सध्या अमेरिकन गायिका आणि गीतकार टेलर स्विफ्ट जागतिक संगीत क्षेत्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण, काही दिवसांपूर्वी तिने संपूर्ण युरोपमध्ये काढलेल्या ‘ईरास टूर’ या संगीत दौर्यातून तिला अब्जावधी रुपयांची प्राप्ती झाल्याच्या बातम्या विदेशी प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे इतकी प्रचंड कमाई करणारा कदाचित तिचा हा जगातील पहिलाच संगीत दौरा असावा, असे बोलले जात आहे. लंडन, पॅरिस, व्हिएना आणि बर्लिनसारख्या शहरांमधील तिच्या कार्यक्रमांची तिकिटे उपलब्ध झाल्या झाल्या काही वेळातच हातोहात संपली होती.
यामुळे केवळ तिच्या संगीत कौशल्याचाच नाही, तर जागतिक लोकप्रियतेचाही पुनःप्रत्यय आला होता. तिने या टूरमध्ये तिच्या कारकिर्दीतील विविध संगीत कालखंड (ईरास) दाखवले, जे चाहत्यांना मनापासून आवडले. याशिवाय अलीकडेच अमेरिकन फुटबॉल खेळाडू ट्रॅविस केल्सी सोबत तिचे नाव जोडले गेल्याने जगभरातल्या गॉसिप स्टोरींमध्ये ती पुन्हा एकदा झळकली. अशा या म्युझिक क्वीन टेलर स्विफ्टचा जन्म 13 डिसेंबर 1989 रोजी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील रीडिंग या शहरात झाला. लहानपणापासूनच संगीत आणि लेखनाची आवड असल्यामुळे तिने किशोरवयातच गीते लिहायला सुरुवात केली. तिचा पहिला अल्बम ‘टेलर स्विफ्ट’ 2006 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यातील ‘टिम मॅकग्रा’ हे गाणं लोकप्रिय ठरलं. त्यानंतर ‘फिअरलेस’, ‘स्पीक नाऊ’, ‘रेड, नाईन्टीन एटीनाईन’, ‘रिप्युटेशन’, ‘लव्हर, फोकलोर’, ‘एव्हरमोर’ आणि ‘मिडनाईटस्’ या अल्बमनी तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं.
टेलर ही फक्त गायिका नसून एक प्रतिभावान गीतकारही आहे. तिची गाणी प्रेम, विरह, आत्मसन्मान आणि सामाजिक जाणिवांवर आधारित असतात. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांना गाण्यांतून मांडत असते. यामुळे तिचे चाहते तिच्याशी भावनिकद़ृष्ट्या जोडले जातात. तिच्या संगीतशैलीत पॉप, रॉक आणि इंडी अशा विविध शैलींचा समावेश आहे. तिच्या कारकिर्दीत तिला ग्रॅमीसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून ती ‘टाईम’ मॅगझीनच्या ‘100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल’ यादीत अनेक वेळा झळकली आहे. व्यावसायिक यशाबरोबरच ती सामाजिक विषयांवरही स्पष्ट भूमिका घेते.
महिलांच्या हक्कांपासून ते एलजीबीटी समुदायासाठीच्या समर्थनापर्यंत तिने आपल्या मंचाचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी वेळोवेळी केला आहे. काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये पार पडलेली तिची बहुचर्चित ‘ईरास टूर’ ही तिच्या संपूर्ण कारकिर्दीचा संगीत उत्सव होती. ही टूर केवळ संगीतप्रेमींसाठी नाही, तर जागतिक पॉप संस्कृतीसाठीही एक ऐतिहासिक पर्व ठरली आहे. या दौर्यामुळे टेलर स्विफ्ट ही केवळ एक युरोपियन पॉपस्टार नसून एक जागतिक कीर्तीची कलाकार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.