एका जनमत पाहणीनुसार गेल्या महिन्यापासून दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची लोकप्रियता 25 टक्क्यांनी घसरली होती. ती सावरण्यासाठी त्यांनी हा अनाठायी प्रपंच केला व मार्शल लॉची घोषणा केली आणि अखेर त्यांना कोलांटउडी घेऊन आदेश रद्द करावा लागला. ही फरफट त्यांची प्रतिमा आणखी बिघडवणारी ठरली. दक्षिण कोरियातील नेत्यांनी शांतता व विवेकभाव जागृत ठेवला, तर तेथील राजकीय व्यवस्था या वादळातून सुखरूप बाहेर पडू शकेल.
दक्षिण कोरियाच्या लोकशाही जीवनात अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष यून यांनी मार्शल लॉ घोषित केला आणि लोकांमधून कमालीचा असंतोष व्यक्त होऊ लागला. शेवटी लोकक्षोभासमोर राजसत्तेने लोटांगण घातले आणि मार्शल लॉ मागे घेण्यात आला; पण एवढ्याने संकट संपले नाही. देशाच्या राजकीय जीवनात संकटे उद्भवली की, एकत्र नव्हे, तर सलगपणे अनेक संकटे एकानंतर एक मालिकेसारखी येतात. या सत्याचा प्रत्यय सध्या दक्षिण कोरियात येत आहे. बाहेर लोक प्रक्षुब्ध आणि संसदेत विरोधक कमालीचे संतप्त या पार्श्वभूमीवर 6 तासांत मार्शल लॉ मागे घ्यावा लागलाच, पण आता विरोधी पक्ष यून यांच्यावर महाभियोग चालविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोगाच्या तयारीचे वेध लागले आहेत आणि त्यांच्या सिंहासनाला धोका निर्माण झाला आहे.
यून यांनी केलेली मार्शल लॉची घोषणा म्हणजे तेथील लोकशाहीला धोका निर्माण झाला आणि उभ्या जगाला अचानक हे कसे घडले, याचा धक्काही बसला. यून सुक येओल यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. त्यांच्या पुढे अनेक यक्षप्रश्नांची मालिका उभी राहिली आहे. अध्यक्ष महोदयांनी मार्शल लॉ घोषित केला आणि लोक आश्चर्यचकित झाले; पण लोकांचा दबाव वाढल्यामुळे आपला निर्णय चुकला की काय, असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी मार्शल लॉ मागे घेतला. आता दक्षिण कोरिया अशांतता, अस्थिरता आणि गोंधळजनक परिस्थिती यामध्ये बुडालेला आहे. त्यातून हा देश कसा बाहेर पडेल, याची चिंता वाटू लागली आहे. त्यांच्यावर अविश्वास ठराव आल्यास व महाभियोग मंजूर झाल्यास त्यांना पायउतार व्हावे लागेल. मागील आठवड्यात स्थानिक दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित करताना अध्यक्ष महोदयांनी आपल्या पत्नीच्या चुकांबद्दल चक्क माफी मागितली. चैनीची हँडबॅग स्वीकारणे आणि स्टॉक मॅन्युप्युलेशन करणे इत्यादी आरोपांत त्यांच्या पत्नीवर टीका झाली होती. त्यामुळे पतिराजालाही जनतेपुढे क्षमायाचना करावी लागली. अध्यक्ष महोदय एका विचित्र चक्रव्यूहात सापडले आहेत आणि विरोधी पक्षाने त्यांना कोंडीत पकडले आहे. आंदोलन पेटले की, त्यात ओले व सुके दोन्हीही जळते. आता त्यांच्या विरोधात वातावरण तापत आहे.
यून महोदयांनी मार्शल लॉ मोठ्या ऐटीत घोषित केला. त्यांना असे वाटले की, त्यामुळे प्रक्षुब्ध जनमत दाबून टाकता येईल आणि आपली सत्ता तहहयात पुढे चालविता येईल; पण मार्शल लॉचा हा जुगार त्यांच्याच अंगावर उलटला. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे काही मुखंड नेते उत्तर कोरियाशी चोरून हातमिळवणी करीत आहेत, असा संशय त्यांना वाटला. तसे झाले तर दक्षिण कोरियाचे अस्तित्व संपुष्टात येईल या भयाने त्यांनी मार्शल लॉ पुकारला. खरे तर युद्ध, हिंसाचार यासारखे गंभीर कारण घडले नव्हते, तरीही आपल्या अस्तित्वासाठी अध्यक्षांनी ही खेळी केली. ते लोकांना पटले नाही. त्यांची काही जुनी कुलंगडी, त्यांच्या होम मिनिस्टरची प्रकरणे आणि त्यांच्या कारकिर्दीतील काही गैरव्यवहार यामुळे लोकक्षोभ खूपच वाढला आहे, असे पाहून त्यांनी यू टर्न घेतला आणि मार्शल लॉ मागे घेण्याची नाट्यमय घोषणा केली. त्यामुळे सारेच चकित झाले. यून यांनी केलेली मार्शल लॉची घोषणा दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्ली या सर्वोच्च सभागृहाने 300 पैकी 190 मतांनी म्हणजे बहुमताने फेटाळून लावली. यावरून यून यांच्या विरोधात सदस्यांच्या भावना किती तीव— होत्या, हे लक्षात येते.
यून यांची आणखी कोंडी कशात असेल तर त्यांच्या विरोधात कामगारांनी दिलेली बेमुदत संपाची नोटीस होय. मागील फेब—ुवारीपासून देशातील डॉक्टर मंडळी दीर्घ संपावर आहेत आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्था साफ कोलमडली आहे. 22 बड्या प्रशासकीय अधिकार्यांवर त्यांनी महाभियोग दाखल केला होता, ही घटनासुद्धा अविश्वास वाढविणारी ठरली.