आशिष शिंदे
रात्रीच्या निरभ्र आकाशातील लुकलुकणारे तारे, चंद्रावरील विवरे आणि दूरवरच्या आकाशगंगांचे अद्भुत सौंदर्य स्वतःच्या कॅमेऱ्यात टिपावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. पण, आजवर हे काम एखाद्या अवघड वैज्ञानिक प्रयोगासारखे होते. अवजड दुर्बीण, वायर्सचे जंजाळ, लॅपटॉप आणि कडाक्याच्या थंडीत रात्रभर जागून ताऱ्यांची दिशा जुळवण्याची कसरत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची होती. त्यामुळे हौस असूनही अनेकांना फक्त आकाशाकडे बघूनच समाधान मानावे लागत असे. सामान्य खगोलप्रेमींची हीच तांत्रिक कटकट कायमची संपवून अंतराळाची सफर थेट तुमच्या हातात देणारी एक जादुई ‘स्मार्ट दुर्बीण’ आता ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये अवतरली आहे. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला रात्रभर जागण्याची मुळीच गरज नाही, कारण तुम्ही उबदार पांघरुणात गाढ झोपेत असतानाही ही बुद्धिवान दुर्बीण स्वतःहून जागी होते, आकाशातील तारे शोधते आणि सकाळी उठल्यावर थेट तुमच्या स्मार्टफोनवर ब्रह्मांडाचे विलोभनीय फोटो हजर करते.
दिसायला एखाद्या आधुनिक कॅप्सूल किंवा लॅन्टर्नसारखे भासणारे हे उपकरण केवळ साडेपाच किलो वजनाचे असून, ते एका हाताने सहज उचलून घराच्या गच्चीवर किंवा सहलीला नेता येते. यामध्ये ९० मिलिमीटरचा शक्तिशाली ऑप्टिकल सेन्सर आणि ३४० मिलिमीटरची फोकल लेंथ देण्यात आली आहे. जी नेहमीच्या लहान स्मार्ट दुर्बिणींच्या तुलनेत तब्बल तीनपट अधिक प्रकाश गोळा करण्याची क्षमता ठेवते. केवळ लांबचे तारेच नव्हे, तर आकाशगंगेचे विस्तीर्ण पॅनोरमा दृश्य टिपण्यासाठी यात स्वतंत्र वाईड अँगल कॅमेराही जोडला आहे. ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा अंधारात पिक्सेल एकत्र करून (पिक्सेल बिनिंग) तेजोमेघांचे सूक्ष्म तपशील टिपतो, तर सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या छायाचित्रणासाठी पूर्ण क्षमतेने काम करून चंद्रावरील विवरे किंवा शनीची कडी स्पष्टपणे समोर आणतो.
या स्मार्ट दुर्बिणीची सर्वात मोठी आणि अनोखी जादू दडली आहे ती तिच्या ‘फिरणाऱ्या सेन्सर’मध्ये (रोटेटेबल सेन्सर). पृथ्वीच्या परिवलनामुळे आकाशातील तारे सरकत असतात, त्यामुळे दीर्घकाळ फोटो टिपताना ताऱ्यांचे ठिपके रेषांसारखे दिसू लागतात. नासाच्या जगप्रसिद्ध ‘हबल’ दुर्बिणीने टिपलेल्या रंगीबेरंगी तेजोमेघांसारखे फोटो काढण्याचे स्वप्नही या उपकरणाने एका क्लिकवर आणले आहे. तसेच सूर्यग्रहण किंवा सूर्यावरील डाग पाहण्यासाठी सुरक्षित एनडी फिल्टरची सोयही यात आहे. स्मार्टफोन फक्त या दुर्बिणीला टेकवताच ॲप सुरू होते आणि ‘ऑगमेंटेड रिॲलिटी’ नकाशाच्या मदतीने आकाशात नेमके काय दिसत आहे, याची माहिती स्क्रीनवर झळकते.
या उपकरणाचे सर्वात थक्क करणारे वैशिष्ट्य म्हणजे याची स्वयंचलित कार्यपद्धती होय. वापरकर्त्याने ॲपमध्ये फक्त आपल्या आवडीचा तारा किंवा आकाशगंगा निवडून वेळापत्रक ठरवून दिले, की या दुर्बिणीचे काम सुरू होते. मध्यरात्री आकाश निरभ्र असताना ही दुर्बीण स्वतःहून जागी होते, लक्ष्याचा शोध घेते, अचूक फोकस करून शेकडो फोटो टिपते आणि त्यांचे एकत्रीकरण (स्टॅकिंग) करून एक परिपूर्ण चित्र तयार ठेवते.
वापरण्यास अत्यंत सुटसुटीत, धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून सुरक्षित असणाऱ्या या दुर्बिणीसोबत मजबूत ॲल्युमिनियम ट्रायपॉडही मिळतो. जागतिक बाजारपेठेत या तंत्रज्ञानाची किंमत भारतीय चलनात अंदाजे १ लाख २० हजार ते १ लाख ३५ हजार रुपयांच्या घरात निश्चित करण्यात आली आहे.