Somnath Temple | सोमनाथ स्वाभिमान पर्व : 1000 वर्षांची अढळ श्रद्धा Pudhari Photo
संपादकीय

Somnath Temple | सोमनाथ स्वाभिमान पर्व : 1000 वर्षांची अढळ श्रद्धा

1026 मध्ये झालेल्या पहिल्या आक्रमणापासून हजारो वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर आपल्या वैभवात तळपत उभे आहे

पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष

1026 मध्ये झालेल्या पहिल्या आक्रमणापासून हजारो वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर आपल्या वैभवात तळपत उभे आहे. हे मंदिर भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक गौरवाचे प्रतीक आहे. श्रद्धा, धैर्याच्या सामर्थ्यामुळे तिथे विनाश टिकू शकला नाही.

सोमनाथ... हा शब्द उच्चारताच मनात आणि हृदयात अभिमानाची भावना जागृत होते. हे भारताच्या आत्म्याचे शाश्वत प्रकटीकरण आहे. हे भव्य मंदिर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात राज्यातील ‌‘प्रभास पाटण‌’ येथे स्थित आहे. ‌‘द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रा‌’मध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. या स्तोत्राची सुरुवातच ‌‘सौराष्ट्रे सोमनाथं च..‌’ ने होते, जे पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात सोमनाथचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते. असेही म्हटले जाते की :

सोमलिंग नरो दृष्ट्वा सर्वपापैः प्रमुच्यते|

लभते फलं मनोवाञ्छितं मृतः स्वर्गं समाश्रयेत?

याचा अर्थ हा आहे की : केवळ सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो, त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात स्थान मिळवतो. दुर्दैवाने, ज्या सोमनाथावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा होती आणि ज्याची ते प्रार्थना करत असत, त्याच मंदिरावर परकीय आक्रमकांनी हल्ले केले; ज्यांचा हेतू भक्ती नसून विध्वंस हाच होता. सोमनाथ मंदिरासाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या महान तीर्थक्षेत्रावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला आता 1,000 वर्षे पूर्ण होत आहेत. जानेवारी 1026 मध्येच महमूद गझनवीने या मंदिरावर हल्ला केला होता. एका हिंसक आणि रानटी आक्रमणाद्वारे श्रद्धा आणि नागरी संस्कृतीचे हे महान प्रतीक नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तरीही, एक हजार वर्षांनंतरही हे मंदिर आजही तितक्याच वैभवात उभे आहे. कारण, सोमनाथच्या वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले गेले. अशाच एका महत्त्वपूर्ण टप्प्याला 2026 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत.

सोमनाथला मोठे आध्यात्मिक महत्त्व होते. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या समाजाला ते बळ देत असे, ज्यांचे समुद्रमार्गाने व्यापार करणारे व्यापारी आणि दर्यावर्दी या मंदिराच्या वैभवाच्या गाथा दूरदूरपर्यंत कथन करत असत. तरीही, मी आज पूर्ण अभिमानाने आणि निःसंदिग्धपणे हे सांगू इच्छितो की, आजचा इतिहास त्या विनाशासाठी ओळखला जात नाही, तर हा इतिहास भारतमातेच्या कोट्यवधी पुत्रांच्या अभेद्य साहसासाठी आणि धैर्यासाठी ओळखला जातो. ज्या ज्या वेळी या मंदिरावर हल्ले झाले, त्या त्या वेळी त्याचे रक्षण करण्यासाठी महान स्त्री-पुरुष उभे ठाकले आणि प्रसंगी त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही दिले. पिढ्यान्‌‍पिढ्या आपल्या महान संस्कृतीतील लोकांनी स्वतःला सावरले आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्बांधणी करून त्याचा जीर्णोद्धारही केला. ज्या भूमीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांना घडवले, त्याच भूमीत जन्म घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. भाविकांना सोमनाथमध्ये पुन्हा प्रार्थना करता यावी, यासाठी अहिल्याबाई यांनीच अतिशय उदात्त भावनेने प्रयत्न केले होते.

