राम राम नगराध्यक्ष साहेब! कसे आहात?
आम्ही कशाचे नगराध्यक्ष? आमच्या मिसेस उभ्या आहेत उमेदवार म्हणून. आता निकाल लागल्यावर बघायचे काय होते ते?
अहो दादा, निकाल लागणार आणि वहिनी निवडून येणार म्हणजे येणारच. त्या नगराध्यक्ष झाल्या तर त्या नावाला, तुम्हीच खरे आमचे नगराध्यक्ष!
अरे कशाचे काय घेऊन बसलास राजा, सहा महिने झाले संसाराचे तीन तेरा वाजले आहेत. तुझी वहिनी सकाळी सहापासून प्रचाराला जात होती ती रात्री दहा वाजता परत येत असे. मी मुलेबाळे आणि स्वयंपाक सांभाळत होतो. आता बायको खरच निवडून आली, तर मात्र काहीच खरं नाही. आणि तुम्ही नगराध्यक्ष म्हणता आम्हाला.
अरे असे वाईट वाटून घेऊ नको! वहिनी नगराध्यक्ष झाल्या, तर ती आपल्या सगळ्यांना किती अभिमानाची गोष्ट असणार आहे. या वेळेला नगराध्यक्ष झाले की, पुढच्या वेळेला आमदारकीचे तिकीट फिक्स. वहिनी आमदार होतील, मंत्री होतील. तुला काय माहिती कुणाच्या नशिबात काय लिहिले आहे ते? मला तर खात्री आहे वहिनी एक ना एक दिवस राज्याच्या मुख्यमंत्री पण होतील.
तुझं बोलणं ऐकून हसावं का रडावं तेच कळत नाही. संसाराचं काय होणार, त्याची कधीकधी काळजी वाटते. पोरांचे अजून शिक्षण व्हायचे राहिले आहे. पोरीचे लग्न बाकी आहे.
अरे हे काय बोलत आहेस? आतापर्यंत तीच सगळं सांभाळत होती ना. तू केलेस काही काळ तर काय फरक पडेल? नाही तरी भाषणांमध्ये स्त्री-पुरूष समानता असतेच की तुमच्या. अरे, एकदा का वहिनी नगराध्यक्ष झाल्या की, मोठ्या मोठ्या घरचे स्थळ तुझ्या मुलीसाठी येतील. लोक मागणी घालून तुझ्या मुलीशी आपल्या मुलाचा विवाह करून देतील. किरकोळ लोकांची तुझ्या घरी येण्याची हिंमत होणार नाही. आमदार, खासदाराबरोबर सोयरसंबंध आले, तर राजकारणामध्ये फार पुढे जाता येते. तू थोडा शांत बस. पंधरा दिवसांत बघ चमत्कार होतो की नाही ते!
तुझ्या म्हणण्याप्रमाणे चमत्कार झाला आणि आमची बायको निवडून आली, तर पुढच्या सहा महिन्यांत तूच ये बघायला. चल येतो!