तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

तडका : वरुणराजा गोंधळात

राज्यभर कुठे पाऊस आहे, तर कुठे नाही अशी परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

यावर्षी राज्यभर कुठे पाऊस आहे, तर कुठे नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज असलेल्या ठिकाणी तो चार थेंब पडतो आणि जिथे पडणार नाही अशी शक्यता सांगितली जाते, तिथे तो धो धो बरसतो. हवामान खात्याचेच नव्हे, तर स्वयंघोषित हवामानतज्ज्ञांचे अंदाजसुद्धा पावसाने पालथे पाडले आहेत. आम्ही असा विचार करत होतो की हे असे का झाले असेल? वरुणराजाची कृपा सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात असते; परंतु असतेच हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. मान्सून केरळपर्यंत आला, अंदमानमध्ये आला, कोकणात आला आणि आता आपल्या राज्यात या तारखेला प्रवेश करणार, हे सर्व अंदाज खोटे ठरवून मान्सून कुठे गायब झाला, कुणालाच कळले नाही. हे असे का होत आहे, याचा शोध लागला आहे आणि तोच शोध आम्ही आज मांडणार आहोत.

पावसाचे अलर्ट हे रंगाप्रमाणे दिले जातात. थोडासा पाऊस पडणार असेल तर यलो अलर्ट, थोडा जास्त पडणार असेल तर ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार पडणार असेल तर रेड अलर्ट देण्याची पद्धत सर्वमान्य झालेली आहे. हे अलर्ट देण्याचा उद्देश म्हणजे त्या भागातील लोकांनी त्याप्रमाणे सावध राहावे असा आहे. उदाहरणार्थ, रेड अलर्ट दिलेल्या भागातील लोकांनी आपली मुलेबाळे शक्यतो त्या दिवशी शाळेत पाठवू नयेत; अन्यथा रस्ते खचल्यामुळे किंवा पाणी खूप वाहत असल्यामुळे ती अडकून पडण्याची शक्यता असते. यलो किंवा ऑरेंज अलर्ट असेल तर बाहेर पडताना छत्री, रेनकोट किंवा तत्सम पावसापासून संरक्षण देणार्‍या वस्तू सोबत घेऊन बाहेर पडावे हे अपेक्षित असते. या विविध रंगांच्या अ‍ॅलर्टमुळे पाऊस स्वतःच गोंधळात पडला असावा. तज्ज्ञांची प्रतिष्ठा जपणे हे पावसाचे कर्तव्य असल्यामुळे ज्याप्रमाणे तज्ज्ञांनी अंदाज दिला आहे, त्याप्रमाणेच आपण पडावे की काय, याविषयी पाऊसही गोंधळात पडला असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळे तो कुठे किरकोळ, तर कुठे मुसळधार पडत आहे. याचे कारण म्हणजे कुठे कसे पडावे, हे त्याला स्वतःलाच कन्फ्युज करणारे झालेले आहे.

विविध रंगांचे अलर्ट टाकण्यापेक्षा तज्ज्ञांनी पडणार की नाही पडणार, म्हणजे एकच एक व्हाईट अलर्ट म्हणजे पडणार नाही आणि रेड अलर्ट म्हणजे खूप पडेल असे काहीतरी सोपे सुटसुटीत गणित तयार केले असते तर पावसाचाही गोंधळ झाला नसता, असे आमचे मत आहे. यामुळे टीव्ही न्यूज चॅनेलचा पण गोंधळ झाला आहे. खरे तर अशावेळी मुंबई सोडता इतरत्र पावसाची प्रतीक्षाच सुरू असते. कुठला तरी अलर्ट आल्याबरोबर आपण सावध होतो आणि त्याप्रमाणे वागायला लागतो. मोठ्या शहरांमध्ये तर प्रत्येक भागामध्ये वेगळा अलर्ट दिला जातो. उदाहरणार्थ, पुण्यामध्ये खराडीमध्ये रेड अलर्ट असेल, तर कात्रजमध्ये ऑरेंज अलर्ट असतो आणि वारजेमध्ये यलो अलर्ट असतो. आपले वागणे बेभरवशाचे झाले आहे, हे पावसाला कळत नाही आणि या अलर्टमुळे आपण कसे वागावे हे सामान्य नागरिकांना कळत नाही.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला तेव्हा सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली. त्या दिवशी सुट्टीमुळे कारटे घरीच धिंगाणा करत बसले. त्यांच्या आया लेकरांना बाहेर उन्हात खेळू नका, असे दिवसभर सांगत होत्या. ‘अजब ते अंदाज आणि गजब तो पाऊस’ असे झालेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT