Tadaka Article | पोलिस-पब्लिक 
संपादकीय

Tadaka Article | पोलिस-पब्लिक

पुढारी वृत्तसेवा

पोलिस : (मिरवणुकीत) ये टोपीवाल्या, ये अरे तू तू. नाचतोस काय इकडं गटार आहे. पडशील की त्यात. अरेरे... रस्त्यावरनं थेट गटारात? प्रगती आहे तुझी. जरा कमी प्यायची. हाणू काय एक.

दारूडा : ओ साहेब. प्रगती होत नाही म्हणूनच पितोय. मिरवणुकीत तेवढंच सगळ्यांसोबत करमणूक म्हणून. आलो थांबा रस्त्यावर...

पोलिस : तू लवकरच रस्त्यावर येणार आहेस अशानं लेका. जा घरी पोरं घरात वाट बघत असतील. रात्रीचे दहा वाजत आलेत. या मिरवणुका दुसर्‍याच्या यशाच्या. कशाला मिजास करायची फुकटची. आपले पैसे खर्च करून?

दारूडा : दारूला कुठं पर्वा कशाची! कुणाच्या बी पैशानं पिली तरी काय म्हणत न्हाई ती. गप गुमान घशात जाती. ही ही ही...

पोलिस : गुमान जातोस का. बाकीपण आहेत मिरवणुकीत. त्यांनी घेतली का समजेना. आम्हाला बघून निम्मी उतरते एकेकाची. तू जास्तच चढेल दिसतोस. टाकू का आत.

दारूडा : ओ ओ नको सायेब. (हात जोडत झोकांड्या देत) पोरं लहान हायत. बायको लय कजाग हाय, परत घरात घ्यायची न्हाई. फुकटचं मिळतंय जेलात म्हणून जा म्हणंल तिकडंच.

पोलिस : चल मग लय हौस आहे तर. लेका सुद्रायचं बघ. दारूबिरू सोड. कामाला लाग. तुमच्यामुळं आमची कामं वाढतात फुकटची. आम्हालापण घरं आहेत. असल्या वाढीव कामांमुळे घरी लवकर जाता येत नाही. बर्‍या बोलानं घरी जा, नाही तर एक बसल बघ आता.

दारूडा : जातो जातो साहेब. दोस्त हाय माजा तिकडं अडकलाय. तेला येऊ द्या, जातो.

पोलिस : तुझ्यासारखंच असणारं.

दारूडा : सायेब. न्हाई ओ. लय गरीब हाय स्वभावानं. माजा म्हेवणा हाय. त्यो बघा आला.

पोलिस : (त्या इसमाला) तू? तू तर हवालदार धोंडू. तू काय रखवालदार काय रे ह्याचा. बंदोबस्त कोणाचा, रखवालदारी कोणाची! जा घेऊन याला. डोकं फिरवलंय मघापासून.

धोंडू हवालदार : साहेब, मेव्हणा आहे आपला. ते पब्लिक आहे ज्यांच्यासाठी आलो या मिरवणुकीत. आधी नाती बघितली पाहिजेत. पब्लिक काय रोज वेगळं असतंय. हे एक काम रोजचंच हाय. ह्यांनी प्यायची, बंदोबस्तात येतात फुकटची प्यायला मिळते ना? तेवढंच आपलं आम्ही पोलिस असल्याचा अशांना उपयोग.

पोलिस : अरे, काय करू रे तुमचं. जा तोंड घेऊन. पोलिस आणि पब्लिक घाला धिंगाणा काय तो. उद्या पोलिस स्टेशनवर या वर्दी द्यायला.

धोंडू हवालदार : साहेब, ते बघा. तुमचे साडू. फुल टाईट. मिरवणूक लय गाजवली त्यांनी मगापासनं. आता बोला!

पोलिस : (कपाळावर हात मारत) अरे देवा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT