तेनझिन यांग्की यांचे नाव आज देशातील अनेक महिलांसाठी विशेषतः ईशान्येकडील राज्यांतून येणार्या तरुण पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत बनले आहे. अरुणाचल प्रदेशातील पहिल्या महिला भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी बनण्याचा ऐतिहासिक मान त्यांनी मिळवला आहे. त्यांचा जन्म 1988 मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग या त्यांच्या मूळ गावी झाला. दुर्गम भागातून येऊन त्यांनी हे शिखर गाठले आहे. त्यांचे यश केवळ वैयक्तिक नसून, ते एका संपूर्ण राज्याच्या आकांक्षांचे प्रतीक आहे.
तेनझिन यांचा कौटुंबिक वारसा अत्यंत मजबूत आहे. त्यांचे दिवंगत वडील थुप्तेन टेंपा हे माजी आयएएस अधिकारी आणि राज्याचे मंत्री होते, तर त्यांची आई जिग्मी चोडेन या सरकारी सेवेत सचिव पदावरून निवृत्त झाल्या आहेत. सार्वजनिक सेवेची ही मजबूत पार्श्वभूमी कुटुंबाला असली, तरी तेनझिन यांच्या यशाचा प्रवास मात्र सोपा नव्हता. वडिलांचे अकाली निधन आणि सरकारी अधिकार्याची कन्या म्हणून त्यांच्यावर असलेला अपेक्षांचा भार यामुळे त्यांना शैक्षणिक प्रवास पूर्ण करताना अनेक मानसिक आव्हानांचा सामना करावा लागला.
तेनझिन यांचे प्राथमिक शिक्षण इटानगर येथे झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित शाळांमधून पूर्ण केले. उच्च शिक्षण दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले. ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’ या विषयामध्ये एम.ए. आणि एम.फिल. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. जेएनयूमध्ये शिकताना अनेक वादविवाद स्पर्धा आणि शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या विषयातील सखोल ज्ञानामुळे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले होते, ज्यामुळे प्रशासकीय सेवेतील कठोर मुलाखतींसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढला.
या काळात त्यांनी कठोर अभ्यास आणि सिमित संसाधनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांचे ध्येय स्पष्ट होते. लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करणे या ध्येयामुळेच त्यांनी सुरुवातीला सहायक प्राध्यापक म्हणून काही काळ अध्यापन क्षेत्रात काम केले; पण प्रशासकीय सेवेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. या प्रयत्नांचा भाग म्हणून 2017 मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग (APPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्कल अधिकारी म्हणून सियांग जिल्ह्यात काम केले. हा अनुभव त्यांना यूपीएससीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी 2022 च्या यूपीएससी परीक्षेत 545 वा क्रमांक मिळवला आणि सप्टेंबर 2025 मध्ये त्यांनी प्रशासकीय प्रशिक्षण पूर्ण केले.
अरुणाचल प्रदेशातील स्त्री शिक्षणाचा विचार केल्यास परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. येथील साक्षरता दर वाढत असला तरी, सामाजिक आणि भौगोलिक अडचणींमुळे उच्च शिक्षणामध्ये महिलांचा सहभाग अजूनही आव्हानात्मक आहे. अशा वातावरणात तेनझिन यांचे यश हे दर्शवते की, योग्य संधी आणि कठोर परिश्रम यातून कोणतीही मर्यादा ओलांडता येते. त्यांनी तरुण मुलींना केवळ स्वप्न पाहण्यासाठी नव्हे, तर ती पूर्ण करण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांनी या कर्तृत्वाने अरुणाचल प्रदेशच्या भावी पिढीसाठी एक नवा मैलाचा दगड स्थापित केला आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.