१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी इतका अफाट विद्रोह केलाय की आज २१व्या शतकातही ते काळाच्या पुढे आहेत. आज त्यांच्याच विचारांची गरज आहे.
बी.डी. जत्ती हा फार मोठा माणूस. आणीबाणीच्या काळात ते पाच-सहा महिने देशाचे राष्ट्रपती होते. ते आपल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या जमखंडीचे. शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलेल्या लिंगायत बोर्डिंगमध्येच राहून वकिली शिकले. ते आठवायचं कारण बसवकल्याणमधलं बसवेश्वर मंदिर.
पन्नासच्या दशकात बी.डी. जत्ती हे जुन्या म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री असताना काही विदेशी मित्रांना बसवकल्याण दाखवायला घेऊन येत होते. प्रवासात त्यांनी बसवेश्वरांनी केलेल्या समताक्रांतीचं भरभरून वर्णन केलं. मुख्यमंत्री पाहुण्यांना मोठ्या उत्साहाने मंदिरात दर्शनाला घेऊन गेले. त्यांनी फार मनोभावे दर्शन घेतलं. पण परदेशी पाहुणे गोंधळलेले होते. त्यांनी विचारलं, या प्राण्याने तुम्ही म्हणता ती क्राती केली? कारण तिथे बसवेश्वरांची मूर्ती नव्हतीच. तिथे होता तो नंदी. अनेक शतकं बसवेश्वरांना नंदीचा अवतार ठरवून त्यांची फक्त ऐतिहासिकताच नाही, तर क्रांतिकारत्वही संपवून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पण पिढ्यानुपिढ्या प्रयत्न करूनही बसवेश्वरांच्या क्रांतीची आग विझली नाहीच. बसवेश्वरांच्या काव्यरचना म्हणजे वचनं नव्या पिढीने शोधून काढली. ९०० वर्षांची राख उडून गेली. आज बसवकल्याण पुन्हा एकदा बसवेश्वरांच्या विद्रोही विचारांचं केंद्र बनलं आहे. इथे आता देवळातही नंदी बसवेश्वरांच्या मूर्तीमागे लपवण्यात आला आहे. सत्तर वर्षांपूर्वी जिथे बसवण्णांना कुणी लिंगायत धर्मसंस्थापक मानायला तयार नव्हतं, तिथे आज त्यांचा १०८ फुटी पुतळा सगळ्या बसवकल्याणाच्या आकाशाला कवेत घेऊन उभा आहे.
वर्षं वेगवेगळी सांगितली जातात, पण १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बसवण्णांचा जन्म झाला. ते साधारण ६२-६३ वर्षं जगले. म्हणजे १२व्या शतकाच्या उत्तरार्धात ते हे जग सोडून गेले. हे आपलं २१वं शतक सुरू आहे. साडेआठशे – नऊशे वर्षांचा काळ लोटलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर आपल्याला इतिहास कळतो. म्हणून सांगायला हवं की बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचशे वर्ष आधी झालेत. बसवण्णांचा जन्म एका ब्राह्मणाच्या घरात झाला होता. तोही बारा गावांतल्या शेकडो ब्राह्मणांचा प्रमुख असणाऱ्या पुराधिश्वराच्या घरात. सातव्या आठव्या वर्षी बसवाची मुंज होती. बारा गावच्या ब्राह्मणराजाच्या घरचा सोहळा होता. मोठा थाटमाट होता. पै-पाहुणे आले होते. मुंज झाल्यावर वेदाध्ययन होणार आणि तल्लख बुद्धीचा पोरगा विद्वान गणला जाणार, याची सगळ्यांना खात्री होती. विधी सुरू झाल्या. उपनयन संस्कार ब्राह्मणासाठी किती महत्त्वाचा आहे, याचं शास्त्र वडील सांगू लागले. ते ऐकून बसव अस्वस्थ झाला. त्याने साधा प्रश्न विचारला, मुंजीमुळे दुसरा जन्म होणार आहे आणि मुक्तीचा मार्ग खुला होणार आहे, तर माझ्या मोठ्या बहिणीची नागक्काची मुंज आधी व्हायला नको का? तिला वेदविद्येची, मुक्तीची गरज नाही का?
