शाळा हा खरे तर आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अतूट असा भाग असतो. तुम्ही काहीही विसराल; परंतु तुमचे शाळकरी मित्र, शालेय शिक्षक विसरू शकत नाही. कुणी काही चमत्कारीक कार्य केले की, काय शाळा केली? असे विचारण्याचीही नवीन पद्धत आलेली आहे. तसे पाहायला गेले, तर मग आपल्या राज्यात शाळेची शाळा झालेली आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे.
राज्यातील सुमारे 1 हजार 650 गावांत प्राथमिक शाळाच नाहीत, असे दिसून आले आहे. छोटी गावे असतात, तांडे असतात, वाड्या असतात. तिथे विद्यार्थी संख्या नसते, त्यामुळे शाळा पण नसते. अशा गावातील मुले प्राथमिक शाळेसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये जात असतात. मग ती कधी पायी जातील, कधी बसमध्ये जातील; परंतु एकंदरीत शाळेची सुरुवातच दुसर्या गावात जाऊन होत असेल, तर यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळणार तरी कसे, हा एक मोठा प्रश्न आहे.
अशाच पद्धतीने साडेसहा हजार गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत. उच्च प्राथमिकचे वर्ग साधारणत: पाचवीपासून सुरू होतात. चौथीपर्यंत आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पाचवीपासूनच्या पुढील शिक्षणासाठी त्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या गावांमध्ये जावे लागते. ग्रामीण भागामध्ये पायी फिरण्यासाठी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अत्यंत रम्य वातावरण असते. सगळीच मुले शाळेपर्यंत पोहोचतील, याची काही खात्री नाही.
ग्रामीण भागातील पालकांनासुद्धा शालेय शिक्षणाचे महत्त्व माहीत झाले आहे. छोट्या तालुक्यांमध्ये गेलात, तरी तुम्हाला काही इंटरनॅशनल शाळा पण पाहायला मिळतील. या शाळा खरोखरच इंटरनॅशनल असतात का, हे फार मनोरंजक असते. शाळा इंटरनॅशनल असते आणि तिथे शिकवणारे शिक्षकही सुरुवातीला इतर राज्यांमधून आणले जातात. हळूहळू इतर राज्यांतून आलेले शिक्षक आपल्या गावी निघून जातात आणि ती शाळा फारसे शिक्षण स्वतः न घेतलेल्या शिक्षकांच्या हातात जाते. याचा अर्थ ‘ग्लोबल ते लोकल’ हे या शाळांनी सिद्ध केले आहे.
शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे माध्यम आहे. इथे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. असंख्य गावांमध्ये शाळा नाहीत, हे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी मात्र धक्कादायक आहे. ‘गाव तिथे शाळा’ असे काही अभियान गेल्या काही वर्षांत राबविल्याचे आठवत नाही. या पार्श्वभूमीवर जपानसारख्या प्रगत देशांची कामगिरी ठळक दिसून येते. दुर्गम असणार्या एका गावात एकच विद्यार्थिनी शिक्षण घेत होती; परंतु त्या एका विद्यार्थिनीसाठी त्या गावात शाळा होती. एका गावातून केवळ तीन मुली शिक्षणासाठी मोठ्या शहरात येत होत्या. त्या एका गावासाठी जपानमध्ये ट्रेन येत होती. अशी धक्कादायक कामगिरी केल्यामुळे जपान हा प्रगत देश आहे की काय, हे समजण्यास मार्ग नाही. आपल्या राज्यात शाळांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. शाळाच नसेल, तर विद्यार्थी शिकणार कसे आणि ते शिकले नाहीत, तर मग देश पुढे जाणार कसा, असे असंख्य प्रश्न एका शाळेमधून उभे राहतात. कमी पटसंख्या असलेल्या गावांमध्ये शाळा चालवणे शासनाला परवडत नाही, त्यामुळे शाळा नसतात.