Helicopter Accidents | हेलिकॉप्टर अपघातांचे दुष्टचक्र 
संपादकीय

Helicopter Accidents | हेलिकॉप्टर अपघातांचे दुष्टचक्र

पुढारी वृत्तसेवा

कॅप्टन नीलेश गायकवाड

दुर्गम तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा सोयीची असली, तरी भाविकांच्या जीविताची सुरक्षा, कठोर नियम आणि प्रभावी देखरेख यांना प्राधान्य देण्याची गरज आहे.

उत्तराखंडमध्ये तीर्थयात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बद्रीनाथहून डेहराडूनकडे परतणाऱ्या हेलिकॉप्टरमधील ५ भाविक आणि वैमानिकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम तीर्थक्षेत्रांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. हिमालयातील दुर्गम भागात वसलेल्या या तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या प्रवास करणे कठीण असलेल्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सोयीची ठरते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या सेवेची मागणी वाढली आहे; मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि व्यावसायिक संधी यांच्या तुलनेत सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे पुरेसे लक्ष दिले जात आहे का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.

चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही वर्षांत अनेक दुर्घटना घडल्या असून, काही वेळा हेलिकॉप्टरचे आपत्कालीन अवतरण करावे लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा अपघातांनंतर काही काळासाठी हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आली होती; मात्र सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतरही दुर्घटनांचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवा चालवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या कार्यपद्धतीबरोबरच त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या नियामक यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार,२०२० नंतर देशात हेलिकॉप्टरच्या १२ दुर्घटना घडल्या होत्या. त्यापैकी ७ दुर्घटना एकट्या उत्तराखंडमध्ये झाल्या होत्या. या अपघातांमध्ये देशभरात मृत्युमुखी पडलेल्या ३० जणांपैकी २१ जणांचा मृत्यू उत्तराखंडमधील दुर्घटनांमध्ये झाला होता. ही आकडेवारी हिमालयीन प्रदेशातील हेलिकॉप्टर वाहतुकीशी संबंधित धोक्यांचे गांभीर्य स्पष्ट करते. देशातील एकूण हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये उत्तराखंडचे प्रमाण इतके मोठे असणे ही चिंतेची बाब आहे. सेवा पुन्हा सुरू करताना संबंधित कंपन्यांनी सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता केली होती का, याची माहिती स्पष्टपणे समोर येणे आवश्यक आहे. अपघातांच्या कारणांचा सखोल अभ्यास करून संबंधित त्रुटी कायमस्वरूपी दूर करण्याची गरज आहे.

बद्रीनाथ आणि केदारनाथसारखी तीर्थक्षेत्रे समुद्रसपाटीपासून मोठ्या उंचीवर वसलेली आहेत. या परिसरात हवामानात अचानक बदल होतात. काही वेळातच दाट धुके पसरते, ढगांची गर्दी होते किंवा जोरदार वारे वाहू लागतात. अशा स्थितीत दृश्यमानता कमी होऊन हेलिकॉप्टरचे उड्डाण धोकादायक ठरू शकते. उंच प्रदेशातील विरळ हवेमुळे हेलिकॉप्टरच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांचे वजन, सामान, इंधन, हवामान आणि उड्डाणमार्ग या सर्व घटकांचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करावा लागतो. त्यातच एखादी तांत्रिक बिघाडाची घटना घडली, तर सुरक्षित अवतरणासाठी योग्य जागा उपलब्ध होईलच असे नाही. म्हणूनच हिमालयीन प्रदेशातील हवाई वाहतुकीसाठी सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक कठोर सुरक्षा निकषांची आवश्यकता आहे.

हवामानाच्या अंदाजावर आधारित उड्डाण नियोजनाला विशेष महत्त्व दिले पाहिजे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची माहिती वैमानिकांना वेळेवर उपलब्ध झाली पाहिजे. प्रतिकूल हवामानात उड्डाण करण्याचा निर्णय टाळणे, हेलिकॉप्टरची नियमित तांत्रिक तपासणी करणे आणि वैमानिकांना पर्वतीय प्रदेशातील उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी सक्षम यंत्रणाही तयार असली पाहिजे. धार्मिक पर्यटनाचा विस्तार करताना सरकारची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सुविधा विकसित केल्या जात आहेत. रस्ते, निवासव्यवस्था, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भाविकांची संख्या वाढत आहे; मात्र पर्यटनाला चालना देण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देणारी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. सुविधांचा विस्तार आणि सुरक्षा यांमध्ये समतोल राखला गेला नाही, तर वाढत्या पर्यटनामुळे अपघातांचा धोका अधिक गंभीर होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT