माणसाने किती पळायचे? पळून पळून ऊर फुटायची वेळ आली. पण सत्ता हातात असल्याशिवाय मजा येत नाही. राहवतच नाही म्हणा ना. पट्टीच्या राजकारण्याला सत्ता हवीच असते. कारण चित्त त्यांचे खुर्चीपाशी... अशी त्यांची अवस्था असते. शिवाय सत्ता हातात असली की फायली कशा पटापट हलतात. कार्यकर्त्यांना जपता येते. जनतेचीही कामे सहज करता येतात.
म्हणूनच काकाचा हात सोडला आणि युतीचा हात धरला. हाताखाली काम करणारी माणसे पुढे गेली. नशीब बलवत्तर म्हणून युतीमध्ये आपले मूल्य वाढले आणि थेट उपमुख्यमंत्रिपदाचे ताट मिळाले. पण आपला स्वभाव कधी बदलेल का? भलता स्वाभिमानी स्वभाव. रवींद्र चव्हाणांना तो माहिती होता. म्हणून देवेंद्रजींना ते कानात सांगायचे. देवाभाऊ, यांच्याबाबत दहादा विचार करा.
पण देवाभाऊ मोठ्या मनाचा माणूस होता. तो हलक्या कानाचा नव्हता. त्यांनी रवींद्रनाथांकडे दुर्लक्ष केले. ते म्हणाले, दादा कसा माणूस आहे हे मला माहितीय. तो जर राजकारणात नसता तर इन्स्पेक्टर झाला असता. अशी आपली छबी आहे. ही छबी आपल्याला बापजाद्यांकडून मिळालीय. चेहरा कडक. बोलणे कडक. एकदम कडक चहाच्या जाहिरातीत शोभण्यासारखा. त्यात काका आमचा लय भारी! एकदम निर्मळ स्वभावाचा. कधी काय करील याचा नेम नाही. त्यांनी कुणाकुणाची सरकारं पाडली आणि स्वतः सत्ता मिळविली. मग मी काय मागे पडतो की काय? मी आमच्या काकाचा पुतण्या. त्यांची विद्या त्यांच्यावरच उलटविली.
पण काका थकले नाहीत. त्या गणेश नाईकांसारखे ते अजूनही खूप चालतात. गणेश नाईक म्हणे एकनाथरावांपेक्षा जास्त आणि फास्ट चालतात. पहिल्यातली ही माणसे चालण्यात कुणाला ऐकणार नाहीत. पहिल्यातलं खाल्ले-प्यालेले हे लोक! पुण्यात काकांना मुद्दाम मी बरोबर घेतलं. पण ये गं साळू चौघी लोळू तशी माझ्याबरोबर काकांची गत झाली. आता तोच प्रयोग झेडपीमध्ये करायचा माझा विचार आहे. पण चालून चालून गुडघे दुखायची माझी वेळ आलीय. त्यामानाने आमचे काका घट्ट! खरं तर नातवंडं, परतवंडं घेऊन शेतातल्या हवेलीत आराम करायचं त्याचं वय! पण माझ्यामुळे त्यांची खूप दगदग होते बाबा.