शाळेतील शिक्षकाच्या हातात पुस्तक असावे की सरकारी योजनांच्या माहितीने भरलेला मोबाईल, वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचे की दिवसभर वेगवेगळ्या पोर्टलवर माहिती भरत बसायचे, हे प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरित आहेत. शिक्षकांच्या विषयज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढवणे, जिज्ञासा जागवणे आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीच व्हायला हवा. प्रत्यक्षात शिक्षकांचा वापर सर्वेक्षण, माहिती संकलन, ऑनलाईन नोंदणी, योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी, विविध अभियानांची अंमलबजावणी अशा कामांसाठी शासन यंत्रणा वर्षानुवर्षे हक्काने करत आली. हरकाम्या नोकराप्रमाणे सरकारी कामांत जुंपण्यामुळे शिक्षकांवर इतर कामांचा बोजा इतका वाढला की, अध्यापनाला दुय्यम स्थान मिळू लागले. शिक्षक संघटनांनी आजवर हा अतिरिक्त भार कमी व्हावा, यासाठी मागणी केली, आंदोलने केली; पण प्रयास निष्फळ ठरले.
आता राज्य सरकारने जनगणना, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापन या तीन अपवादांखेरीज शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यास प्रतिबंध करणारी कायदेशीर तरतूद करण्याचे ठरवले आहे. खासगी अनुदानित शाळांसाठी प्रस्तावित सर्वसमावेशक कायद्यातील ही तरतूद शिक्षकांना दिलासा देणारी आहे. खासगी शाळांचे कामकाज १९७७ च्या कायद्यानुसार चालते. त्यात अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांसाठी स्वतंत्र तरतुदी नव्हत्या. सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांवर सरकारचे थेट आर्थिक नियंत्रण आणि उत्तरदायित्व असते. खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांचे वेतन शासन देते; मात्र शाळांचे व्यवस्थापन खासगी संस्थाचालकांकडे असते. अनेक संस्थाचालक शिक्षकांकडून इतर प्रशासकीय कामे, निधी संकलन किंवा बाह्य उपक्रम करवून घेतात. या विधेयकानुसार शाळांच्या निधी संकलनावरही बंदी घातली. शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे, हा यामागचा मुख्य हेतू. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका शाळांमधील शिक्षक हे थेट स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असल्याने त्यांच्या अशैक्षणिक कामांबाबत ऑगस्ट २०२४ मध्येच स्वतंत्र शासन निर्णय काढून कामांचे वर्गीकरण केले होते; मात्र शासन निर्णयापेक्षा कायद्याचे बंधन अधिक कठोर असल्याने खासगी अनुदानित शाळांसाठी थेट विधेयकात तरतूद केली गेली.
खासगी विनाअनुदानित शाळांना सरकारकडून निधी मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक आणि प्रशासकीय नियोजन पूर्णपणे खासगी व्यवस्थापनाच्या अखत्यारीत राहते. सरकार त्यांच्या अंतर्गत कामकाजात थेट कायदेशीर हस्तक्षेप करू शकत नाही. महाराष्ट्रातील २५ हजार ४९५ खासगी अनुदानित शाळांमध्ये २.७६ लाख शिक्षक कार्यरत असून ९८.०६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यातील या शाळांचे प्रमाण २३ टक्के आहे. वास्तविक, २००९ च्या शिक्षण हक्क कायद्याच्या कलम २७ मध्ये ही तरतूद आहेच. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १३ सप्टेंबर २०१० रोजी राज्यांना मार्गदर्शक सूचनांमध्येही शिक्षकांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले होते, तरीही राज्यात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. चार वर्षांपूर्वी शिक्षकांनी 'आम्हाला शिकवू द्या' ही मोहीम सुरू केली. सरकारी आश्वासनानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नाही. २०२३ मध्ये शालेय पोषण आहारच्या जुन्या आर्थिक नोंदींचे लेखापरीक्षण, निरक्षरता सर्वेक्षण आणि अन्य प्रशासकीय जबाबदाऱ्यांवर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला. विधिमंडळात ९ सप्टेंबर २०२३ रोजी यावर विस्तृत चर्चा झाली. शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव रंजितसिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली.
समितीने शिक्षकांना अन्य सरकारी विभागांच्या कामांपासून मुक्त ठेवण्याची, शालेय पोषण आहार नोंदी, त्यासंबंधीची प्रशासकीय कामे हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची सूचना केली. सरकारने २४ ऑगस्ट २०२४ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यात २० शैक्षणिक आणि १२ अशैक्षणिक कामांची यादी निश्चित केली. स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त अभियान, अन्य विभागांची सर्वेक्षणे, दुसऱ्या विभागांच्या संकेतस्थळांवर माहिती भरणे आणि इतर संस्थांच्या परीक्षा आयोजित करणे या कामांना अशैक्षणिक ठरवून ही कामे शिक्षकांना बंधनकारक करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले, तरीही शिक्षकांच्या तक्रारी थांबल्या नाहीत. कारण, वेगवेगळ्या विभागांकडून शिक्षकांना आदेश दिले जातात. एखाद्या अधिकाऱ्यास विशिष्ट माहिती तातडीने हवी असते. त्यासाठी शिक्षक सहज उपलब्ध होणारे मनुष्यबळ आहे. आदेशाचे पालन केले नाही, तर कारवाईची भीती असते. म्हणून शासन निर्णयाला कायद्याचे संरक्षण आवश्यक आहे.
जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांमधील २ लाख ३१ हजार २४७ शिक्षकांना नवीन कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवल्याने शिक्षण व्यवस्थेत कायदेशीर व प्रशासकीय विषमता निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद शिक्षकांना जुन्या शासन निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्यात सुमारे ९,२६९ शाळा एकशिक्षकी आहेत, जिथे १.७९ लाख विद्यार्थी घेतात. यातील बहुतांश शाळा जिल्हा परिषदेच्या असून दुर्गम व ग्रामीण भागात आहेत. येथील शिक्षकांवर इतर कामे लादली गेल्यास शाळा बंद ठेवावी लागते. अनुदानित शाळांमध्ये सरासरी ११ शिक्षक असल्याने एका शिक्षकाचे काम दुसरा सांभाळू शकतो; पण जिल्हा परिषद शाळांमध्ये तसा पर्याय नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे थेट शैक्षणिक नुकसान होते. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि स्वयंअर्थसहायित शाळा या प्रस्तावित कायद्याच्या कक्षेतून वगळल्यामुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचा प्रश्न राज्यातील सर्व शाळांसाठी एकाच कायद्याने सुटणार नाही.
जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमधील शिक्षकांना अन्य विभागांकडून कामे देण्याचा प्रश्न स्वतंत्रपणे हाताळावा लागेल. राज्य सरकारने याची जाणीव ठेवून सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांना समान संरक्षण देणारी प्रशासकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याचा अर्थ शिक्षकांच्या प्रत्येक अतिरिक्त जबाबदारीला विरोध करणे असा होऊ नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, शाळेतील प्रशासकीय व्यवस्था सुरळीत चालावी आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी काही कामे आवश्यक असतात. प्रश्न त्यांच्या स्वरूपाचा, प्रमाणाचा आणि जबाबदारीच्या वाटपाचा आहे. शिक्षणव्यवस्थेतील प्रत्येक समस्येचे उत्तर शिक्षकांकडून अधिक काम करून घेण्यात शोधण्याची मानसिकता बदलली पाहिजे. शिक्षकेतर कामांसंदर्भात सर्वच शिक्षकांना समान कायदेशीर संरक्षण मिळाल्याशिवाय या मानसिकतेला लगाम बसणार नाही.