Smart Shoes | आता स्मार्ट शूज दाखवेल रस्ता 
संपादकीय

Smart Shoes | आता स्मार्ट शूज दाखवेल रस्ता

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

रस्त्यावरून चालताना किंवा गर्दीच्या चौकातून वाट काढताना स्मार्टफोनच्या स्क्रीनवर डोळे चिकटवून चालणाऱ्यांची संख्या आज गल्लोगल्ली दिसते. नकाशे पाहात मान खाली घालून चालताना ठेचकाळणे, समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न येणे किंवा खड्ड्यात पाय जाणे ही आजच्या डिजिटल पिढीची रोजची डोकेदुखी. स्क्रीनच्या या नाहक बंधनातून माणसाला मुक्त करण्यासाठी आता थेट पायातील पादत्राणांनीच ‘स्मार्ट अवतार’ धारण केला आहे. गॅजेट वर्ल्डमध्ये अवतरलेले स्मार्ट शूज केवळ नकाशा दाखवण्यापुरते मर्यादित नाही; तर वळणांवर स्पंदनांच्या (हॅप्टिक) भाषेत पावले वळवणे, संकटसमयी पडल्यास आपोआप धोक्याचा इशारा पाठवणे, चालताना पायाच्या इशाऱ्याने फोन आणि संगीत नियंत्रित करणे, पावलांचा अचूक हिशेब ठेवणे आणि चालून दमल्यावर तळपायाला सुखावणारा मसाज देणे असे अद्‌भुत बहुढंगी फीचर्स या स्मार्ट शूजमध्ये देण्यात आले आहेत.

या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी ताकद दडली आहे ती त्याच्या ‘हॅप्टिक नेव्हिगेशन’ आणि दिशादर्शक रचनेत. स्मार्टफोनच्या ॲपमध्ये आपले गंतव्य स्थान निश्चित केल्यानंतर खिशातून फोन वारंवार बाहेर काढण्याची अजिबात गरज उरत नाही. रस्त्याने चालताना डावीकडे वळायचे असल्यास डाव्या पायाचा बूट अलगद व्हायब्रेट होतो. तर उजवीकडे वळण असल्यास उजव्या पायाच्या बुटात व्हायब्रेशन्स जाणवतात. वळणाच्या साधारण दहा मीटर आधी हा बूट दोनदा व्हायब्रेट करून वळणाची पूर्वसूचना देतो. केवळ पायी चालणाऱ्यांसाठीच नव्हे, तर सायकल आणि कार चालकांसाठीही यात स्वतंत्र मोडस्‌ देण्यात आले आहेत. साध्या वळणांव्यतिरिक्त उड्डाणपूल, गोल चक्कर, वाय जंक्शन किंवा यू टर्न अशा गुंतागुंतीच्या रस्त्यांवरही हे बूट पायाला अचूक व्हायब्रेशन देऊन सावध करतात.

या उपकरणाची सर्वात रंजक आणि थक्क करणारी बाजू म्हणजे यातील ‘जेस्चर कंट्रोल’ प्रणाली होय. पायाची टाच किंवा चवडा विशिष्ट कोनात वर उचलून वापरकर्ते फोनला स्पर्श न करता अनेक कामे करू शकतात. यामध्ये थेट पायाच्या इशाऱ्यावर फोन उचलणे, चार महत्त्वाच्या क्रमांकांवर थेट कॉल (स्पीड डायल) लावणे, कॅमेऱ्यातून हँडस्‌ फ्री फोटो काढणे, संगीत नियंत्रित करणे, आवडीची वेब लिंक उघडणे आणि फोन हरवल्यास तो शोधण्यासाठी रिंग वाजवणे (फोन फायंडर) यांसारख्या गोष्टी केवळ पायाच्या हालचालीने नियंत्रित करता येतात. यामध्ये स्वयंचलित ‘फॉल डिटेक्शन’ आणि एसओएस प्रणाली बसवण्यात आली आहे. चालताना व्यक्ती तोल जाऊन खाली पडल्यास आणि बूट ९० अंशांच्या कोनात ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ राहिल्यास यंत्रणा धोक्याचा अंदाज घेऊन आधीच नोंदवलेल्या चार आणीबाणी संपर्कांना थेट एसएमएस पाठवून सावध करते.

याशिवाय दिवसभरात किती पावले चाललो, याचा ९९.९ टक्के अचूक हिशेब हा स्मार्ट शूज ठेवतो. चालून झाल्यावर पायाचा थकवा दूर करण्यासाठी यात ‘हॅप्टिक मसाज मोड’ दिला असून दर १०० पावलांमागे १० सेकंदांचा मसाज यात अनलॉक होतो. शिवाय बुटात होणाऱ्या प्रत्येक स्पंदनासोबत एक सूक्ष्म लाल रंगाचा एलईडी प्रकाश लुकलुकतो. रात्रीच्या अंधारात रस्ता पार करताना किंवा धावताना सुरक्षेचे हे एक उत्तम दृश्य साधन ठरते. तंत्रज्ञानाची सर्व गुंतागुंतीची सर्किटस्‌, मोटर्स आणि सेन्सर्स अगदी तळव्यात सुरक्षितपणे दडवलेले असल्याने, धावताना किंवा व्यायाम करताना पायाला कोणताही जडपणा जाणवत नाही. या स्मार्ट शूजची किंमत नऊ ते दहा हजार रुपयांच्या घरात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT