सध्या भारतीय बाजारपेठेत कमालीची अस्थिरता दिसत असून, त्यामुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा निधी सातत्याने बाहेर जात आहे. म्हणजेच समभाग आणि कर्जरोखे विकून ते इथला पैसा काढून घेत आहेत. भारतात समभाग विकून चीनमध्ये गुंतवणूक केली जात असून, त्यात अनेक बड्या कंपन्यांची तिमाही कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे घसरण वाढली आहे. मूल्यांकनाच्या काळजीमुळे भारतातील विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा केला जात आहे. या उलट देशातील अर्थसंस्था आणि म्युच्युअल फंड समभागांची खरेदी करून ही घसरण रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘एनएसडीएल’ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्येच विदेशी गुंतवणूकदारांनी 77 हजार कोटी रुपयांचे समभाग विकून टाकले. कोरोना काळातही एवढी विक्री झाली नव्हती. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी गटांगळी घेतली आहे. जगात ठिकठिकाणी युद्ध व संघर्ष सुरू असून, त्यामुळेही आंतरराष्ट्रीय वाहतूक तसेच कमोडिटी बाजारावर वाईट परिणाम होत आहे. त्यात चीनने मंद होत चाललेल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध घोषणा केल्या असल्यामुळे परकीय गुंतवणूकदार तिकडे आकर्षित झाले आहेत.
ज्या-ज्यावेळी शेअर बाजार अस्थिर होतो किंवा देशांमध्ये संघर्ष होतो, त्या-त्यावेळी सोन्या-चांदीची मागणी वाढत असते, हा इतिहास आहे. याचे कारण, जेव्हा गुंतवणूकदार भयभीत होतो, भविष्यकाळाबद्दल त्याला अनिश्चितता वाटू लागते, तेव्हा त्याला सोन्या-चांदीत पैसे ठेवणे हे अधिक सुरक्षित वाटू लागते. सध्या सोन्या-चांदीचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले असून, दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम 350 रुपयांनी वधारून 81 हजार रुपयांवर गेला, तर चांदीच्या भावात किलोमागे 1500 रुपयांची वाढ होऊन, त्याने एक लाख रुपयांची पातळी ओलांडली. मुंबईच्या घाऊक बाजारात दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी 78 हजार 250 रुपये, तर चांदीचे किलोमागे 98 हजार 375 रुपयांवर व्यवहार सुरू होते. चालू वर्षात आतापर्यंत सोन्यात 32 टक्क्यांची तेजी दिसून आली. चांदीही लक्षणीय प्रमाणात वाढली. दिवाळीआधी चांदीचा भाव 1 लाख 10 हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. सणासुदीला ग्राहकांकडून सोन्याची खरेदी होत असते. गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या काळात खरेदी वाढते. देवदेवतांना मढवण्यासाठीही दागिन्यांची खरेदी केली जाते. अनेकजण थेट सोने खरेदी करून, ते देवांच्या मूर्तीच्या चरणापाशी ठेवत असतात, तर औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीचे भाव वाढले आहेत. इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेलला उत्तम मागणी असून, त्याच्या सुट्या भागांमध्ये चांदीचा वापर केला जातो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर ‘हमास’ने हल्ला केल्यापासून सोन्या-चांदीच्या दरांत वाढ होत आहे. आता या युद्धात इराण, लेबनॉन, येमेन या देशांचाही समावेश झाला असून, युद्ध संपेपर्यंत सोने आणि चांदीचे भाव उतरणीस लागण्याची बिलकूल शक्यता नाही.
दुसरीकडे अमेरिकेने अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी व्याजदर कपातीचे चक्र सुरू केले आहे. व्याजदर कमी झाल्यावर सोन्या-चांदीचे भाव नेहमीच वधारतात. शिवाय युरोप आणि अमेरिकेत मंदीचे सावट असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती मिळत आहे. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 24 कॅरेट सोने शुद्ध असले, तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारख्या अन्य धातूंचे 9 टक्के इतके मिश्रण करून दागिने घडवले जातात. हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे, हा असतो. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते. 1 एप्रिल 2023 पासून हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येणार नाहीत, असा नियमच केंद्र सरकारने केला. मागच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्या-चांदीवरील सीमाशुल्क 6 टक्क्यांनी कमी केले. 2023 मध्ये भारतात 2.8 लाख कोटी रुपयांची सुवर्ण आयात करण्यात आली. त्यावरील सीमाशुल्कातून केंद्राला 42 हजार कोटी रुपये मिळाले. आता सीमाशुल्क कमी केल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती घटतील अशी अपेक्षा होती; पण एकीकडे इस्रायलचे गाझापट्टीवरील हल्ले आणि दुसरीकडे रशिया-युक्रेन धुमश्चक्रीमुळे सोन्या-चांदीची मागणी वाढतच गेली आणि म्हणूनच त्यांचे भावही वधारले. सोन्याच्या तुलनेत चांदी जास्त घेतली जाते. शिवाय सोने चांदीपेक्षा जास्त घन असते. त्यामुळे सारख्याच वजनाच्या सोन्यासाठी चांदीपेक्षा कमी जागा लागते. सोन्याचा सुमारे 12 टक्के वापर हा औद्योगिक कारणांसाठी होतो, तर चांदीबाबत हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. फोन, टॅबलेट, सोलर पॅनेल, किचनवेअर, औषधे, कार यासह असंख्य उद्योगांमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये चांदीचा वापर केला जातो. त्यामुळे अर्थव्यवस्था तेजीत असते त्यावेळी चांदीची मागणी वाढते आणि मंदावते तेव्हा त्याचा चांदीलाही फटका बसतो. दागिन्यांसाठी व गुंतवणुकीसाठी सोन्याचा वापर केला जातो. सोने ऐतिहासिकद़ृष्ट्या ‘काऊंटर सायक्लिकल गुंतवणूक’ म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ, समभाग आणि कर्जरोखे जेव्हा चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे झुकतात आणि त्याची किंमत त्यामुळे वाढते. उलट शेअर बाजार तेजीत असताना गुंतवणूकदार सोने विकून येणारे पैसे शेअर बाजारात गुंतवत असतात. देशातील उपभोग आणि गुंतवणुकीची मागणी वाढत असल्याचे निरीक्षण नुकतेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नोंदवले आहे. सोन्या-चांदीच्या दरवाढीपेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची मार्गक्रमणा योग्य दिशेने व जोमदारपणे होणे, हे शेवटी अधिक महत्त्वाचे आहे. देशातील सोन्या-चांदीचे उत्पादन वाढून अधिकाधिक लोकांना रोजगार मिळणे, ही बाब जास्त आल्हाददायक असते, अर्थव्यवस्थेला पोषक असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.