डॉ. विजय कुमार
12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताच्या वैचारिक पुनर्जागरणाचे शिल्पकार होते. त्यांचे विचार आजही समाज, राष्ट्र आणि युवकांसाठी प्रेरणास्रोत आहेत.
स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. बालपणापासूनच ते बुद्धिमान, जिज्ञासू आणि निर्भीड स्वभावाचे होते. प्रश्न विचारणे, सत्य शोधणे आणि रूढी-परंपरांना आव्हान देणे ही त्यांची सहज वृत्ती होती. वडिलांकडून तर्कशुद्ध विचारांची देणगी, तर आईकडून धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार त्यांना मिळाले. या दोन्ही प्रवाहांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसतो. रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरू होते. ‘ईश्वर अनुभवाने कळतो’ हा रामकृष्णांचा संदेश विवेकानंदांनी केवळ आत्मसातच केला नाही, तर तो संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला. त्यांनी वेदांचा गाभा आधुनिक भाषेत मांडला आणि अध्यात्म व विज्ञान यांच्यातील दरी मिटवण्याचा प्रयत्न केला.
1893 साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेले भाषण हा भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. ‘माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो’ या शब्दांनी त्यांनी भाषण सुरू केले आणि संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्या भाषणाने भारताची आध्यात्मिक ओळख जगासमोर ठळकपणे मांडली. भारत म्हणजे केवळ गरिबी आणि अंधश्रद्धा नव्हे, तर सहिष्णुता, मानवता आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देणारी संस्कृती आहे, हे त्यांनी जगाला पटवून दिले. ‘जोपर्यंत देशातील शेवटचा माणूस उपाशी आहे, तोपर्यंत देवपूजा निरर्थक आहे,’ असे ते ठामपणे सांगत. त्यांच्यासाठी मानवसेवाच खरी ईश्वरसेवा होती. युवकांवर स्वामी विवेकानंदांचा विशेष विश्वास होता. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका,’ हा त्यांचा मंत्र आजही युवकांना प्रेरणा देतो. शिक्षण म्हणजे काय, केवळ पुस्तके नव्हेत, विविध ज्ञानाचा संग्रह नव्हे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘ज्या प्रशिक्षणामुळे वर्तमान आणि आविष्काराची अभिव्यक्ती नियंत्रणात आणली जाते आणि फलदायी बनते त्याला शिक्षण म्हणतात.’ याचा अर्थ असा की, स्वामी विवेकानंदांना शिक्षणातून कल्पकता व सजर्नशीलता अभिप्रेत होती. शिक्षणाने माणसाला यंत्रवत बनवू नये, गुलाम बनवू नये, त्याला मुक्तपणे विचार करण्याची संधी शिक्षणाने दिली पाहिजे. शिक्षण हे शाश्वत व विकासाचे साधन व्हावे, शिक्षणाच्या माध्यमातून भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती. तेजस्वी ध्येयवादी आणि पोलादी मनगटाचा जागृत युवक, अशा बलशाली राष्ट्राचा आधार होय, असे त्यांचे मत होते.
विवेकानंद म्हणत, लोकांना शिक्षित करा, त्यांचे जीवन संस्कार प्रक्रियेतून वाढवा, त्यातून एक नवे राष्ट्र उभे राहू शकेल. अशा प्रकारे शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत विकासाचा मंत्र दिला. त्यांच्या मते, विद्यापीठे म्हणजे केवळ हस्तिदंती मनोरे नव्हेत. तसेच शिक्षण म्हणजे विद्यापीठाच्या ग्रंथालयातील हजारो पुस्तकांचे गठ्ठे नव्हेत. शैक्षणिक संस्था व विद्यापीठे ज्ञाननिर्मिर्तीची केंद्रे व्हावीत, असा त्यांचा आग्रह होता. चांगले आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांवर नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचा संस्कार करू शकतात, असे त्यांचे मत होते. स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रप्रेम केवळ भावनिक नव्हते, तर वैचारिक होते. भारत महासत्ता व्हावा, अशी त्यांची कल्पना भौतिक संपत्तीवर नव्हे, तर चारित्र्य, ज्ञान आणि आध्यात्मिक बळावर आधारित होती. पाश्चिमात्य देशांकडून विज्ञान, शिस्त आणि संघटन शिकावे, तर भारताने जगाला अध्यात्म, सहिष्णुता आणि मानवी मूल्ये द्यावीत, असा त्यांचा समन्वयवादी द़ृष्टिकोन होता. त्यांनी दाखवलेला मार्ग हा केवळ आध्यात्मिक उन्नतीचा नव्हे, तर सर्वांगीण मानवी विकासाचा आहे. त्यांच्या विचारांना केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता आचरणात आणले, तरच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल. विचारांनी जागवलेले हे राष्ट्र घडवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचारच आपले सर्वात मोठे बळ आहेत.