Tadaka article
तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

तडका : घ्या सुट्टी; पण जा आई-बाबाच्या भेटीला

पुढारी वृत्तसेवा

घर सोडून नोकरी किंवा उद्योगासाठी बाहेर पडलेली मुले आई-वडिलांना भेटत नाहीत असे निरीक्षण आसाम सरकारने नोंदवले आहे. सरकारला आणि विशेषतः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निर्णयामुळे देशाचे लक्ष आकर्षित करून घेणार्‍या मुख्यमंत्री बिस्वा सर्मा यांना असे वाटले की, मुलांनी आई-बापाला भेटले पाहिजे. आपल्या चिरंतन भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून लेकराबाळांनी आई-बापाला सांभाळले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. बरेचदा अनेक व्याप असल्यामुळे महिनोनमहिने मुलाबाळांची आई-वडिलांशी भेट होत नाही. बरेचदा आई-वडील गावाकडे घरी असतात आणि मुले नोकरीसाठी राज्याच्या अन्य भागांत असतात. साहजिकच आई-वडिलांना भेटायला जायचे, तर सुट्टी घ्यावी लागते. ती मिळेल की नाही, याची काही खात्री नसते. त्यामुळे येत्या नोव्हेंबरमध्ये सणांना जोडून विशिष्ट तारखांना आसाम सरकारने सर्व सरकारी कर्मचार्‍यांना दोन दिवसांची विशेष किरकोळ रजा म्हणजेच सुट्टी दिली आहे. यावेळी कर्मचार्‍यांनी आई-वडिलांना किंवा सासू-सासर्‍यांना भेटायला जाणे अपेक्षित आहे.

नोव्हेंबर महिन्यात आसाममध्ये दोन विशिष्ट सण असतात. त्याला लागून ही सुट्टी घेतली तरी चालणार आहे. कुठेतरी पिकनिक स्पॉटवर जाऊन मजा करण्यासाठी ही सुट्टी घेता येणार नाही. आपण आई-वडिलांनाच किंवा सासू-सासर्‍यांना भेटायला जात आहोत, गेलो होतो असा पुरावा कर्मचार्‍यांनी सुट्टी घेतल्यानंतर शासनाला सादर करायचा आहे. एखादा सेल्फी, आपण आहोत ते लोकेशन, गावाकडचे लोकेशन असे काहीतरी मागितले जाईल आणि कर्मचार्‍यांना ते सादर करणे बंधनकारक असेल. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंबपद्धती हा एक संस्कार आहे. काळ बदलला तसे अंतर बदलत गेले आणि आई-वडील एकीकडे आणि मुले अन्यत्र अशी स्थिती उद्भवली. स्वतःच्या जगण्याचा आटापिटा करताना नोकरी करणार्‍या मुलाबाळांना आई-वडिलांच्या भेटीसाठी वेळच राहिला नाही किंवा भेटण्याची त्यांची मानसिकता राहिली नाही, हे वास्तव आहे. अशा प्रकारची दोन दिवसांची सुट्टी दिल्यानंतर आणि त्याला लागून आलेल्या दोन सणांच्या सुट्टीमध्ये चार दिवसांचे नियोजन करून मुलेबाळे आई-वडिलांना किंवा सासू-सासरे यांना भेटायला गेली, तर हरवत चाललेले भावबंध पुन्हा जोडले जाण्याची शक्यता आहे. सबब दोन सुट्ट्या दिल्यानंतर कर्मचारी निश्चितच त्या उपभोगतील आणि शासन सूचनेप्रमाणे आई-वडिलांना किंवा सासू-सासर्‍यांना भेटतीलच. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक यासाठी की, जेवढी आई-वडिलांना मुलाबाळांच्या भेटीची ओढ असते तेवढीच सासू-सासर्‍यांना पण मुलीची, जावयाची आणि नातवंडांची भेट होण्याची ओढ असतेच याचा पण त्यांनी विचार केला आहे. राज्यातील सामाजिक तसेच कौटुंबिक वातावरण उत्तम असावे, यासाठी आसाम सरकारचे अभिनंदनच केले पाहिजे.

व्हिडीओ कॉल आणि तत्सम सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-वडिलांशी संपर्क ठेवण्यापेक्षा या भेटी प्रत्यक्ष आणि उराउरी व्हाव्यात अशी शासनाची अपेक्षा आहे. सध्या आपल्या राज्यात प्रत्यक्ष विठ्ठल भेटीसाठी वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन यूट्यूब किंवा तत्सम सोशल मीडियावर सहज घरबसल्या होऊ शकते; परंतु प्रत्यक्ष भेटीचा अपूर्व आनंद घेण्यासाठी वारकरी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.

SCROLL FOR NEXT