बसवाइतका हट्टी पोरगा दुसरा नव्हता. त्याने जानवं भिरकावून दिलं. बसवाच्या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत. म्हणून त्याने मुंज होऊ दिली नाही. आईवडिलांची इभ्रत धुळीला मिळाली होती. त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा नव्हती. ते खंगू लागले होते. पण नात्याऐवजी बसवाने सत्याला स्वीकारलं. बसवाच्या प्रश्नांना उत्तरं न देताच आईवडील जग सोडून गेले. बसवाने बागेवाडी सोडताना हालाबाईच्या विहिरीत आईने पाजलेलं सगळं दूध ओकून काढलं म्हणे. म्हणजेच त्याने सगळे संस्कार फेकून दिले होते. माणूस लहाणपणीच्या संस्कारांना प्रश्न विचारतो, तेव्हाच त्याचा खरा विचार सुरू होतो. ज्या काळात जात हेच माणसाचं अस्तित्व होतं. तेव्हा बसव डिकास्ट झाला होता. त्याचा महात्मा बसवेश्वर बनण्याचा प्रवास सुरू झाला होता. बसवेश्वर सत्याच्या शोधात कुडलसंगमाला गेले. ईशान्यगुरू की जातवेदमुनी यापैकी एक किंवा तिसराच कुणीतरी बसवण्णांना समजून घेणारा तिथे असावा. त्या गुरूने बसवण्णांना सर्व दर्शनांची ओळख करून दिली असेल. मग ते श्रुती, स्मृती, वेद, पुराणं, आगम असं सगळं कोळून प्यालं असतील. त्यांना प्रश्न विचारले असतील. उत्तरं शोधली असतील. त्यातून त्यांना स्वतःची सत्यं सापडली असतील. खरा धर्म कळला असेल. खरा देव, खरी भक्ती, खरी पूजा सापडली असेल. माणसाची दुःख दूर करण्याच्या उपायाची थिअरी तरी सापडली असेल.
मंगळवेढ्याला राहणाऱ्या मामाचा या बाणेदार पोरावर फार जीव होता. त्याने त्याला राजधानीत आणलं. स्वतःची मुलगी दिली, राजाकडे नोकरी दिली. मंगळवेढ्याचा राजा कल्याणच्या चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याच्या अमलाखालील इलाखा मोठा होता. हुशारीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर बसवेश्वरांनी तरुण राजाला आपलंसं केलं. हळूहळू राज्याचे भांडारी म्हणजे अर्थमंत्री बनले. त्याचबरोबर त्यांनी कुडलसंगमावरची थिअरी प्रॅक्टिकलमधे उतरवण्यासाठी सत्याचे प्रयोग सुरू केले. खरा धर्म, खरा देव लोकांना सांगितलं तर ते लोकांना हवंच असतं, हे त्यांना कळलं. समतेचं राज्य आणण्याची ब्ल्यू प्रिंट तयार होऊ लागली. मंगळवेढ्याला एकवीस वर्षाच्या वास्तव्यात बसवेश्वर समतेच्या राज्याच्या दिशेने एकेक पाऊलही टाकू लागले. जातीभेदाची बंधनं उलथून टाकता येतात, हे त्यांनी इथे तपासून बघितलं.
अचानक मंगळवेढ्याचा मांडलिक कल्याणचा सम्राट झाला. पाठोपाठ मंगळवेढ्याचे अर्थमंत्री कल्याणचे महामंत्री बनले. कल्याण मोठं शहर होतं. इथे मोठमोठे धर्माचे ठेकेदार बसले होते. ते सांगतील तो धर्म होता. त्यामुळे मंगळवेढ्याला जे सहज करता येत होतं, ते इथे सोपं नव्हतं. पण बसवेश्वर आपलं काम चोख करत होते. त्यांच्या कारभारामुळे जनता सुखी झाली होती. कुणाला कसली कटकट नव्हती. शेजारी राज्यांनाही युद्धाची गरज उरली नाही. त्यामुळे धर्मगुरूंना या धर्मबुडव्याला विरोध करण्याची संधी मिळत नव्हती. खोट्या धर्माने उभ्या केलेल्या जंजाळामुळे लोकांचं आयुष्य अवघड झालेलं आहे. ते सोपं झालं तर लोकांना ते हवंच असतं. हे कळल्यानंतर बसवेश्वरांनी इष्टलिंगाला जन्म दिला. ती काही शंकराची पिंडी नव्हती. ते ईश्वरी चैतन्याचं प्रतीक होतं. आता ना वेगळ्या देवाची गरज उरली, ना देवळाची ना कोणत्या पुरोहिताची. इष्टलिंग धारण केलं की झालं लिंगायत. आणि एकदा लिंगायत झाले की जातच उरत नसे. सगळे लिंगायत समान ठरत. कुणी उच्च नाही की नीचही नाही. प्रत्येकाने आपापलं काम म्हणजे कायक निवडायचं. पती-पत्नींनी ते एकत्र येऊन निष्ठेने करायचं. कुणाच्या भिक्षेवर जगायचं नाही. गरजेपेक्षा जास्त उत्पन्न दासोह म्हणून समाजाला अर्पण करायचं. यात देणारा मोठा नाही की, घेणारा छोटा नाही. हीच पूजा झाली. दानदक्षिणेवर आधारलेल्या जुन्या शोषण व्यवस्थेच्या ऐवजी सगळ्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणारी ही नवी अर्थव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि समाजव्यवस्थाही जन्माला आली.
