अंगठेबहाद्दर..! (Pudhari File Photo)
संपादकीय

तडका : अंगठेबहाद्दर..!

पुढारी वृत्तसेवा

देशात साक्षरतेचे प्रमाण कमी होते तेव्हा कुठल्याही कागदावर अंगठे उमटविणार्‍या लोकांची संख्या जास्त होती. जे निरक्षर होते ते इतके अगदीच निरक्षर होते की, त्यांना स्वतःची सहीपण करता येत नसे. तहसील किंवा तत्सम कुठल्याही कार्यालयात तुम्ही गेलात, तर तिथे निळ्या शाईचे पॅड ठेवलेले असतात. ग्रामीण भागातील लोक तिथे त्या पॅडवर अंगठा ओला करून नंतर त्या कागदावर ठसा मारत असतात. अंगठ्याचे महत्त्व सर्व कागदपत्रांमध्ये वेगळेच काही आहे. प्रत्येकाच्या बोटांवरच्या रेषा वेगळ्या असतात. त्या अर्थाने एक मजबूत पुरावा म्हणून त्या व्यक्तीचा अंगठा घेतला जातो. साक्षरता वाढत गेली तसे अंगठेबहाद्दर लोक कमी होत गेले आणि ‘सह्याजीराव’ यांची संख्या वाढत गेली.

व्हॉटस्अ‍ॅप नावाचे एक अ‍ॅप मोबाईलमध्ये आल्यापासून या अंगठेबहाद्दर लोकांची संख्या खूप वाढलेली आहे असे तुमच्या लक्षात येईल. व्हॉटस्अ‍ॅपचा एखादा ग्रुप असतो, त्यामध्ये कोणीतरी काहीतरी टाकते आणि त्या ग्रुपवरील लोक लगेच पटापट तिथे अंगठे टाकतात. अशा अंगठेबहाद्दर लोकांची संख्या मात्र आता खूप वाढलेली आहे. दिसले स्टेटस की टाक अंगठा, असाच प्रकार सुरू आहे. निवृत्त आणि विशेष काही काम नसलेले लोक दिवसभरात मोबाईलवर इतके अंगठे टाकतात की, त्यांच्या अंगठ्यावरच्या रेषापण आता घासून गुळगुळीत झालेल्या असतील. पूर्वी काय काम करतोय, असा प्रश्न विचारला जायचा. आता त्याचे उत्तर तयार आहे की, ज्याला काम नाही तो मोबाईलवर काहीतरी पाहत आहे. तर्जनीने स्क्रीनवर सरकवत रीळ पाहणार्‍या लोकांची संख्या काही कमी नाही.

एकंदरीत मोबाईल पाहताना डाव्या हातात मोबाईल आणि उजव्या हाताची बोटे चालवत लोक आपले आयुष्य पुढे ढकलत आहेत. आजकाल पाहण्यात असलेला प्रकार म्हणजे, कोणत्या पोस्टवर कुणी काय टाकावे, याचेही काही बंधन राहिलेले नाही. एखाद्या नातेवाईकाच्या निधनाची बातमी कोणीतरी संबंधित ग्रुपवर टाकते, त्यावेळी श्रद्धांजली वाहताना चार-पाच लोक गडबडीत अंगठे टाकून देतात. हा अंगठा स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीला आहे की, पोस्ट टाकणार्‍याला आहे, हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. पोस्ट पूर्ण वाचून प्रतिक्रिया द्यावी इतकापण वेळ लोकांकडे नाही. ‘दिसली पोस्ट की, टाक अंगठा’ या पद्धतीने दिवंगत व्यक्तीच्या बातमीवरपण अंगठे टाकले जातात. अशा अंगठेछाप लोकांची संख्या प्रचंड वाढत चालली असून सोशल मीडियाने निर्माण केलेला एक वेगळाच वर्ग तयार होत आहे. मंडळी, आमची एकच विनंती आहे की, अंगठा ज्या बातमीवर, पोस्टवर, स्टेटसवर टाकणार आहात किमान ती आधी पूर्ण पाहून किंवा वाचून तरी घ्या म्हणजे गोंधळ होणार नाही. व्हॉटस्अ‍ॅपमध्ये ठेंगा दाखवणारेही चिन्ह आहे. एखादी पोस्टला जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करायचे असल्यास हा ठेंगा दाखविला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT