कायमची नोकरी नसल्यामुळे आजकालची तरुण पिढी सतत नोकर्या बदलत असते. एकाच कंपनीशी एकनिष्ठ राहून तिथूनच निवृत्त होण्याचे दिवस कधीच संपले आहेत. ‘जॉब स्विच’ करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. संगणक क्षेत्र, कार्पोरेट क्षेत्र या ठिकाणी हे कायमच पाहण्यास मिळते. महिन्याकाठी दहा-वीस हजार पगार जास्त मिळत असेल, तरी कंपनी आणि गावही बदलले जाते.
काही लोकांनी तर करिअरसाठी देशही सोडला आहे. उदाहरणार्थ, पती-पत्नी दोघेही संगणक अभियंता असतील आणि दोघांनाही चांगल्या संधी मिळत असतील, तर एक जण अमेरिकेत राहतो आणि त्याची बायको जर्मनीत राहते. एकत्रितपणे संसार करावा अशी काही संकल्पना शिल्लक राहिलेली नाही. अर्थात, याच्या पुढची पायरी म्हणजे डिंक अशी आहे. इंग्रजी डिंक म्हणजेच डबल इन्कम नो किड्स. याचा अर्थ दोघांनी नोकरी करायची, भरपूर पगार कमवायचा; परंतु मुले होऊ द्यायची नाहीत. याचे कारण म्हणजे वेळच नाही. मुलांच्या गर्भावस्थेचा काळ जर नऊ महिन्यांवरून कुणी दोन महिन्यांवर आणून देत असेल, तर त्यासाठी खर्च करायचीपण या पिढीची तयारी आहे.
गावे बदलण्यामध्ये मुख्यत्वे पुणे, बंगळूर आणि हैदराबाद अशी ती सर्कस सुरू असते. बंगळूरमध्ये जास्त पॅकेज मिळाले की, पुण्यातील संगणक अभियंता तत्काळ नोकरी सोडून बंगळूरला जाऊन रुजू होतो. तेही त्याचे कायमस्वरूपी निवासाचे गाव नसते.
नुकताच एक संगणक अभियंता पुण्यातील नोकरी सोडून बंगळूरला गेला. त्याने आपला अनुभव एका मित्राला शेअर केला आणि त्या मित्राने तो ‘लिंकड् इन’ या माध्यमातून व्हायरल केला. सदरील संगणक अभियंत्याचे असे म्हणणे होते की, 18 लाख रुपयांची नोकरी सोडून तो बंगळूर येथे 25 लाख रुपयांवर रुजू झाला; परंतु अवघ्या एक वर्षभरात त्याला पश्चाताप होत आहे. बंगळूरमध्ये फ्लॅट भाड्याने घेताना चार महिन्यांचे भाडे आणि डिपॉझिट आधी द्यावे लागते. बंगळूरमधील वाहतुकीची समस्या पुण्यापेक्षा वाईट स्थितीत आहे. हा अभियंता पुण्यामधील आयुष्य मिस करत आहे. पुण्यामध्ये पंधरा रुपयाला मिळणारा वडापाव त्याला आजही पुन्हा खुणावत आहे. याचा अर्थ एकच होतो की, नवीन पिढीसाठी सगळेच काही अस्थिर होत गेलेले आहे. नोकरी स्थिर नाही, गाव निश्चित नाही, बर्याचदा तर देश पण निश्चित नाही. आपण पुढे काय करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत, याविषयीही निश्चित असे काही निर्णय नाहीत. आयुष्याबद्दल असे असेल, तर कुटुंब, संसार, मुले-बाळे, आई-वडील यांच्या विषयी बोलायलाच नको. जीवन हे आनंदाने जगण्याचे गाणे असले पाहिजे. इथे करिअरच्या आणि अधिक पैशाच्या हव्यासापोटी ते रडगाणे होत आहे की काय, अशी शंका येते. आजकाल नोकरीचे मोठे फॅड निर्माण झाले आहे. त्यामुळे नोकरी नसणार्यांना बायको मिळणे खूपच कठीण झाले आहे.