या सगळ्या समविचारी सहकाऱ्यांसाठी म्हणजे शऱणांसाठी बसवेश्वरांनी अनुभवमंटप उभा केला. अफगाणिस्तानापासून तामिळनाडूपर्यंतचे सत्याचे प्रवासी त्यात जोडले जाऊ लागले. त्यात सगळ्या जातीचे शरण होते. अस्पृश्यांपासून राजापर्यंत आणि वेश्येपासून ब्राह्मणापर्यंत सगळे म्हणे ७७० जण होते. फक्त पुरुषच नाही, महिलाही होत्या. शूद्र जातीचे अल्लमप्रभू त्याचे अध्यक्ष बनले. सगळे एकत्र भेटत. एकमेकांशी चर्चा करत. प्रत्येकजण आपले अनुभव सांगे. इतर ते आपल्या अनुभवांशी ताडून बघत. सगळे मिळून सत्यापर्यंत पोचत. ते सत्य शब्दांत उतरल्यावर वचनसाहित्य बने. सत्याच्या प्रवाशांना भविष्यातही उपयोगी पडावं म्हणून ते जपून ठेवलं जाई. सापडत जाणारं सत्य जगण्यात उतरवलं जाई. त्यातून बसवेश्वरांनी चांभार हरळय्यांचा मुलाचं ब्राह्मण मधुय्याच्या मुलीशी लग्न लावलं. तेही अनुभवमंटपात वाजतगाजत. खरं तर इथे कुणाची जात उऱलीच नव्हती. पण जगासाठी ते आंतरजातीय लग्न होतं. धर्म खतरे में आला होता. बसवेश्वरांना कल्याण सोडावं लागलं. कुडलसंगमला त्यांचा शेवट झाला. कल्याणात शरणांच्या वेचून वेचून कत्तली केल्या. वचनभंडाराला आग लावली. अनुभवमंटप उद्ध्वस्त केला. पण शरणांनी प्राणांची पर्वा न करता वचनसाहित्य जपून ठेवलं.
हळूहळू सनातन्यांनी लिंगायत धर्माची एक जात बनवली. बसवेश्वरांना नंदी बनवलं. लिंगायतांना सनातन्यांपेक्षा जास्त सनातनी बनवलं. तरीही विद्रोह संपत नसतोच. तो नवं रूप घेतो. शंभर सव्वाशे वर्षांनी नरसीवरून एक छोटा मुलगा आपल्या आजोळी कल्याणला यायचा. नामा त्याचं नाव. त्याचे प्रश्न खूप असायचे बसवासारखेच. देवाविषयी, धर्माविषयी, माणसामाणसातल्या भेदभावाविषयी. त्याला उत्तरं मिळायची ती राखेआड उरलेल्या विद्रोहातून. विसोबा खेचर नावाचा एक म्हातारा त्याला बसवेश्वर सांगायचा बहुतेक. त्या म्हाताऱ्याला काहीजण विश्वेश्वर जंगमही म्हणायचे. त्याने बसवेश्वरांच्या वचनसाहित्यातला विद्रोह नव्या पिढीपर्यंत पोचवला होता. आता पुन्हा नवी सुरूवात झाली होती. रकट्याची लंगोटी नेसून संत नामदेव चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनासाठी उभे राहिले. आता नवी क्रांती घडणार होती. बसवण्णांचे विचार नव्याने जन्म घेणार होते.
(लेखक रिंगणचे संपादक आहेत. संपर्क ९९८७०३६८०५)