ठाकरे भवनामध्ये सगळे भाऊ भाऊ एकत्र जमले होते. उद्धव, राज, आदित्य, अमित सगळे सगळे उपस्थित होते. विषय होता - निवडणुकीतील यशापयश : एक आत्मचिंतन! सोबत चहा, कॉफी, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे व संजूबाबा होते. सगळ्ंयाच्या चेहर्यावर थोड्याफार विजयाचा आनंद होता व थोड्याफार पराभवाचा विषाद होता. पण एकंदरीत वातावरण खेळीमेळीचे होते.
उद्धव : राज! तू काहीपण म्हण, ही निवडणूक खूपच त्वेषाने आणि आत्मविश्वासाने लढलो आपण!
राज : तर काय! बरेच दिवस साठवून ठेवलेला जोश असा एकदम बाहेर पडतो ना तेव्हा अणुरेणू पेटून उठतो.
आदित्य : मला तुमच्या दोघांकडे बघून कधी राहवतच नव्हते चाचू!
अमित : माझा स्वभाव थोडा शांत असल्याने मी अंतर्मुखच होतो.
उद्धव : तुला काय वाटतंय राज, अजून आपल्याला काय काय करायला पाहिजे?
राज : अरे असे आपण आग ओकतो ना तेच बरे आहे. त्यामुळे तर ते सगळे टरकून असतात आपल्याला.
अमित : खरं सांगू का? ही आग बिग सगळे बरोबर आहे. पण..
उद्धव : पण काय?
अमित : त्यामुळे मतदारपण आपणाला टरकून असतात.
संजय : मी बोलू का मध्ये?
उद्धव : हं बोला!
संजय : मला या निवडणुकीत काही साक्षात्कार झालेत.
आदित्य : हो मलाही काही साक्षात्कार झालेत.
संजय : माझं आधी ऐकून घ्या. आपण आता आपली युद्धनीती बदलली पाहिजे.
उद्धव : ती कशी!
संजय : म्हणजे देवाभाऊ पाहा कसे शांत असतात. कितीही आरोप झाले तरी शांतपणे उत्तर देतात. नेहमी विकास विकास म्हणतात. ते कमी बोलतात.
राज : म्हणजे त्यामुळेच त्यांना यश मिळाले म्हणताय?
संजय : होय. नाही तर काय?
उद्धव : बघू विचार करूया या युद्धनीतीवर! पुढच्या निवडणुकीपर्यंत बदल करू.