तुम्हाला माहीत आहे, एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि जर का कुणी माझ्या नादाला लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला माहीत आहे. पिंपरी-चिंचवडात आम्ही काय काय सुधारणा केल्या. पुण्यामधलेसुद्धा रस्ते, पूल, फूटपाथ, डिव्हायडर वगैरे वगैरे आम्हाला तसेच करायचे होते. निधी आम्हाला व्यवस्थित खेचून आणायचा होता आणि व्यवस्थित खर्च करायचा होता. आतापर्यंत जो काही त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला होता तो आम्हाला सहन होत नव्हता. गुंडगिरी आम्ही मोडून काढणार होतो. मेट्रो बिट्रो मोफत करणार होतो. एवढं सगळं सांगून सवरूनसुद्धा दोन्ही महानगरपालिकांमध्ये आमचा करेक्ट कार्यक्रम झाला.
आमच्या खिशात नसेना का आणा, पण आम्ही चोवीस तास नळाला पाणी देणार होतो. आम्हाला बाजीराव म्हणा असं कधी म्हणालो बाबा? तरी आमचा करेक्ट कार्यक्रम झाला? आमचे काका बिचारे खूप चांगले. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही आतापर्यंत सुखी होतो. त्यांना आम्ही तुमचं वय झालंय. तुम्ही आता थांबा म्हणत होतो. त्यांनी ऐकलं नाही. शेवटी आम्ही त्यांचा पक्ष पळविला. आम्हाला आमचा विकास पाहिजे होता.
मी शब्दाचा पक्का आहे. देवेंद्रजीबरोबर आम्ही गेलो असलो तरी या स्थानिक निवडणुका आहेत. दोस्तीतली कुस्ती होती ती! आम्ही काही तरी बोललो असेन कमी-जास्त! म्हणून काय आमचा करेक्ट कार्यक्रम करायचा? आमचे होमपीच आहे हे! महाराष्ट्रातील लोक काय म्हणतील? कधी नाही ते काका आमच्यासोबत मैदानात उतरले. आख्खा महाराष्ट्र म्हणत होता, बरे झाले या निमित्ताने काका-पुतणे एक झाले. त्यांना पण तुम्ही उघडे पाडले? चांगलाच निघाला की तुमचा परिंदा! हमारे पंख ही छाट दिए उसने? त्याच्याकडे बघितले तर त्याची दाढी वगळता काहीही भीतीदायक वाटत नव्हते. पण त्याने आमचा करेक्ट कार्यक्रम केला! आमचे स्वप्न त्याने धुळीस मिळविले.
आम्हाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे लंडन आणि पॅरिस करायचे होते. आमचे या लढाईत पानिपत नव्हे तर पुणेपत झाले! आता झाले ते झाले! पाच वर्षे आम्ही इकडे फिरकणार नाही. कारण की आता आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा लागेल! हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा! मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो मंजूरे खुदा होता है।