विक्रम : (जंगलात झाडापाशी येतो) मी तुला सोडणार नाही. तुझे तुकडे करून टाकेन. काळ बदलला. उलटा लटकायचा सोडून दे. चल माझ्यासोबत!
वेताळ : मी आधीच मेलो आहे. पुन्हा मरायचे नाही मला उगी उगी!
विक्रम : तू जिवंत माणसांचा पिच्छा सोड.
वेताळ : तूच धावतोस माझ्या मागं पिढ्यान् पिढ्या. मी गप लटकलोय. तू सोड माझा पिच्छा. ही ही हा हाऽऽ
विक्रम : मेला आहेस, तर जिवंत माणसासारखा बोलतो कसा? पूर्वज फसले असतील. मी नाही. एक साधू तुझी वाट पाहत आहे तुला मुक्ती देण्यासाठी. चल! (विक्रम झाडावर चढतो. वेताळ हवेत झेपावतो)
वेताळ : ही ही हा हा... ही ही हा हा हाऽऽ विक्रम, तो साधू धूर्त आहे. पाखंडी आहे. तो तुला फसवून तुझा बळी घेणार आहे.
विक्रम : मी बोलण्यात अडकणारा नाही.
वेताळ : राग बरा दिसत नाही तुझ्या मुखकमलावर. मी तुझ्या सापळ्यात अडकणारा नाही. हा हा हा.ऽऽ (हवेत उडू लागतो)
विक्रम : किती दिवस पळशील?
वेताळ : तू माझे ऐकत नाहीस तोपर्यंत. मागे फिर. मी कधीच सापडणार नाही.
विक्रम : मी आता पूर्वीचा विक्रम नाही. बंदूकही चालवतो. (बंदूकीने गोळ्या झाडतो.)
वेताळ : मला कशा लागतील गोळ्या?
विक्रम : जास्त जोर चढला आहे तुला. गाडलेले मुडदे उखडतो मी. दशावतारी रावण पण घाबरतो मला. तू तर पाचोळ्यासारखा आहेस. चोळा मोळा करेन तुझा.
वेताळ : जुने डायलॉग. अशामुळे तुझे पूर्वज फसले होते त्या साधूच्या कचाट्यात!
विक्रम : तू खोटे बोलतोस. ते नाटक होते.
वेताळ : हा हा हाऽऽ आता काय सिनेमा काढतोस त्यावर? माझे कास्टिंग हेच असलं, तर सांग जरा वेगळं काय तरी करतो; पण शेवटी तुला मी हूल देऊन जाणारच. पस्तावशील!
विक्रम : आता नाही सुटणार तू. रोबो तयार केला आहे आम्ही तुला पकडण्यासाठी. ओळख कोण? रियुनियन आहे आमची आता सिनेमा तर सिनेमा. बोल!
वेताळ : रजनी भाई? ये बाबा विक्रमा. असं नको करू मला आताच घेऊन चल. दुसरीकडं बघून तिसरीकडं नेम मारतोय तो तुझा रोबो. मी आताच उतरतो झाडावरनं. चल घेऊन चल मला. तेचा काय नेम नाही.
रजनी :(एन्ट्री करतो) रजनी! सिर्फ नाम ही काफी है... हा हा हाऽऽऽ
(विक्रम आणि रजनी वेताळाला ताब्यात घेतात.)