संपादकीय

तडका : शाब्बास मित्रा!

पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्यपणे व्यवहारात आजकाल चांगली माणसे मिळत नाहीत, अशी ओरड ऐकण्यात येते. थोडक्यात म्हणजे ज्याला जे काम नेमून दिलेले आहे, तो ते नीट करत नाही, अशी लोकांची तक्रार असते. समजा, दुकान सांभाळण्यासाठी एखादा नोकर ठेवला तर तो नीट काम करत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही लावावे लागतात. चार माणसे काम करत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एखादा सुपरवायझर नेमावा लागतो. चार सुपरवायझरवर एक मॅनेजर ठेवायला लागतो. या सर्वांचे कारण म्हणजे काम करणार्‍या व्यक्तींची कामाप्रति निष्ठा नाही, हे मालक मंडळींनी गृहीत धरलेले असते. अशा परिस्थितीत व्यवसायावर निष्ठा असणार्‍या एखाद्या चोराने काही कृती केली, तर ती देशभर चर्चेचा विषय निश्चितच होऊ शकते.

तामिळनाडूमध्ये चोरीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. ही चोरीची घटना 80 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सेलविन यांच्या घरी घडली आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि चार मुले आहेत आणि चेन्नईमधील मुलांना भेटण्यासाठी हे जोडपे घराबाहेर पडले होते. दुसर्‍या दिवशी मोलकरीण घरी पोहोचली, तेव्हा घराचे गेट उघडे असल्याचे पाहून तिला धक्का बसला. घरात कोणीतरी शिरल्याचे तिच्या लक्षात आले. तिने ताबडतोब मालकांना व पोलिसांना माहिती दिली. सर्व तपास केल्यानंतर चोरट्याने 60 हजारांची रोकड, दोन जोड सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण असा ऐवज पळवून नेल्याचे मालक आणि पोलिसांच्या लक्षात आले. यात ट्विस्ट असा आहे की, या चोराने घरमालकासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीतील मजकूर चोराच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब करणारा आहे.

चिठ्ठीमध्ये त्याने लिहिले होते की, मला माफ करा. माझ्या घरात कोणीतरी आजारी आहे म्हणून मी ही चोरी करत आहे. आपली चोरलेली सर्व रोकड व दागिने मी आपणास महिन्यात परत करीन. एखाद्या चोराने ज्या घरात चोरी करत आहे, त्या घराच्या मालकालाच लिखित हमी देण्याचा हा प्रकार लक्ष वेधून घेणारा आहे. चोरी तर करावी लागली; परंतु त्याची गरज अवघ्या काही दिवसांची असावी. महिनाभरात त्याची अडचण दूर झाल्यावर तो ते गहाण ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम मालकाला परत करणार, असे सांगत आहे. अशा या अजब चिठ्ठीने पोलिसही चक्रावून गेले आहेत. नियमाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासही सुरू केला आहे.

या ठिकाणी आम्हास असे वाटते की, प्रामाणिकपणे चोरी केलेल्या आणि जागेवर चिठ्ठी ठेवणार्‍या चोरावर थोडासा विश्वास ठेवून त्याने मागितला तसा एक महिन्याचा अवधी त्याला द्यायला पाहिजे. कदाचित न जाणो, तो चोर बरोबर एक महिन्यानंतर चोरी केलेला सर्व ऐवज आणि सोबत टॉवेल-टोपी घेऊन मालकाला आहेर पण करेल. इतका प्रामाणिकपणा जगात उरलाच कुठे आहे? असा प्रामाणिकपणा दिसत असेल तर तो कौतुकास्पद आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. सहसा चोर ज्या ठिकाणी चोरी करतात, त्या परिसरात पुन्हा कधीच प्रवेश करत नाहीत. आजकाल सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून चोराचा चेहरा लोकांना माहीत झालेला असतो. यामुळे बरेच चोर ते गाव किंवा ते राज्य सोडूनही निघून जातात; पण इथे या चोराने तसे काही न करता महिन्यात पैसे आणि ऐवज परत देण्याची हमी दिली आहे.

SCROLL FOR NEXT