संजय पाठक, सोलापूर
रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणार्या सोलापूर जिल्ह्यात यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्वारीचा पेरा 30 टक्के घटला. याचा थेट परिणाम ताटातील भाकरीवर होणार आहे. पुढील हंगामात ज्वारीची किलोभराची किंमत शंभर रुपयांपर्यंत जाऊ शकते.
कर्नाटकच्या सीमेवर असणार्या सोलापूर जिल्ह्याला निसर्गाचे खूप छान वरदान लाभले आहे. येथील हवामान, माती आणि पर्जन्यमान ज्वारीच्या पिकासाठी अतिशय पोषक मानले जाते. जिल्ह्यातील शेतजमीन ही काळ्या बुक्क्यासारखी आहे. जी पाणी दीर्घकाळ धरून ठेवते. हळूहळू ओलावा देते. शिवाय, पिकांना पोषक घटकांनी समृद्ध करणारी ही जमीन आहे. त्यामुळे प्राधान्याने येथील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतो. ज्वारी पिकासाठी अतिशय पोषक, पिके खोलवर वाढण्यासाठी आणि ओलावा टिकवण्यासाठी ही माती अत्यंत योग्य आहे. सोलापुरातील पर्जन्यमान मध्यम ते कमी प्रकारातील आहे. यामुळे शेतजमिनीचा प्रकार हा कोरडवाहू पट्टा मानला जातो. नेमकी हीच बाब सोलापूरच्या ज्वारीसाठी इष्टापत्ती ठरते. येथील कोरड्या हवामानात ज्वारीचे पीक जोमदारपणे वाढते.
याबरोबरच आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील कोरडे आणि उष्ण हवामान. ज्वारीच्या पिकाला साधारणतः 25 ते 32 अंश तापमान लागते. ते या भागात नैसर्गिकरीत्या खूप छानपणे उपलब्ध आहे. तसेही सोलापूरचे तापमान वर्षभर उष्णच असते. ज्यामुळे ज्वारी पिकाच्या वाढीस ते पोषक ठरते. ज्या भागातील जमिनीमध्ये जास्त ओलावा असतो, दीर्घकाळ टिकणारा ओलावा असतो. त्या कोल्हापूर, कोकण भागात ज्वारीचे पीक यामुळेच तग धरू शकत नाही. सोलापूरच्या जमिनीमध्ये ओलावा नसल्याने ज्वारीच्या मुळावर बुरशी, रोग फारसे पडत नाहीत. आणखी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे, सोलापुरात वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश असतो. ज्वारी ही सूर्यप्रेमी म्हणजे उष्ण हवामानातील पीक आहे. जास्त प्रकाशामुळे येथील ज्वारीचा दर्जाही वरचा मानला जातो. यामुळे सोलापूरला ज्वारी मोठ्या प्रमाणावर पिकते. यातूनच ज्वारीचे कोठार, असे सोलापूरला म्हटले जाते.
असे असले तरी यंदा सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. प्रचंड महापूर आला. दुष्काळी, कोरडवाहू शेतजमिनी दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्या. महापूर ओसरल्यावर, पाऊस थांबल्यावरही जवळपास महिनाभर शेतात पाणी टिकून होते. यामुळे यंदाच्या हंगामात ज्वारीचा सोलापूर जिल्ह्यातील पेरा घटला. कृषी खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील रब्बी ज्वारीचे क्षेत्र गतवर्षी म्हणजे 2024 साली तब्बल दोन लाख 5 हजार 92 हेक्टर होते. म्हणजेच ज्वारीच्या एकूण पेरणीच्या हे क्षेत्र 92 टक्के होते. यंदा मात्र यामध्ये मोठी घट झाली आहे. चालूवर्षी सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचा पेरा एक लाख 72 हजार 541 हेक्टर झाला आहे. हा पेरा गतवर्षीच्या ज्वारीच्या एकूण पेरणीच्या फक्त 62 टक्के आहे. त्यामुळे यंदा ज्वारी पेरणीत नैसर्गिक आपत्तीमुळे 30 टक्क्यांची घट झाली आहे. असे असले तरी सरकारी मतानुसार, अजूनही ज्वारीची पेरणी सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र डिसेंबरमध्ये ज्वारी पेरणी बंद होते. फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच ज्वारीची पेरणी होते. सोलापूर परिसरात सध्या ज्वारीचे पीक तीन ते चार फुटांपर्यंत वाढले आहे.
एकंदरीत, नैसर्गिक आपत्ती, यामुळे ज्वारीचा घटलेला पेरा, त्यामुळे आगामी उत्पादनात होणारी घट, या सर्व घटकांचा सुसंगतरीत्या विचार करता याचा थेट परिणाम आपल्या ताटातील भाकरीवर होणार आहे. कारण, पुढील हंगामात ज्वारीची किलोभराची किंमत चक्क शंभर रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.