अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत होणार्या पोटनिवडणुकीबाबत उत्सुकता आहे. महाविकास आघाडीतील मतभेद, काँग्रेसने दिलेला उमेदवार आणि बदलती राजकीय समीकरणे, यामुळे ही लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
अजित पवार कायम महाराष्ट्रात वादळी राजकारणाचा परिचय देत आले. जन्मले-वाढले ते शरद पवारांचे छत्र सोडून भाजपच्या नेतृत्वातल्या युतीत गेले अन् तेथे लगेच रुजले. काकांच्या सावलीतून बाहेर पडून ते वेगळे राजकारण करत असताना दुर्दैव आड आले. ते अकाली गेले. आता त्यांच्या मृत्यूनंतर बारामतीत होणार्या पोटनिवडणुकीत पवार कुटुंबात धुमसणारे शीतयुद्ध पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसत नाहीत. शरद पवार कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत गेले आहेत. कदाचित ते एकत्र येण्याची वाट पाहात असावेत.
काँग्रेसचे उमेदवार अॅड. आकाश मोरे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवारांसमवेत होते. आधी लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विधानसभेत युगेंद्र पवार. आता मोरे यांच्या लढाईत पवार कुटुंब त्यांच्यासमवेत असेल का? अजित पवार यांंच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले किती मते खेचतील? शरद पवार यांचे विरोधक आणि अभ्यासक ते जे बोलतात त्या विरोधात वागतात, असे म्हणतात. त्यामुळे आता काय होते आहे ते पाहायचे.
ऐन उन्हाळ्यात बारामतीत महाभारत घडेल काय? राहुरीत प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज न भरून, भाजपच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्यांचे मामा जयंत पाटील भाजपच्या दिशेने जाण्यास अजूनही उत्सुक आहेत, असे संकेत दिलेत का? राज्यात भाजपविरोधी वातावरण शरद पवार पुन्हा पेटवू पाहत आहेत की, काँग्रेसच्या निर्णयाला विरोध न करता दोन्ही बाजूंशी उत्तम संबंध ठेवू पाहत आहेत? विलीनीकरणाबाबत भाजप उत्सुकता दाखवत नसल्याने पवार ही भूमिका घेताहेत का? ते किंवा त्यांचा गट मोरेंच्या प्रचारात उतरण्याची शक्यता दिसत नाही. आपल्या पक्षाचा उमेदवार न देऊन शरद पवार यांनी दोन्ही बाजू उत्तम राखलेल्या दिसतात.
बेदिली
महाराष्ट्रातल्या महाआघाडीतली बेदिली, निमित्त मिळाले की उफाळून वर येते. नवे निमित्त अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे होणार्या पोटनिवडणुकीचे आहे. काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शिवसेना ‘उबाठा’चे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा तर आहे, ते योग्यही आहे; पण असे केले तर काँग्रेस 15 दिवसांनी होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पाठिंबा देईल की नाही, हा प्रश्न असल्याने शिवसेना शांत आहे. दर दोन तासांनी सेनेतला एखादा नेता पाठिंब्याबाबतची नवी भूमिका कळवतो अन् वर अंतिम निर्णय उद्धवजींचा, अशी पुस्तीही जोडतो.
मित्रपक्षाला अग्रलेखातून हाणण्याचा बाणा कायम राखत आज ‘सामना’ने काँग्रेसला सुनावले. पूर्वी भाजपला ऐकवायचे, आता काँग्रेसला. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ‘मविआ’ सरकार वाचले असते म्हणे. अगदी बरोबर; पण मग नंतर अध्यक्ष निवडला का नाही? सरकार वाचले असते. शिवाय, आता परस्परांवर दुगाण्या झाडून मिळणार काय? निवडणूक बारामती, राहुरीत अन् वाद ‘मविआ’त. ‘काट्याच्या आणीवर वसले तीन गाव’ असे झाले आहे. आता नाना पटोलेही जे काय झाले ते सगळे उघडपणे सांगण्याच्या तयारीत आहेत. चालू राहू दे. महाराष्ट्रातले राजकारण थंड होण्याचे नाव घेत नाही एवढेच काय ते खरे.
लोकसभा ते विधानसभा निवडणूक या केवळ काही महिन्यांच्या अंतरात ‘मविआ’चे यश बघता बघता पराभवात बदलले. जे झळाळून वर चढले होते ते सपाटून खाली आदळले. असे झाले की, कारणांचा शोध घ्यायचा असतो. वादांना मूठमाती द्यायची असते. प्रचंड मोठी लाट आली की, परस्परांचे हात धरून उभे राहायचे असते. प्रतिकूलतेचा सामना करायचा असतो; मात्र हे भान नसलेले ‘मविआ’चे पक्ष स्वतःच आपल्याच भिडूंशी वेगवेगळ्या निमित्ताने भांडत सुटले आहेत. आता शरद पवार यांनी लढायचे ठरवले असले तर संघर्ष होईल. तो कसा असेल ते पाहायचे.
अजित पवार गेले त्याला दोन महिने लोटले. त्यांच्या अकाली आणि अपघाती निधनाने निर्माण झालेले गुंते सोडवणे सुरू झाले आहे. ना मृत्यू कुणासाठी थांबतो, ना काळ. मागे राहिलेल्यांना पोकळी भरून काढण्यासाठी हालचाली सुरू कराव्या लागतात. तशा त्या सुरू झाल्या आणि पुढेही सुरू राहतील. रिक्त झालेल्या जागेसाठीची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार प्रथमच एकटीने आव्हानाला सामोर्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोराजोरात झाली अन् आता ठप्प पडली; मग पटेल आणि तटकरे यांना अनुक्रमे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष या पदांवरून काढून टाकणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले गेले. हे पत्र अन् ही अस्वस्थता जर पार्थ यांच्या वागण्यामुळे असेल, तर ते टाळता आले असते. सुनेत्राताईंना किती आघाड्यांवर लढायचे आहे ते आता दिसेल. आता याचना नाही रण होईल, संघर्ष खरेच भीषण असेल की एकतर्फी? बघू या. निवडणूक जवळच आहे.
बारामतीने गेल्या चार वर्षांत पवार घराण्यातील तीन संघर्ष पाहिले. खरे तर महाराष्ट्राच्या पटलावर जे होते त्याचे पडसाद या नगरामध्ये पडत होते. या वादातच अचानक कर्त्याचा झालेला मृत्यूपण पाहिला, पुढच्या पिढीतला वारसदार गेला. तो वारसदार विलीनीकरणाच्या दिशेने पावले टाकत होता. त्यानिमित्ताने तसेच झाले असते तर दिल्लीत अजित पवार यांची शक्ती एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीइतकी झाली असती. नियतीला ते मान्य नव्हते. आता अजित पवार यांच्यानंतर या पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी, अर्ज भरण्यासाठी गेले होते. तथापि काँग्रेसच्या उमेदवारामुळे शरद पवारांची भूमिका महत्वाची असणार?आहे. ते महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस उमेदवाराला साथ देऊन महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना विरोध करणार का? कदाचित या दोन प्रवाहांचा सामना बारामतीला पुन्हा एकदा अनुभवावा लागेल. फक्त फरक एवढाच असेल की, हे घडवणारा महत्त्वाचा दुसरा ध्रुव म्हणजेच अजित पवार तिथे नसतील. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बारामतीची जनता आता सुनेत्रा पवार यांना एकतर्फी मतदान करते का? मागच्यावेळी विरोधात लढलेल्या सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार यांची भूमिका काय असेल? याची उत्सुकता आहे.