जम्बो कुटुंब..!  pudhari photo
संपादकीय

जम्बो कुटुंब..!

पुढारी वृत्तसेवा
कलंदर

एकाच छताखाली 72 लोक राहतात, असे समजल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित झालो. हे ऐकल्यावर सुरुवातीला वाटलं की कदाचित एखादा नवीन रियालिटी शो सुरू झाला आहे की काय? बिग बॉसमध्ये काही लोक एका घरात राहतात. सोलापूरच्या एका कुटुंबात सध्या एकूण 72 सदस्य असून ते सर्वजण गोविंदाने नांदत आहेत. हे काही ‘बिग फॅमिली’ किंवा ‘सासूबाईंचं साम्राज्य’ पण नाही. हे आहे खरं-खुरं संयुक्त कुटुंब आणि तेही एकविसाव्या शतकात!

बघा, बघा एकाच कुटुंबात आई-वडील आणि सून-मुलगा राहायला तयार नसताना ही मंडळी एकाच घरात हसत-खेळत राहतात! यालाच म्हणतात ‘आधुनिक काळातला आदर्श’. या घरात सकाळची सुरुवात भल्या पहाटे होते. इथे सकाळी 5 वाजता पहिला अलार्म वाजतो तो केवळ एकाच कामासाठी आणि ते म्हणजे दूध उकळणं यासाठी. का? कारण यांना रोज 20 लिटर दूध लागतं. चहा, दही, ताक, खीर आणि अर्थातच काका मंडळींना सवय असलेल्या दुपारच्या झोपेसाठी लागणारी गरम दुधाची वाटी.

एकदा एका पाहुण्यानं त्यांना विचारलं, ‘तुमच्याकडे डेअरी आहे का?’

तर त्यांचं उत्तर होतं, नाही, ’आमचंच कुटुंब एक डेअरी आहे!’

या कुटुंबातील स्वयंपाकघर म्हणजे चक्क युद्धभूमी आहे.

इथलं स्वयंपाकघर म्हणजे ‘मास्टर शेफ’चा दररोजचा एपिसोड आहे. 5 जणी सकाळी पोळी लाटतात, 3 जणी भाजी कापतात आणि बाकीच्या सगळ्या चव चाखायला थांबलेल्या असतात.यांना दर 4 दिवसाला गॅस सिलिंडर लागतो. भाजीपाला आठवड्याला 10 किलो तरी लागतो. यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे दारावर एकच पाटी आणि एकच व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप.

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप? अहो, तिथं दिवसभर 300 मेसेजेस रोज असतात. त्यात 50 तर ‘कुणी माझं चार्जर घेतलं का’ या प्रकारचे असतात! बाहेरचा माणूस विचारतो, ‘सगळे एकत्र राहता? वाद होत नाहीत का?’

त्यावर त्यांचं उत्तर, ‘वाद होतातच, पण आमच्याकडे ‘कोर्ट’सुद्धा घरात आहे. हे आजींचं कोर्ट आहे आणि अंतिम निर्णय आजीचाच असतो’. या कुटुंबाची एक खास गोष्ट आहे.

या कुटुंबासाठी दर महिना भाज्यांचा खर्च तीस हजार रुपये आणि हसण्याचा खर्च शून्य. कारण इथे रोज हसणं, चिडचिड करणं, प्रेम करणं, वाद करणं, आणि एकमेकांसाठी असणं हे सर्वकाही आहे.

या कुटुंबाची गोष्ट ऐकली की एकच वाटतं. आपण तर दोन भावंडं असतानाही रिमोटवर भांडतो आणि हे 72 जण, तरीही टीव्ही वर ‘एकमत!’आदर्श कुटुंब म्हणजे काय तर हेच की एकत्र राहून रोजचे प्रश्न हसत-खेळत सोडवणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT