(हुआंग यांचा घनिष्ठ मित्र ट्रम्प यांच्याशी झालेला संवाद)
हुआंग : हॅलो, मिस्टर प्रेसिडेंट. राजीनामा दिलाय. प्रेमाचा आरोप आणि आता हेरगिरीचा संशय! आयुष्यात चिपपेक्षा जास्त सर्किट झालेत.
ट्रम्प : आय नो एव्हरीथिंग, जेनसन! मला सगळं आधीपासून माहीत होतं. ॲलिस कोण आहे, कुठून आली, काय करते... बट डोन्ट वरी मी तुमच्या मागे उभा आहे.
हुआंग : सर, तुम्ही मागे उभे आहात की माझ्यावर नजर ठेवत आहात?
ट्रम्प : दोन्ही! मी अध्यक्ष आहे. माझी नजर प्रेमावरही असते आणि प्रोसेसरवरही. चीनवर तर विशेष असते.
हुआंग : अमेरिकी यंत्रणा ॲलिस यांना चिनी हेर समजते...
ट्रम्प : फू... चीनने आरोप फेटाळलेत ना! नाहीतरी चीनला प्रत्येक गोष्ट फेटाळायची सवय आहे. टॅरिफ फेटाळतात, आरोप फेटाळतात...
हुआंग : वाईट झालं... पण सर, प्रेम ही खासगी बाब आहे.
ट्रम्प : खासगी? जेनसन, आजकाल खासगी काहीच नसतं. तुमचा फोन, तुमचा डेटा, तुमचं प्रेम... सगळं राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे.
हुआंग : आता मी काय करू?
ट्रम्प : डोन्ट वरी. मी तुमच्या पाठीशी आहे. एनव्हिडियाला माझी गरज आहे आणि मला एनव्हिडियाची! प्रेम प्रकरणातूनही अमेरिकेला फायदा झाला पाहिजे...
हुआंग : म्हणजे सर, तुम्ही मला वाचवताय की एनव्हिडियाला?
ट्रम्प : अमेरिका फर्स्ट, जेनसन! बाकी सगळं सेकंडरी. अगदी प्रेमसंबंधसुद्धा!
हुआंग : सर, माझ्या खासगी आयुष्याची चौकशी सुरू आहे. पण तुमच्या एपस्टिन फाइल्सचं काय? त्या अजूनही ‘क्लाऊड’मध्येच आहेत...
ट्रम्प : जेनसन, डोन्ट गो देअर! माझ्याकडे जगातले सर्वोत्तम वकील आहेत.
हुआंग : सर, माझ्या संबंधांवर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आणि तुमच्या एपस्टिन कनेक्शनवर मात्र राष्ट्रीय मौन का?
ट्रम्प : कमॉन जेनसन... कारण मी अध्यक्ष आहे!
हुआंग : हम्म... अमेरिकेत काही गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने चालतात आणि काही गोष्टी ‘आर्टिफिशियल इग्नोरन्स’ने!
ट्रम्प : जेनसन, तुमची ही चिनी कनेक्शनची गोष्ट काही साधीसुधी नाही. यू नो, इटस् अ चीप लव्ह स्टोरी. मेक लव्ह, नॉट वॉर! लक्षात ठेव. अमेरिकेत प्रेम करण्यासाठी स्वातंत्र्य आहे; फक्त प्रेम कुणावर करायचं, हे राष्ट्रीय सुरक्षा ठरवते!