‘तमाल’मुळे नौदल सामर्थ्याला नवी बळकटी Pudhari File Photo
संपादकीय

Tamal Stealth Warship | ‘तमाल’मुळे नौदल सामर्थ्याला नवी बळकटी

‘तमाल’ अत्याधुनिक स्टेल्थ क्षेपणास्त्र युद्धनौकेचा भारतीय नौदलात लवकरच समावेश

पुढारी वृत्तसेवा
मिलिंद सोलापूरकर, ज्येष्ठ विश्लेषक

‘तमाल’ या रशियात तयार झालेल्या अत्याधुनिक स्टेल्थ क्षेपणास्त्र युद्धनौकेचा भारतीय नौदलात लवकरच समावेश होणार आहे. रशियातील कैलिनिनग्राद येथे पार पडणारी ही घटना भारताच्या सागरी धोरणाचा, सामरिक ताकदीचा आणि जागतिक भागीदारीतील द़ृढ नात्याचा उल्लेखनीय टप्पा ठरणार आहे. ही युद्धनौका केवळ सागरी सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर भारत-रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण संबंधांचे ठोस प्रतीकही आहे.

भारतीय उपखंडातील सागरी धोरण हे केवळ व्यापाराच्या द़ृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर सामरिक द़ृष्टिकोनातूनही निर्णायक ठरत आहे. अलीकडच्या काळात चीनच्या आक्रमकतेने आणि पाकिस्तान, बांगला देशच्या आगळिकीने हिंद महासागर क्षेत्रात नव्याने तणाव निर्माण केला आहे. अशा काळात भारताची सागरी ताकद म्हणजे भारतीय नौदल ही एक महत्त्वाची आघाडी बनते. गेल्या काही वर्षांत भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्याच्या द़ृष्टीने मोठी झेप घेतली गेली.

आता ‘तमाल’ या रशियात तयार झालेल्या अत्याधुनिक स्टेल्थ क्षेपणास्त्र युद्धनौकेचा नौदलात समावेश होणे हा भारताच्या सागरी धोरणाचा एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. ही युद्धनौका 1 जुलै रोजी ती भारताकडे सुपूर्द केली जाणार आहे. ही युद्ध नौका भारत, रशिया आणि युक्रेनच्या त्रिपक्षीय सहकार्याचे प्रतीक आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या काळातही तिचे उत्पादन चालू राहिले, ही बाब समस्त जगाने लक्षात घ्यायला हवी. तीन महिने चाललेल्या समुद्री चाचण्यांमध्ये या तमाल या नौकेने आपल्या प्रणाली, सेन्सर व शस्त्रास्त्रांची कामगिरी सिद्ध केली आहे.‘तमाल’ हे नाव देवेंद्र इंद्राच्या पौराणिक तलवारीवरून प्रेरित आहे. देव-दानव युद्धांतील विजयाचे ते प्रतीक मानले जाते.

या युद्ध नौकेचे इंजिन भारतात विकसित करण्यात आले व नंतर ते रशियात पोहोचवण्यात आले. या प्रक्रियेमुळे भारताची परिपक्व, संतुलित आणि प्रभावशाली जागतिक राजनैतिक भूमिका अधोरेखित होते. तमाल युद्धनौका सुमारे 125 मीटर लांबीची असून, तिचे वजन 3900 टन आहे. ती तासी 30 नॉट मैल वेगाने धावू शकते. या युद्धनौकेत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून जल, जमीन आणि नभ अशा तिन्ही पातळ्यांवर मारा करणारी यंत्रणा आहे. याशिवाय शंभर टक्के स्वदेशी प्रणाली, पल्सजेट चालणार्‍या रॉकेटस्, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि आधुनिक सेन्सर्स यांचा समावेश आहे. ही युद्धनौका आधुनिक सागरी युद्धासाठी सज्ज असून, भारताच्या सामरिक ताकदीचे ती प्रतीक आहे. ती भारताला केवळ सागरी सुरक्षेत बल देणार नाही, तर संपूर्ण हिंद महासागर क्षेत्रातील सामरिक समतोलातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. तमाल ही भारताच्या ‘स्वदेशी आय’ उपक्रमाचा एक भाग आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ब्रह्मोस एरोस्पेस, टाटा नोव्हा आणि अन्य भारतीय कंपन्यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भाग घेतला आहे.

तमाल ही ‘तेग’ आणि ‘तलवार’ वर्गातील युद्धनौकांप्रमाणे आधुनिक आणि प्रगत प्रणालींनी सज्ज आहे. यातील तांत्रिक प्रणाली, शस्त्रास्त्र यामध्ये भारताची वाढती निर्मिती क्षमता दिसून येते. यामध्ये अत्यंत कुशल प्रशिक्षण घेतलेले नौदल कर्मचारी असतील, ज्यांनी थंड हवामानात कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तमाल भारतासाठी केवळ एक सामरिक साधन नसून, ती सागरी ताकद, तांत्रिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे.

लवकरच भारतीय नौदलाची एक टीम रशियात जाऊन या युद्धनौकेची जबाबदारी स्वीकारणार आहे. यानंतर तमाल भारतात दाखल होऊन अधिकृतपणे नौदलात सामील होईल. भारत ज्या वेगाने सागरी ताकद वाढवत आहे, त्यामागील मुख्य कारण म्हणजे, वाढती सागरी आव्हाने. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा एक भाग म्हणजे ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) आणि ग्वादार बंदराचा वापर, हे भारतासाठी थेट सागरी आव्हान आहे. त्याचबरोबर चीन आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही’च्या माध्यमातून हिंद महासागरात सातत्याने उपस्थिती राखत आहे. म्यानमार, श्रीलंका, मालदीव, सेशेल्स अशा देशांत चीनने गुंतवणूक करून सागरी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ही स्थिती भारताच्या सागरी सुरक्षा द़ृष्टिकोनातून धोकादायक आहे. पाकिस्तानची नौदल क्षमता भारताच्या तुलनेत मर्यादित आहे, तरीही चीनकडून मिळणार्‍या मदतीमुळे त्यात सतत भर पडत आहे. ‘झुल्फिकार’वर्गाच्या फ्रिगेटस्, चिनी पाणबुड्यांची ऑर्डर आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या ग्वादार बंदरामुळे पाकिस्तानची सागरी स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘तमाल’ युद्ध नौका ही भारत-रशिया संरक्षण सहकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2016 मध्ये झालेल्या 21 हजार कोटी रुपयांच्या कराराअंतर्गत रशियात दोन व गोव्यात दोन अशा चार क्रिवाक-3 श्रेणीच्या स्टेल्थ युद्धनौका तयार होत आहेत. तमालमधील 26 टक्के भाग भारतीय बनावटीचा असून, भविष्यात हे प्रमाण अधिक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाशी सुसंगत हा प्रकल्प आहे. मआयएनएस तुशीलफ ही यातील पहिली नौका गेल्याच वर्षी भारतात दाखल झाली होती. या युद्धनौकांमध्ये वापरण्यात आलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्रे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नातून निर्माण झाली असून, ती जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र मानली जातात. सागरी सुरक्षेपासून ते जागतिक कूटनीती संबंधांपर्यंत भारताचा पुढील टप्पा निश्चित करणार्‍या या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तमालच्या निमित्ताने भारत सागरी क्षेत्रात नव्या सामर्थ्याने प्रवेश करणार आहे. त्यातून भारताच्या जागतिक धोरणाला बळ मिळणार असून जगभरात भारताच्या संरक्षण सामर्थ्याची नवीन ओळख निर्माण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT