूतील कल्पक्कम येथील अणुऊर्जेच्या दुसर्‍या टप्प्यातील फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टरच्या उभारणीमध्ये जगातील तज्ज्ञांच्या पंक्तीत अग्रस्थानी जाऊन बसलेले डॉ. शिवराम भोजे. या चौघांनीही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतली. हे चौघेही शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. परंतु, कल्पक्कमच्या यशाचा पोवाडा गाताना डॉ. शिवराम भोजे यांचे विस्मरण होता कामा नये.

डॉ. शिवराम भोजे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कोल्हापुरात राजारामपुरी या उच्च मध्यमवर्गीय वसाहतीत वास्तव्याला आले. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी सन्मानाचे पदही दिले; पण अत्यंत साधी राहणी असलेल्या डॉ. भोजे यांनी आपले जमिनीवरील पाय कधी सोडले नाहीत. साधी विजार आणि टी शर्ट घालून हातात दुधाची पिशवी घेऊन निघालेले डॉ. भोजे अनेकांनी पाहिले. त्यावेळी कोणाला त्यांच्या उत्तुंग कार्याची कल्पनाही आली नसेल. त्यांची मुलाखत घेण्याचा योग दोनवेळा आला. त्यांच्या निवृत्तीनंतर अनेक देशांनी त्यांना फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टर उभारण्यासाठी आमंत्रित केले होते; पण भारताला परवडणार्‍या दरात स्वच्छ वीज उपलब्ध करण्यासाठी फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टर आणि त्याहीपुढे जाऊन थोरियमच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या विजेवर त्यांनी अखंड विचारमंथन केले, कृती केली, त्याचे द़ृश्य परिणाम आता हातात आले आहेत.

डॉ. होमी भाभा यांनी सात दशकांपूर्वी अणुऊर्जेचे स्वप्न पाहिले होते. अणुऊर्जा भारताच्या ऊर्जा मिश्रणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. परंतु, देशातील बहुतांश अणुभट्ट्या या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमवर चालत होत्या आणि त्याचा पुरेसा साठा देशात उपलब्ध नसल्याने तो आयात करावा लागत होता. स्वाभाविकत:, पुरवठा साखळीत असुरक्षितता होती. याच पार्श्वभूमीवर भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे नियोजन टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याची संकल्पना मांडण्यात आली.

दुसर्‍या टप्प्यात प्लुटोनियमचा वापर करणार्‍या फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टरच्या विकासावर भर देण्यात आला. पारंपरिक रिअ‍ॅक्टरमधील वापरून झालेल्या इंधनापासून प्लुटोनियम तयार होते. या रिअ‍ॅक्टरमधील साखळी अभिक्रिया केवळ ऊर्जा निर्माण करत नाही, तर अतिरिक्त प्लुटोनियमही तयार करते - म्हणजेच ते जितके इंधन वापरतात त्यापेक्षा अधिक इंधन निर्माण करतात. संसाधनांच्या मर्यादांशी झुंज देणार्‍या देशासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. केंद्र सरकारने कल्पक्कम येथे 2004 मध्ये अणुऊर्जेच्या या दुसर्‍या टप्प्याची कोनशिला बसविली आणि बरोबर दोन दशकांनी प्लुटोनियम 239 च्या साहाय्याने अणुऊर्जानिर्मिती शक्य झाली. पुढील टप्प्यात थोरियमवर आधारित थर्मल-ब्रीडर रिअ‍ॅक्टर विकसित करण्याची अपेक्षा आहे. भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या थोरियमच्या आधारे, प्रारंभीच्या इंधनानंतर दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा स्वयंपूर्णता साध्य होऊ शकते-जी शतकानुशतके टिकणारी ठरू शकते. तथापि, या वाटचालीतील आव्हानेही तितकीच गंभीर आहेत.

जगात मोजक्याच देशांनी फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टर उभारले आहेत. त्यापैकी अनेकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव ते नंतर बंद केले आहेत. पारंपरिक रिअ‍ॅक्टरमध्ये वापरल्या जाणार्‍या हेवी वॉटरच्या तुलनेत, फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टरमध्ये द्रवरूप सोडियम कूलंट म्हणून वापरले जाते, ज्यामुळे गळतीसंदर्भात अधिक कठोर सुरक्षा उपायांची आवश्यकता भासते. फ्रान्समधील सर्वात मोठा फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टर ग्रीडशी जोडल्यापासून केवळ 12 वर्षांत बंद करण्यात आला; त्या कालावधीत तो केवळ 18 महिने कार्यरत होता. जपानमधील 1986 मध्ये सुरू झालेल्या रिअ‍ॅक्टरने पुढील तीन दशकांत केवळ एक तास ग्रीडशी जोडलेली वीजनिर्मिती केली. भारतासाठी या अनुभवांमधून स्पष्ट धडे मिळतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे हीच खरी कसोटी नसून, त्याचे प्रभावी संचालन आणि काटेकोर नियमन करणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. नेमक्या याच ठिकाणी प्रणालीगत कमकुवतपणा दिसून येतो.

यामुळे पुढील काळात या रिअ‍ॅक्टरला वीज ग्रीडशी जोडणे, त्यानंतर त्याची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित करणे हे सर्वात महत्त्वाचे आव्हान असणार आहे. याखेरीज दशकानुदशके प्रणाली सुरक्षितपणे कार्यरत ठेवणे. यासाठी सातत्यपूर्ण लक्ष, तसेच देखरेख व नियमन क्षमतेत मोठी वाढ आवश्यक असेल. सरकारने दीर्घकाळ प्रलंबित असलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याचे श्रेय निश्चितच मिळेल; परंतु खरी कसोटी आता सुरू होते. तरीही, या दिशेने वाटचाल करणे अपरिहार्य आहे; कारण यशस्वी झाल्यास त्याचे परिणाम परिवर्तनकारी ठरू शकतात. यामुळेच फास्ट-ब्रीडर रिअ‍ॅक्टरसाठी झपाटून काम करणारी डॉ. शिवराम भोजेंसारख्या शास्त्रज्ञांची नवी फळी तयार होणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT