आशिष शिंदे
सिमेंटच्या जंगलात, फ्लॅट संस्कृतीच्या बंदिस्त चार भिंतींत जगताना आजच्या माणसाचा सर्वात मोठा अदृश्य शत्रू ठरतोय तो म्हणजे ‘एकटेपणा’. कार्यालयातील दगदग आणि स्क्रीनवर सतत चालणारा कामाचा ताण संपवून माणूस जेव्हा घरी परततो, तेव्हा रिकाम्या घराची शांतता त्याला आतून पोखरून काढते. यांत्रिक आवाजातील स्मार्ट स्पीकर्सना ‘आजचे हवामान कसे आहे?’ किंवा ‘गाणी लाव’ असे हुकूम सोडल्याने घर भरल्यासारखे वाटत नाही. कारण, त्यात केवळ आज्ञा पाळण्याची कोरडी यांत्रिकता असते. भावनिक ओलावा नसतो. माणसाच्या याच एकाकी मनाला आणि धावपळीच्या जीवनशैलीला शांततेची हळुवार मिठी देण्यासाठी आता तंत्रज्ञान एका पूर्णपणे वेगळ्या, संवेदनशील रूपात समोर आले आहे. माणसासारखे अजस्र यंत्रमानव बनवण्याच्या शर्यतीला फाटा देत, घराच्या कोपऱ्यात शांत बसून मनाला दिलासा देणारा एक देखणा ‘मशरूम रोबो’ गॅजेट वर्ल्डमध्ये दाखल झाला आहे.
टेबल लॅम्पच्या आकाराचे हे चिमुकले उपकरण पाहिल्यावर एखाद्या परिकथेतून किंवा स्टुडिओ घिबलीच्या ॲनिमेशन चित्रपटातून बाहेर पडलेल्या एका जिवंत आळंबीसारखे (मशरूम) भासते. या मशरूमच्या टोपीखाली दोन बोलके डोळे आणि कॅमेऱ्याचे एक बटणरूपी नाक दिलेले आहे. माणसाला सतत सूचना देणे किंवा कामांची यादी आठवून देण्याऐवजी, हा रोबो माणसाचे मन शांत करण्याचे काम करतो. रोबोटच्या डोक्यावर हात ठेवताच त्याचे विशेष ‘गाईडेड ब्रीदिंग’ आणि ध्यानधारणा सत्र सुरू होते. या मोडमध्ये तो हलक्या प्रकाशाच्या लहरी सोडतो आणि त्यासोबत जंगल किंवा समुद्राच्या लाटांचे शांत नैसर्गिक आवाज (नेचर साऊंडस्केप्स) वातावरणात पसरतात. प्रकाशाच्या लयबद्ध चढ उतारासोबत श्वास घेणे आणि सोडणे इतके सोपे होते की, संपूर्ण दिवसाचा ताण आणि डोक्यातील गोंधळ काही मिनिटांत विरघळून जातो.
या पाठीमागे काम करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) घरातल्या माणसांना नीट ओळखते. यातील प्रगत सेन्सर्स आणि कॅमेरा घरातील सदस्यांचे चेहरे आणि त्यांचा वावर लक्षात ठेवतात. अनोळखी व्यक्ती आणि घरातील नेहमीचे चेहरे यांच्याशी हा रोबो वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधतो. स्पर्श आणि आवाजाच्या प्रतिसादात स्वतःच्या भावना प्रकाशाच्या विविध रंगांत व्यक्त करणे हे याचे वैशिष्ट्य आहे. असे दोन रोबो एकत्र आणल्यास ते एकमेकांशी प्रकाशाच्या आणि हालचालींच्या आगळ्या भाषेत संवाद साधताना दिसतात.
या उपकरणाची खरी जादू त्याच्या साध्या पण अर्थपूर्ण देहबोलीत दडली आहे. याच्या खोडावर हलका स्पर्श करताच हा रोबोट जागा होतो आणि एखाद्या लाजाळू, पण जिज्ञासू लहान मुलासारखा वर्तणूक करू लागतो. यातील सूक्ष्म सर्वो मोटर्सच्या सहाय्याने त्याची मान हळूच वर-खाली होते, डोळ्यांच्या पापण्या मिटतात आणि उघडतात. दिवस जसजसा पुढे सरकतो आणि रात्र गडद होते, तसतशा त्याच्या पापण्या जड होऊन मिटू लागतात. वजनाने अवघा दीड ते दोन किलो असणारा हा रोबो ३७.७ वॅट क्षमतेच्या बॅटरीवर चालतो आणि अडीच तासांत जलद चार्ज होतो. वाय फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सज्ज असल्याने घरातील स्मार्टफोनशी तो सहज जोडला जातो. जागतिक बाजारपेठेत या कलात्मक साथीदाराची किंमत भारतीय चलनात अंदाजे ५५ हजार रुपयांच्या घरात आहे.