दक्षिण भारतातील काही प्राचीन मंदिरे आणि गुजरातचे सोमनाथ मंदिर आपल्याला शहाणपणाची अगाध शिकवण देतील. कोणत्याही पुस्तकांपेक्षा ही मंदिरे आपल्या इतिहासाची अधिक सखोलपणे जाणीव करून देतील. या मंदिरांवर झालेल्या शेकडो आक्रमणांच्या खुणा आणि त्यानंतर झालेले शेकडो पुनरुज्जीवन काळजीपूर्वक अनुभवा. ही मंदिरे सातत्याने उद्ध्वस्त केली गेली, तरीही प्रत्येक वेळी आपल्या अवशेषांमधून ती फिनिक्स पक्षाप्रमाणे ताकदीने पुन्हा उभी राहिली! हीच आपली राष्ट्रीय मानसिकता आहे, हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. याचे अनुकरण करा, हाच मार्ग तुम्हाला वैभवाकडे नेईल. जर तुम्ही हा मार्ग सोडलात तर तुमचा विनाश निश्चित आहे, ज्या क्षणी तुम्ही या जीवनप्रवाहातून बाहेर पडाल, त्या क्षणी तुमच्या पदरी केवळ मृत्यू आणि सर्वनाशाच असेल, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या.

स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे पवित्र कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हाती आले. 1947 मध्ये दिवाळीत पटेल यांनी सोमनाथला भेट दिली, त्यावेळी ते तेथील परिस्थिती पाहून इतके हेलावले की, त्यांनी तिथेच मंदिराच्या पुनर्बांधणीची घोषणा केली. अखेर, 11 मे 1951 रोजी सोमनाथमधील भव्य मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले गेले आणि त्या ऐतिहासिक प्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद स्वतः उपस्थितही होते. दुर्दैवाने हा ऐतिहासिक दिवस पाहण्यासाठी महान सरदार पटेल हयात नव्हते; परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, आणि आज ते एका भव्य मंदिराच्या रूपात खंबीरपणे संपूर्ण देशासमोर आहे.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना या घडामोडीबद्दल फारशी आस्था नव्हती. माननीय राष्ट्रपती किंवा कोणत्याही मंत्र्यांनी या विशेष समारंभात सहभागी होऊ नये, असे त्यांना वाटत होते. या समारंभामुळे भारताबद्दलचे मत वाईट होते आहे, असे ते म्हणायचे. परंतु, डॉ. राजेंद्र प्रसाद आपल्या मतावर ठाम राहिले आणि पुढे जे झाले तो इतिहास सर्वज्ञात आहे. सरदार पटेलांना भरघोस पाठिंबा देणाऱ्या कन्हय्यालाल मुन्शी यांचा उल्लेख केल्याशिवाय सोमनाथ मंदिराचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी सोमनाथ मंदिराबद्दल लिहिलेले पुस्तक ‌‘सोमनाथ - द श्राइन इटर्नल‌’ हे अतिशय माहितीपूर्ण लेखन आहे. आपल्या संस्कृतीत आत्म्याचे आणि चिरंतन विचारांचे अमरत्व मान्य केले आहे. जे चिरंतन आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही अशी आपली ठाम मान्यता आहे. आपल्या संस्कृतीच्या अविनाशी आत्म्याचे, चैतन्याचे सोमनाथ मंदिराहून समर्पक दुसरे कोणते उदाहरण असू शकते?

गतकाळातील आक्रमणकर्ते आता हवेत विरून गेले आहेत. इतिहासाच्या पानांवरील तळटिपांप्रमाणे ते उरले आहेत, दुसरीकडे सोमनाथ तळपत क्षितिजापार आपले तेज पसरवत, आपल्याला 1026 मध्ये झालेल्या आक्रमणानेही क्षीण न झालेल्या शाश्वत आत्म्याचे स्मरण करून देतो आहे. सोमनाथ एक आशेचे गाणे आहे, जे आपल्याला सांगते की, एका क्षणासाठी विनाश करण्याचे सामर्थ्य द्वेष आणि कट्टरतेमध्ये असेल; मात्र चांगुलपणावरील श्रद्धा आणि दृढ विश्वास यांच्या सामर्थ्यामध्ये अनंतकाळासाठी निर्मिती क्षमता आहे.

सोमनाथ मंदिर पुन्हा उभे राहू शकत असेल तर आपणही आपल्या महान राष्ट्राला आक्रमणांपूर्वी असलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या वैभवापर्यंत निश्चितच पुन्हा पोहोचवू शकतो. श्री सोमनाथ महादेवांच्या आशीर्वादाने, एक विकसित भारत घडवण्याच्या नव्या संकल्पाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, जिथे आपले सांस्कृतिक शहाणीव संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन मिळेल.

जय सोमनाथ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT